नमिता धुरी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धुलिकणांच्या वादळाने मुंबईतील हवेचा दर्जा धोकादायक पातळीपर्यंत खालावला. दोन दिवस मुंबई आणि उपनगरांवर धुरके पसरले होते. हवेतील सूक्ष्म कणांचे प्रमाण वाढल्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. ‘प्रेशर ग्रेडिएंट’मुळे धुलिकणांचे वादळ निर्माण झाले होते. धुलिकणांचे वादळ, मुंबईची हवा का बिघडली अशा मुद्द्यांवर भारतीय हवामानशास्त्र विभागातील संशोधक सुषमा नायर यांनी प्रकाश टाकला आहे.

धुलिकणांचे वादळ कशामुळे निर्माण होते?

धुलिकणांचे वादळ ही शुष्क आणि अर्धशुष्क प्रदेशांमध्ये आढळणारी हवामानशास्त्रीय घटना आहे. वेगवान वाऱ्यांमुळे जेव्हा कोरड्या पृष्ठभागावरील वाळू आणि धूळ उडू लागते तेव्हा धुलिकणांचे वादळ निर्माण होते. जेव्हा दोन प्रदेशांवरील हवेच्या दाबामध्ये फरक निर्माण होतो तेव्हा त्याला ‘प्रेशर ग्रेडिएंट’ असे म्हणतात. ‘प्रेशर ग्रेडिएंट’ तीव्र असते तेव्हा वेगवान वारे निर्माण होतात. जेथे फार कमी झाडे आहेत अशा सपाट व कोरड्या प्रदेशात धुलिकणांचे वादळ निर्माण होणे ही सामान्य घटना आहे. अशा ठिकाणी कोणताही अडथळा नसल्याने वाऱ्याला चांगली गती मिळते व अधिकाधिक धुलिकण वाऱ्यांसोबत वाहू लागतात. ३० ते ४० किमी प्रतितास इतका वेग असतो व वाढत जाऊन हा वेग ५० किमी प्रतितास इतका होतो.

प्रामुख्याने कोणत्या कालावधीत आणि कोणत्या प्रदेशांत धुलिकणांची वादळे निर्माण होतात ?

उन्हाळ्यात ‘प्रेशर ग्रॅडिएंट’ तीव्र असतात. त्यामुळे या काळात धुलिकणांची वादळे मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात; मात्र अनुकूल स्थिती निर्माण झाल्यास वर्षभरात कधीही अशी वादळे निर्माण होऊ शकतात. गेल्या आठवड्याच्या अखेरीस बलुचिस्तान व इराण येथे ‘प्रेशर ग्रेडिएंट’ निर्माण झाले होते. त्यामुळे कराचीमध्ये वेगवान वारे निर्माण होऊन त्याचे रूपांतर धुलिकणांच्या वादळात झाले. पश्चिम आशिया आणि इराण येथे निर्माण झालेली धुलिकणांची वादळे भारतापर्यंत प्रवास करू शकतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भारतातील थर वाळवंटात अशी वादळे निर्माण होतात. राजस्थान, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली ही राज्ये धुलिकणांच्या वादळामुळे प्रभावित होतात.

महाराष्ट्रातील कोणता भाग अधिक प्रभावित होतो ?

महाराष्ट्रात अशी वादळे निर्माण होत नाहीत; मात्र दूरचा प्रवास करू शकणारी वादळे अरबी द्वीपकल्प (अरेबियन पेनिनसुला) पार करून गुजरात राज्यात प्रवेश करतात. त्यांचा परिणाम मुंबईसह उत्तर कोकणावर दिसून येतो.

ही वादळे थांबवता येतील का ?

वेगवान वारे धुलिकणांच्या वादळांसाठी प्रेरक असतात. प्रचलित वातावरणीय प्रणालींमुळे निर्माण होणारी वाऱ्याची परिसंचरण पद्धत या वादळांची तीव्रता निश्चित करते. त्यामुळे ही वादळे थांबवता येणार नाहीत.

मानवी आरोग्यावर या वादळांचा कसा परिणाम होतो ?

या वादळांमुळे हवेची गुण‌वत्ता घसरते. मानवी आरोग्याला घातक असणारे पीएम २.५ (२.५ मायक्रोमीटर व्यासाचा घातक सूक्ष्मकण) आणि पीएम १० (१० मायक्रोमीटर व्यासाचा घातक सूक्ष्णकण) यांचे हवेतील प्रमाण वाढते. धुलिकणांचे वादळ तीव्र असल्यास वित्तहानी आणि जीवितहानी होऊ शकते. झाडे पडणे, भिंत कोसळणे यांमुळे जीवितहानी होऊ शकते. जीवितहानी आणि वित्तहानी हे धुलिकणांच्या वादळाचे अल्पकालीन परिणाम आहेत तर, हवेची ढासळणारी गुणवत्ता हा दीर्घकालीन परिणाम आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why mumbai air quality deteriorated abn 97 print exp 0122