Premium

इम्प्लांट्सच्या मदतीने आता अर्धांगवायू झालेली व्यक्ती चालू शकणार; जाणून घ्या सविस्तर…

४० वर्षीय गर्ट जान ओस्काम यांचा २०११ साली चीनमध्ये वास्तव्यास असताना अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यांचे शरीराच्या कंबरेखालील भागावर नियंत्रण राहिले नाही.

paralysis
सांकेतिक फोटो

विज्ञानाच्या जोरावर आज माणूस कधीकाळी कल्पनेत असलेल्या गोष्टी प्रत्यक्षात घडवून आणत आहे. शिक्षण, उद्योग, कृषी अशा प्रत्येक क्षेत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवाने प्रगतीची अनेक शिखरे सर केली आहेत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आज आरोग्य क्षेत्रातही मोठा बदल झाला आहे. अनेक असाध्य आजारांवर आज औषधे शोधण्यात आली आहेत. कधीही उपचार न होणाऱ्या दुर्मिळ आजारांवरही वेगवेगळ्या उपचार पद्धती शोधून काढण्यात आल्या आहेत. आता तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अर्धांगवायू झालेली माणसे पुन्हा एकदा चालायला लागली आहेत. याचेच एक उदाहरण नव्याने समोर आले आहे. अपघातानंतर कंबरेच्या खालच्या भागावरील नियंत्रण गमावून बसलेली गर्ट जान ओस्काम व्यक्ती आता चालायला लागली आहे. ही क्रांती नेमकी कशी घडली? शास्त्रज्ञांनी नेमके काय केले? हे जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपघात झाल्यामुळे कंबरेखालचा भाग निश्चल…

४० वर्षीय गर्ट जान ओस्काम यांचा २०११ साली चीनमध्ये वास्तव्यास असताना अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यांचे शरीराच्या कंबरेखालील भागावर नियंत्रण राहिले नाही. परिणामी त्यांना चालता येत नव्हते तसेच त्यांना पायांची हालचाल करणे अशक्य होऊन बसले होते. मात्र आता वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या उपकरणांच्या मदतीने ओस्काम यांच्या अर्धांगवायूवर मात केली आहे. आता ओस्काम चालू शकतात. याबाबत बोलताना, ‘मागील १२ वर्षांपासून मी माझ्या पायांवर उभे राहण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र आता मी चालायचे कसे हे शिकलो आहे. मी आता पहिल्यासारखे चालू शकतो,’ असे ओस्काम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: डिसँटिस यांचे ट्रम्प यांच्यासमोर आव्हान… बायडेन यांच्याविरोधात लढ्याची कुणाला संधी?

मेंदू आणि पाठीच्या मणक्यादरम्यान ‘डिजिटल ब्रिज’

ओस्काम यांना पुन्हा चालता यावे यासाठी स्वित्झर्लंडमधील संशोधकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. ‘नेचर’ या नियतकालिकात याबाबतचा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. या लेखानुसार संशोधकांनी ओस्काम यांच्या शरीराला जेथे इजा झालेली आहे, त्या भागाला वगळून मेंदू आणि पाठीच्या मणक्यादरम्यान एक ‘डिजिटल ब्रिज’ निर्माण केला आहे. या डिजिटल ब्रिजच्या मदतीने ओस्काम चालू तसेच उभे राहू शकत आहेत.

