दक्षिण अमेरिकेतील ब्राझील या देशाच्या सांस्कृतिक जडणघडणीत फुटबॉल आणि सांबा नृत्य यांचा मोठा वाटा आहे. नागरिकांमध्ये लोकप्रिय असलेले हे दोनही प्रकार या देशाची राष्ट्रीय प्रतीके बनली मानली जातात. मात्र आता या देशाच्या राष्ट्रीय प्रतीकांमध्ये नवी भर पडली आहे, कॅरामेलो या भटक्या श्वानाची. रस्त्यावर भटकणारे आणि दीर्घकाळ दुर्लक्षित राहणारे हे कुत्रे अचानक ब्राझील देशाचे राष्ट्रीय चिन्ह बनले आहेत. या देशात या कुत्र्याला इतके महत्त्व का आले, याविषयी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॅरामेलो श्वानाविषयी प्राथमिक माहिती…

कॅरामेलो हा ब्राझील देशातील मिश्र प्रजातीचा श्वान आहे. साधारण तपकिरी रंगाच्या या श्वानाच्या पाठीवर कारमेल रंगाचा डाग असतो. हा डाग एखाद्या कोटसारखा दिसतो. जणू काही या श्वानाने कारमेल रंगाचा कोट परिधान केला आहे. त्यामुळे या श्वानाला कॅरामेलो असे म्हणतात. रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या या भटक्या श्वानांना फिरस्ते नागरिक किंवा प्राणीप्रेमी यांच्याकडून खाद्यपदार्थ दिले जातात. त्यावरच त्यांची गुजराण होते. अनेक वर्षे हे भटके श्वान नागरिकांकडून दुर्लक्षित झाले होते. मात्र आता या भटक्या श्वानांना महत्त्व आले असून देशात ते लोकप्रिय झाले आहेत.

हेही वाचा : जगात किती प्लास्टिक कचरा जमा होतो? कोणत्या प्रकारचे प्लास्टिक सर्वाधिक आढळते? प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्याचे प्रयत्न जगभर विफल का?

कॅरामेलो श्वानाची लोकप्रियता कशी वाढली?

‘हर कुत्ते के दिन आते है’ ही हिंदी म्हण ब्राझीलमधील कॅरामेलो श्वानाच्याबाबत खरी ठरली. दीर्घकाळ दुर्लक्षित कॅरामेलो भटके श्वान अचानक देशात लोकप्रिय झाले. या श्वानावर समाजमाध्यमांत विविध संदेश, मिम्स, चित्रफिती, लघुपट प्रसिद्ध झाले आहेत. या देशांतील विविध कार्निव्हलमध्ये कॅरामेलो श्वान सहभागी होत आहेत. २०१९ मध्ये कॅरामेलो श्वानाची एक चित्रफीत इंटरनेटवर प्रसिद्ध झाली आणि हे भटके श्वान ब्राझीलच्या संस्कृतीचा एक भाग बनले. समाजमाध्यमांवर या गोंडस कुत्र्याचे चित्र दर्शवून विविध पोस्ट प्रसिद्ध झाल्या. एका नृत्य कार्यक्रमात व्यासपीठावर लघुशंका करणारा कॅरामेलो किंवा सीपीआर प्रशिक्षणात छातीवर दाब देऊन खेळ खेळणारा श्वान… अशा प्रकारच्या चित्रफिती प्रसिद्ध झाल्यानंतर हा श्वान देशभरात चर्चेचा विषय झाला. ब्राझिलियन रियाल नोटेवर कॅरामेलोचे चित्र प्रसिद्ध करण्यासाठी जनचळवळ चालविण्यात आली. अखेर २०२० मध्ये २०० रियालच्या नोटेवर या श्वानाचे चित्र छापण्यात आले. नेटफ्लिक्सवर ‘कॅरामेलो’ नावाचा चित्रपटही प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याचे चित्रीकरण सध्या सुरू आहे.

कॅरामेलो श्वान अचानक प्रसिद्ध कसा झाला?

श्वान हा सातत्याने इंटरनेटवरचा आवडता प्राणी राहिला आहे. ‘गूगल ट्रेंड्स’नुसार कुत्रा हा नेहमीच अधिक शोधला जाणारा प्राणी आहे. कुत्र्यासंबंधीची माहिती अधिक प्रसारित केली जात आहे. ब्राझीलमध्ये जेव्हा कॅरामेलोच्या चित्रफिती प्रसिद्ध झाल्यानंतर या देशातील नागरिकांना त्याच्याबाबत सहानुभूती आणि जिव्हाळा वाटून आला. कॅरामेलो हा भटका श्वान असला तरी त्याच्यामध्ये काही सद्गुण असल्याचे ब्राझिलियन नागरिकांना वाटते. कॅरामेलो हे अधिक दयाळू व प्रामाणिक श्वान आहेत. खूप कमी वेळेला ते किरकिर करतात. भटके श्वान असलेले कॅरामेलो फार कमी वेळा नागरिकांना त्रास देतात. त्यामुळे ब्राझिलियन नागरिकांना त्यांच्याबाबत ममत्व वाटून आले आणि हा श्वान देशभरात लोकप्रिय झाला.

हेही वाचा : अवघा २५ किलोमीटर सरासरी वेग… मालगाड्यांचा वेग कमी झाल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत आहे का?

नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध होणाऱ्या चित्रपटाविषयी…

ब्राझीलमधील चित्रपट दिग्दर्शक आणि सह-लेखक डिएगो फ्रीटास हे कॅरामेलोवर आधारित चित्रपट तयार करत आहेत. ‘‘कॅरामेलो ब्राझीलचे महान प्रतीक बनले आहे. ब्राझीलच्या नागरिकांच्या हृदयात त्याने उच्च स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्याच्यावरील चित्रपट सर्वांनाच आवडेल,’’ असे फ्रीटास म्हणाले. ब्राझीलच्या नागरिकांच्या हृदयाला स्पर्श करणे आणि कॅरामेलोच्या आत्मीयतेचे कृतीत रूपांतर करणे हे या चित्रपटाचे उद्दिष्ट आहे. २६ नोव्हेंबर रोजी चित्रीकरण पूर्ण झाल्यापासून हा चित्रपट कधी प्रसिद्ध होणार या प्रतीक्षेत प्रेक्षक आहेत. या चित्रपटात बेघर असलेले सहा कुत्रे आहेत, ज्यांना चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाचा भाग असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी दत्तक घेतले. हा या कथेचा परिणाम असल्याचे फ्रीटास म्हणाले. हा चित्रपट खूपच प्रेरणादायी ठरणार असून या भटक्या श्वानाविषयी अधिक ममत्व वाटले जाणार असून त्यांना दत्तक घेण्यामध्ये वाढ होईल, असा विश्ववास फ्रीटास यांनी व्यक्त केला.

sandeep.nalawade@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How a caramel coloured stray dog became a brazilian national symbol print exp css