जपानच्या दक्षिणेकडे असलेल्या होंशू बेटावरील हिरोशिमा या शहरात ग्रुप ऑफ सेव्हन (G7) ची वार्षिक बैठक होत आहे. जगातील श्रीमंत आणि औद्योगिक लोकशाही असलेल्या देशांचे नेते या शहरात एकत्र येत आहेत. भारताचे पंतप्रधान आणि जी-२० परिषदेचे यंदाचे अध्यक्ष नरेंद्र मोदी सेव्हनमध्ये सहभागी होण्यासाठी शुक्रवारी जपानमध्ये पोहोचले आहेत. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, जर्मनीचे चॅन्सेलर (पंतप्रधान) ओलाफ शोल्झ, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे हिरोशिमा येथे स्वागत केले. यांच्यासह युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मायकेल, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वोन डेर लेयन यांनीदेखील जी सेव्हन परिषदेला उपस्थिती दर्शविली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जी सेव्हन परिषदेचे या वर्षीचे यजमानपद जपान आणि त्यातही हिरोशिमा शहराला मिळवण्यामागे पंतप्रधान फुमियो किशिदा यांचा हेतू स्पष्ट आहे, तो म्हणजे अण्वस्त्रावर जगाने बंदी घालणे, हा अजेंडा बैठकीत मांडणे. ६ ऑगस्ट १९४५ ला हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकण्यात आला होता. अणुहल्ला झेलणारे हिरोशिमा हे जगातील पहिले शहर होते. त्यानंतर तीनच दिवसांनी ९ ऑगस्ट रोजी नागासाकी या जपानच्या दुसऱ्या शहरावर अणुहल्ला करण्यात आला होता. अमेरिकेने या दोन शहरावर अणुबॉम्ब टाकल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाचा शेवट करण्यात आला.

अणुबॉम्ब टाकल्यामुळे हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरात एक लाख १० हजार ते दोन लाख १० हजार एवढी जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये हिरोशिमाचे सर्वाधिक नुकसान झाले होते. हिरोशिमामध्ये ७० हजार ते एक लाख ४० हजार लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज त्या वेळी वर्तविण्यात आला होता. दोन्ही शहरांनी आजवर आण्विक शस्त्रांच्या वापराविरोधात आणि आण्विक निःशस्त्रीकरणासाठी सर्वात लक्षवेधी युक्तिवाद केला आहे. जपानवरील हल्ल्यानंतर आजतागायत कोणत्याही देशावर असा हल्ला झालेला नाही. तरीही अनेक देश आपली आण्विक ताकद वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत.

नुकतेच, रशियाने युक्रेनमधील युद्ध उद्दिष्ट साध्य करण्यात कोणत्याही थराला जाण्याची भाषा वापरत युक्रेनविरोधात आण्विक शस्त्र वापरण्याची धमकी दिली होती.

हे वाचा >> हिरोशिमा-नागासाकीवर अणुबॉम्ब का टाकला?

हिरोशिमा हे पर्वतरांगांनी वेढलेले एक सपाट शहर आहे. अणुबॉम्बच्या निर्मात्यांसाठी या विध्वंसक हत्यारांची चाचणी करण्यासाठी हे एक आदर्श लक्ष्य होते. आकाशातून योग्य उंचीवरून अणुबॉम्बचा जमिनीवर स्फोट घडवून आणला तर जवळजवळ संपूर्ण शहराचा नाश होऊ शकतो. हा बॉम्बस्फोट घडवून अमेरिकेचा उद्देश भयानक विनाश करणे तर होताच शिवाय जपान आणि सोव्हिएत युनियनला स्वतःच्या शक्तीची, सामर्थ्याची झलक दाखवणे, हादेखील एक उद्देश होता.

हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बचे नाव लिटिल बॉय असे देण्यात आले होते. अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी ८.१५ मिनिटांनी अमेरिकेच्या हवाई दलाचे पायलट पॉल टिब्बेट्स यांनी ‘इनोला गे’ या बोइंग बी-२९ विमानातून उड्डाण घेतले. या विमानातून हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकण्यात आला. अणुबॉम्ब टाकल्यानंतर ७० टक्के इमारती जमीनदोस्त झाल्या. अणुहल्ल्यानंतर किरणोत्सारामुळे पुढच्या दशकभरात हिरोशिमामध्ये मृत्यू होत होते. अणुबॉम्ब टाकल्यानंतर १६ तासांनी अमेरिकेने जाहीर केले की, हा अणुबॉम्ब होता.

‘लिटल बॉय’ने हिरोशिमावर १५ किलोटन टीएनटीच्या बलाने अणुबॉम्ब टाकला. तर ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०२ वाजता ‘फॅट मॅन’ नावाचा अणुबॉम्ब नागासाकी या शहरावर टाकला. हा प्लूटोनियम बॉम्ब हिरोशिमामध्ये वापरलेल्या बॉम्बपेक्षा अधिक शक्तिशाली होता. त्यातून २२ किलोटनचा स्फोट झाला. मात्र जमिनीचा असमतोल असल्यामुळे या शहराचे कमी नुकसान झाले. नागासाकी बॉम्बस्फोटानंतर सहा दिवसांनी १५ ऑगस्ट रोजी सम्राट हिरोहितोने जपानच्या आत्मसमर्पणाची घोषणा एका रेडिओ प्रसारणात केली.

हिरोशिमा आणि नागासाकी दोन्ही शहरे पुन्हा उभी राहिली आहेत. हिरोशिमा पिस मेमोरियल पार्कला जी सेव्हन गटाच्या नेत्यांनी भेट दिली. या वेळी हिरोशिमा उद्ध्वस्त झाल्याबद्दल आणि यामुळे मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांप्रति श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hiroshima the worlds first city to be struck by a nuclear bomb and venue of the g7 2023 summit kvg