चिन्मय पाटणकर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. आता राज्यसेवेमध्ये वर्णनात्मक (सब्जेक्टिव्ह) पद्धतीचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवरच आता राज्यसेवेची परीक्षा योजना वर्णनात्मक पद्धतीची करण्यात आली आहे. वर्णनात्मक परीक्षा पद्धत उमेदवारांसाठी आव्हानात्मक आहे, पण त्यांच्या गुणवत्तेला खऱ्या अर्थाने वाव देणारी आहे, तसेच यूपीएससीमध्येही मराठी उमेदवारांचा टक्का वाढवण्यासाठी उपयुक्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

आतापर्यंत राज्यसेवेची परीक्षा योजना काय होती?

राज्यसेवा परीक्षेत २०१२पूर्वी वर्णनात्मक पद्धतीच वापरली जात होती. मात्र २०१२मध्ये केलेल्या बदलात बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) स्वरूपाची योजना लागू करण्यात आली. त्यात प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाला चार पर्याय दिलेले असतात. त्यातून योग्य पर्याय उमेदवाराने निवडायचा असतो. त्यात सहा पेपरचा समावेश आहे. सहापैकी सामान्य अध्ययनाचे चार पेपर हे वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. मराठी आणि इंग्रजी या दोन पेपरमध्ये पन्नास गुणांसाठी वर्णनात्मक पद्धती, तर पन्नास गुणांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न पद्धती आहे. मुलाखतीसाठी शंभर गुण असतात. एकूण परीक्षा आठशे गुणांसाठी घेतली जाते.

हेही वाचा >> एमपीएससी मंत्र : पदनिहाय पेपरची तयारी सहायक कक्ष अधिकारी

आता एमपीएससीने केलेल्या सुधारणा कोणत्या?

मात्र काळानुरूप बदलांचा भाग म्हणून एमपीएससीने जवळपास दहा वर्षांनंतर परीक्षा योजनेमध्ये बदल केला आहे. सुधारित परीक्षा योजनेमध्ये वर्णनात्मक स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका असतील. त्यात एकूण नऊ प्रश्नपत्रिकांचा समावेश असेल. त्यातील भाषा (एक – मराठी), भाषा (दोन – इंग्रजी) हे प्रत्येकी तीनशे गुणांचे विषय प्रत्येकी २५ टक्के गुणांसह अर्हताकारी असतील. तर मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध, सामान्य अध्ययन एक, सामान्य अध्ययन दोन, सामान्य अध्ययन तीन, सामान्य अध्ययन चार, वैकल्पिक विषय क्रमांक एक, वैकल्पिक विषय क्रमांक दोन हे एकूण सात विषय प्रत्येकी दोनशे पन्नास गुणांसाठी असतील. मुलाखतीसाठी २७५ गुण असतील. त्यामुळे एकूण गुण २ हजार २५ असतील. सामान्य अध्ययन एक, सामान्य अध्ययन दोन, सामान्य अध्ययन तीन या प्रश्नपत्रिकांसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल. तर सामान्य अध्ययन चार ही प्रश्नपत्रिका उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता या विषयावर राहील. तसेच एकूण २४ विषयांतून उमेदवारांना वैकल्पिक विषयाची निवड करता येईल. तसेच अभ्यासक्रमामध्येही बदल करण्यात आला आहे.

अंमलबजावणी कधीपासून?

एमपीएससीने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार २०२३पासून सुधारित परीक्षा योजना आणि नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

वर्णनात्मक पद्धत का आव्हानात्मक?

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीमध्ये उमेदवारांना प्रश्नाखाली दिलेल्या पर्यायातून एका पर्यायाची निवड करायची असते. मात्र वर्णनात्मक पद्धतीमध्ये उमेदवारांना उत्तरासाठी दीर्घ लेखन करावे लागणार आहे. उत्तर प्रभावी होण्यासाठी द्यावे लागणारे संदर्भ, त्यासाठी आवश्यक सखोल अभ्यास, उत्तराची अचूक आणि नेमकी मांडणी, प्रश्नपत्रिका वेळेत संपण्यासाठी लेखनाचा वेग साधणे आवश्यक आहे. एका वेळी या सर्व गोष्टी साध्य करण्यास उमेदवाराचा खऱ्या अर्थाने कस लागतो. त्यामुळे वर्णनात्मक पद्धत आव्हानात्मक मानली जाते.

वर्णनात्मक परीक्षा योजना महत्त्वाची का?

माजी सनदी अधिकारी महेश झगडे सांगतात, की एमपीएससीमध्ये पूर्वी वर्णनात्मक पद्धतच होती. ती पद्धत बंद करण्याचा निर्णय अयोग्य होता. कारण प्रशासनामध्ये येणारे उमेदवार हे केवळ नोकरीसाठी येत नसतात, तर जनतेला चांगले शासन आणि प्रशासन देण्यासाठी, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीही येत असतात. त्यामुळे या उमेदवारांची भक्कम वैचारिक बैठक असणे आवश्यक आहे. उमेदवारांची क्षमता, त्यांची गुणवत्ता ही वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेतूनच चांगल्या पद्धतीने तपासली जाऊ शकते. बहुपर्यायी प्रश्न स्वरूपाची प्रश्नपत्रिका अर्थात एमसीक्यू हे झटपट कॉफीसारखे आहे. वर्णनात्मक स्वरूपाची परीक्षा काही उमेदवारांसाठी त्रासदायक किंवा आव्हानात्मक ठरू शकते. पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक करण्याचा घेतलेला निर्णय निश्चितपणे स्वागतार्हच आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा (यूपीएससी) या वर्णनात्मक पद्धतीनेच होतात. आता एमपीएससीमध्ये पुन्हा वर्णनात्मक पद्धत आणल्याने यूपीएससीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांनाही त्याचा फायदा होईल. या दोन्ही परीक्षांमध्ये यश नाही मिळाले, तरी उमेदवार तावून सुलाखून निघतील. त्यांची वैचारिक बैठक वाढेल, त्यांना खासगी क्षेत्रासाठी संधी निर्माण होतील, त्यांचा चांगल्या पद्धतीने व्यक्तिमत्त्व विकास होईल.

यातून यूपीएससीमध्ये मराठी टक्का वाढेल?

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षांमध्ये वर्णनात्मक पद्धतीच वापरली जाते. आता राज्यसेवेतही ही पद्धत वापरली जाणार असल्याने यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे यूपीएससीमध्ये राज्यातील उमेदवारांचा टक्का वाढण्यास मदत होऊ शकेल, असे मत तज्ज्ञांकडून मांडले जात आहे.

chinmay.patankar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what happen due to changes in the syllabus of state service examination print exp 0622 abn
First published on: 27-06-2022 at 07:41 IST