सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गद्दार’ शब्द भलताच गाजतो आहे. ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी थेट युनेस्कोकडे २१ जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय इतिहासातील दोन गद्दारांविषयी जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गद्दार म्हणजे नक्की कोण? याची परिभाषा म्हणावी तितकी सोप्पी असेलच असे नाही. भारतीय इतिहासाला गद्दारांची परंपरा आहे. त्या परंपरेतील गद्दार म्हणून नावाजलेले वीर, सगळ्यांसाठीच गद्दार असतील असेही नाही. या विषयी समजावून घेण्यासाठी रामायणातील बिभीषणाचे उदाहरण उत्तम ठरू शकेल. रावणाची बाजू चुकीची असली, तरी आपल्याच भावाच्या विरोधात जावून रामाला मदत करणे, ही घटना अनेकांच्या दृष्टिकोनातून गद्दारी ठरली. म्हणूनच किंबहुना घरका भेदी लंका ढाए.. हा वाक्प्रचार प्रचलित झाला असावा. परंतु हे खरे असले तरी बिभीषणाला आपण गद्दार न ठरवता, सत्याच्या बाजूने असणारा रामभक्त मानतो. त्यामुळे गद्दार म्हणून नावारूपाला आलेल्या प्रभृतींकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यक्तिश: वेगवेगळा असू शकतो.

आणखी वाचा: विश्लेषण: भारत आणि पाकिस्तानात अकबर आणि औरंगजेब यांच्या परस्परविरोधी प्रतिमा का आढळतात?

अकबराच्या नवरत्नांपैकी एक परंतु इतिहासात ठरला गद्दार असा राजा मानसिंग

राजा मानसिंग हे पराक्रमी राजपूत होते. त्यांचे वडील भगवानदास हे अकबराच्या विश्वासू सरदारांपैकी एक होते. राजा मानसिंग यांची बुद्धिमत्ता व पराक्रम यांमुळे अकबराच्या दरबारात त्यांना उच्च व मानाचे स्थान होते. किंबहुना बंगाल, ओडिशा, बिहार, काबूल, दक्षिण भारत इत्यादी ठिकाणी गाजवलेल्या पराक्रमामुळे मुघल साम्राज्य वाढीस लागले. आमेरचा प्रसिद्ध किल्ला राजा मानसिंग यांनीच बांधलेला आहे. जोधाबाई या मानसिंग यांच्या सख्या आत्या. जोधाबाईंचा अकबराशी झालेला विवाह, हा आज अनेक गाजलेल्या प्रेमकथांपैकी एक असला तरी प्रत्यक्ष वादग्रस्त मुद्दा होता. ज्या काही मोजक्या राजपूत राजांनी या विवाहाला विरोध केला त्यात महाराणा प्रताप यांचा समावेश होता. अकबराच्या राज्य विस्ताराच्या मोहिमेत अकबराने मानसिंग यांना मेवाडच्या राणा प्रताप यांच्याकडे मुघल अधिपत्य स्वीकारण्याचा प्रस्ताव घेवून पाठविले होते. महाराणा प्रताप यांनी तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. किंबहुना त्यांच्यातील संभाषणा विषयीच्या आख्यायिकेत महाराणा प्रताप यांनी हा प्रस्ताव असल्याचे कळताच राजा मानसिंग यांच्या सोबत जेवण्यासही नकार दिला होता. पुढे महाराणा प्रताप यांनी दिलेल्या नकाराची परिणीती मेवाड विरुद्ध मुघल अशा युद्धात झाली. हे युद्ध हळदी घाटातील युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. मुघलांच्या बाजूने लढताना मानसिंग यांनी पराक्रमाची शर्थ केली. महाराणा प्रताप या युद्धात जखमी झाले होते. त्यामुळे मानसिंग यांचा विजय झाला. मेवाड हे मुघल साम्राज्याचा भाग झाले. या पराभवानंतरही महाराणा प्रताप राना-वनात राहून मुघलांशी लढत राहिल्याचा इतिहास आहे. मानसिंग यांचा पराक्रम मोठा होता, परंतु अकबरासाठी आपल्याच भूमीशी त्यांनी केलेली प्रतारणा त्यांना इतिहासात गद्दार ठरवून गेली. याविषयीची माहिती अमरकाव्य रत्नावली तसेच प्रसिद्ध अभ्यासक जेम्स टॉड यांच्या राजस्थान विषयीच्या (Annals and Antiquities of Rajasthan) संशोधनात मिळते.