चालता यावे म्हणून अनेक संशोधकांनी घेतली मेहनत

या संशोधनामुळे ओस्काम आता चालू शकतात. इतकेच नव्हे तर ते या उपकरणांच्या माध्यमातून कुबड्यांशिवाय चढणीवरही चढू शकत आहेत. साधारण वर्षभरापूर्वी मेंदू आणि पाठीच्या मणक्यात डिजिटल ब्रिज उभारण्यासाठी ओस्काम यांच्या शरीरात इम्प्लांट्स टाकण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू त्यांचे शरीर पूर्ववत होत होते. नंतरच्या काळात हे इम्प्लांट्स बंद केल्यानंतरही ओस्काम चालण्यास सक्षम होते. या संशोधनाबाबत लॉसने येथील स्वीस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील पाठीच्या मणक्याचे तज्ज्ञ ग्रेगोयर कोर्टीन यांनी अधिक माहिती दिली आहे. “आम्ही इम्प्लांट्सच्या मदतीने ओस्काम यांचे विचार जाणून घेतले. तसेच वेगवेगळ्या उपकरणांच्या मदतीने आम्ही या विचारांची मदत घेऊन मणक्याला चालना देण्याचा प्रयत्न केला. ओस्काम त्यांच्या शरीराची हवी तशी हालचाल करण्यास सक्षम ठरावेत यासाठी आम्ही हा प्रयत्न केला,” असे कोर्टीन यांनी सांगितले.

हेही वाचा >>> विश्लेषण: कर्ज घोटाळेखोरांना जरब बसणार? केंद्राचे नवे आदेश काय आहेत?

उपचार घेतल्यानंतर ओस्काम पायी चालण्यास, सायकल चालवण्यास सक्षम

कोर्टीन यांच्या नेतृत्वाखाली २०१८ साली वेगवेगळ्या संशोधकांनी इलेक्ट्रिक पल्स जनरेटर्सच्या मदतीने मेंदूला संदेश पाठण्याचे तंत्र विकसित केले होते. या तंत्राच्या मदतीने मेंदूला संदेश देऊन अर्धांगवायू झालेली व्यक्ती सायकल चालवण्यास तसेच पायी चालण्यास सक्षम ठरली होती. अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीला चालण्यास मदत करणाऱ्या तंत्रज्ञानात मागील वर्षी आणखी संशोधन झाले. त्यामुळे आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने अर्धांगवायू झालेली व्यक्ती पोहू शकतेय, चालू शकतेय. तसेच उपचार घेतल्यानंतर संबंधित व्यक्ती थेट सायकलही चालवू शकतेय.

हेही वाचा >>> ‘सेंगोल’ निर्मितीचे काम वुम्मीदी परिवाराकडे कसे आले? जाणून घ्या संसदेत स्थापित केल्या जाणाऱ्या राजदंडाचा ऐतिहासिक संदर्भ!

ओस्काम यांच्या प्रकृतीतील सुधारणा अचानकपणे थांबली, मात्र संशोधकांनी मार्ग काढलाच

गेल्या वर्षी ओस्काम यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्या काळात ते काही प्रमाणात चालण्यास सक्षम ठरले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत होत असलेली सुधारणा अचानकपणे थांबली. याबाबत बोलताना ‘अर्धांगवायू झालेल्या माझ्या शरीराच्या अवयवांना चालण्या देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्या काळात एखादी बाहेरची शक्ती माझ्या शरीरावर नियंत्रण ठेवतेय, माझ्या शरीराला आज्ञा देतेय, असे मला वाटायचे. माझे मन आणि शरीर यांच्यामध्ये एक बाह्य शक्ती काम करत आहे, असे मला वाटायचे,’ असे ओस्काम यांनी सांगितले होते. मात्र संशोधकांनी ओस्काम यांना जाणवणाऱ्या अडचणींवर उपाय शोधून काढला. त्यानंतर अगोदर ‘बाह्य शक्ती मला आदेश द्यायची, असे मला वाटायचे. मात्र आता मीच या बाह्य शक्तीवर नियंत्रण ठेवतोय, असे मला वाटायला लागले आहे,’ अशी सकारात्मक प्रतिक्रिया ओस्काम यांनी दिली. सध्या ओस्काम तंत्रज्ञानाच्या मदतीने अर्धांगवायूवर मात करून चालत आहेत. शरीरावरील नियंत्रण गमावलेल्यांसाठी हे संशोधन वरदान ठरू शकते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-05-2023 at 15:08 IST
Next Story
विश्लेषण: डिसँटिस यांचे ट्रम्प यांच्यासमोर आव्हान… बायडेन यांच्याविरोधात लढ्याची कुणाला संधी?