आणखी वाचा: विश्लेषण: श्रीलंकेत हिंदू मंदिरे का उद्ध्वस्त होत आहेत? सिंहली विरुद्ध तमीळ हिंदू संघर्ष का धुमसतोय?

कनोजचा जयचंद ठरला प्रेमकथेचा शत्रू

जयचंद्र किंवा जयचंद हा उत्तर भारतातील गढवाल घराण्यातील एक राजा होता. जयचंद यांनी कनौज आणि वाराणसी या महत्त्वाच्या शहरांसह गंगेच्या मैदानात अंतरवेदी देशावर राज्य केले. पृथ्वीराज रासो हे काव्य पृथ्वीराज चौहान व जयचंद यांच्या संबंधांविषयी जाणून घेण्यास प्रमुख साधन मानले जाते. या काव्यात नमूद केल्याप्रमाणे संयोगिता ही राजा जयचंद यांची मुलगी होती, पृथ्वीराज चौहान व संयोगिता यांचे प्रेम संबंध होते. जयचंद यांना हा विवाह मान्य नव्हता. पृथ्वीराज चौहान यांनी संयोगिताशी पळून जाऊन विवाह केला. त्यामुळेच जयचंद यांनी मुहम्मद घुरी याच्याशी हात मिळवणी करून दिल्लीवर- पृथ्वीराज चौहान यांच्यावर आक्रमण केले. यात पृथ्वीराज चौहान यांचा पराभव झाला. दिल्ली घुरीच्या हाती गेली. याच संदर्भामुळे जयचंद यांना परकीयांची मदत घेऊन स्वकीयांचा पराभव केला म्हणून ‘गद्दार’ संबोधले गेले. परंतु येथे लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे या कथेविषयी अभ्यासकांमध्ये मतमतांतरे आहेत . आल्हा, प्रबंध चिंतामणी, हमीरा महाकाव्य अशा वेगवेगळ्या लिखित साधनांमधून जयचंद आणि पृथ्वीराज यांच्याविषयीच्या वेगवेगळ्या कथा सापडतात. आल्हा हे बुंदेलखंड मधील स्थानिक महाकाव्य आहे. यात नमूद केलेल्या कथेनुसार पृथ्वीराज चौहान व जयचंद हे मावस भाऊ होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या पत्नी या नात्याने एकमेकींच्या सख्या बहिणी होत्या. महोबाच्या राजकुमाराशी पृथ्वीराज चौहान याच्या बेला नावाच्या मुलीचे लग्न झाले होते. परंतु वरातीत आल्हा व उडल नामक कनिष्ठ जातीच्या लढवय्यांना पाहून पृथ्वीराज चौहानाने बेलाची पाठवणी करण्यास नकार दिला. त्यामुळेच त्या लग्न मंडपाचे रूपांतर युद्ध भूमीत झाले. महोबाचा राजकुमार यात मारला गेला, त्यामुळे बेला सती गेली. तर दुसरीकडे कनोजच्या जयचंदने महोबाचे राज्य हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. या कथेनुसार ज्या वेळी हे राजपूत एकमेकांमध्ये लढण्यात व्यग्र होते. त्यावेळी घुरीने दिल्ली काबीज केली. जैन साहित्यातील प्रबंध चिंतामणी व हमीरा महाकाव्यानुसार पृथ्वीराज चौहान याने मुहम्मद घुरीचा अनेकदा पराभव केला होता. परंतु नंतरच्या काळात तो निष्काळजी झाल्याने, तो झोपेत असताना घुरीने आक्रमण केले. या संदर्भांमध्ये जयचंदचा कुठेही संदर्भ नाही. त्यामुळे राजा जयचंद यांना ‘गद्दार’ मानावे की नाही याविषयी अभ्यासकांमध्ये एकवाक्यता नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History of indian traitors from mansingh to jaichand svs