Zainab and Buta Singh tragic love story काल पाकिस्तान आणि आज भारत स्वतंत्र होऊन ७८ वर्ष झाली. पारतंत्र्याच्या- फाळणीच्या अनेक जखमा घेऊन आपला देश प्रगतीच्या वाटा चोखाळत आहे. या देशाला पारतंत्र्यापेक्षा अधिक घायाळ हे फाळणीने केलं. त्याचाच परिणाम म्हणून आजही आपण बांगलादेशची भयाण परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहात आहोत. फाळणीने केवळ दोन देशच वेगळे केले असे नाहीत; तर अनेक मनंही विभक्त झाली आणि म्हणूनच काही शोकांतिकांनी जन्म घेतला. अशीच एक शोकांतिका जैनब आणि बुटा सिंगच्या रूपाने भारतीय मनावर कायमची कोरली गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जैनब आणि बुटा सिंग

जैनब आणि बुटा सिंग यांनी १९४७ मध्ये विवाह केला, असे सांगितले जाते; परंतु, त्यात एकवाक्यता नाही. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांना दोन मुलंही झाली. परंतु या जोडप्याला जबरदस्तीने वेगळे करण्यात आले. त्यांची कहाणी फाळणीचे प्रतीक आहे, कारण त्यांचे नाते एकाच वेळी प्रेम आणि विरहाची कहाणी सांगणारे आहे. भारत-पाकिस्तान विभाजनाप्रमाणे यांचेही विभाजन झाले आणि त्याचीच कथा सांगणाऱ्या अनेक आवृत्त्याही निर्माण झाल्या.

व्हॉईसेस फ्रॉम द पार्टीशन ऑफ इंडिया

‘द अदर साइड ऑफ सायलेन्स: व्हॉईसेस फ्रॉम द पार्टीशन ऑफ इंडिया’ या उर्वशी बुटालिया लिखित पुस्तकात लेखिकेने तत्कालीन कागदपत्रांच्या आधारे नेमकं काय घडलं असेल, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. बुटालिया यांच्या कथेत जैनबचे पाकिस्तानला जाणाऱ्या ताफ्यातून अपहरण झाले होते. त्यानंतर बुटा सिंगला विकली जाईपर्यंत ती एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित होत राहिली. प्रचलित कथेनुसार बुटा सिंग अमृतसरचा जाट शीख होता. परंतु बुटालिया यांनी दिलेल्या कथेत बुटा सिंगच्या गावाचा उल्लेख नाही. जैनबला विकत घेण्यात आलं होत, हा ठपका असतानाही बुटा सिंगने जैनबशी लग्न केलं. बुटा सिंग आणि जैनब एकमेकांवर प्रेम करू लागले होते. बुटालिया यांच्या कथेनुसार त्यांना दोन मुली झाल्या. त्यांच्या नातेसंबंधातून फाळणीवर प्रतिकात्मक मात झालेली दिसते.

अधिक वाचा:  Indira Gandhi : एक अधुरी प्रेम कथा… इंदिरा आणि फिरोज

फाळणीचे भूत

…पण फाळणीचे भूत शमले नव्हते. ६ डिसेंबर, १९४७ रोजी, भारत आणि पाकिस्तानने आंतर-प्रभुत्व करारावर स्वाक्षरी केली, त्यामुळे या करारा अंतर्गत शक्य तितक्या अपहरण केलेल्या महिलांना परत करणे दोन्ही राष्ट्रांवर बंधनकारक होते. या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी अध्यादेश काढण्यात आला. त्याअंतर्गत, १ मार्च १९४७ नंतर एखाद्या महिलेचा तिच्या समुदायाशी संबंधित नसलेल्या पुरुषाशी संबंध आलेला असल्यास तिचे अपहरण करण्यात आले असे मानले गेले. यापैकी एक शोध गट बुटा सिंगचा घराचा दरवाजा ठोठावत आला. बुटा सिंगच्या पुतण्यांनी जैनबची माहिती शोध पथकाकडे दिली असे सांगितले जाते. जैनब आणि तिची मुले पाकिस्तानात गेल्यावर कौटुंबिक मालमत्तेत आपला वाटा वाढेल असे वाटल्याने त्यांनी हे केलं होत. कायद्यानुसार बुटा सिंग आणि भारत सोडून जायचे आहे की, नाही याबद्दल जैनबचे मत जाणून घेण्याची आवश्यकता नव्हती. ज्यावेळी शोध पथक तिच्या शोधात आले त्यावेळी तिला पाहण्यासाठी संपूर्ण गाव गोळा झाले होते. ती तिच्या लहान मुलीला आणि वैयक्तिक सामान घेऊन बाहेर आली. जीपजवळ पोहोचल्यावर ती बुटा सिंगकडे वळली आणि त्यांच्या मोठ्या मुलीकडे बोट दाखवत म्हणाली, “या मुलीची काळजी घ्या आणि काळजी करू नका. मी लवकरच परत येईन. ”

इस्लाम आणि पाकिस्तानी व्हिसा

जैनबच्या जाण्याने बुटा सिंग अस्वस्थ झाला होता. लवकरच त्याला पाकिस्तानमधून आलेलं पत्र मिळालं आणि त्याची चिंता अधिकच वाढली. पत्नीचे कुटुंबीय तिच्यावर लग्नासाठी दबाव आणत असल्याने त्याला तातडीने पाकिस्तानला येण्यात पत्रात सांगितले होते. पाकिस्तानला जाण्यासाठी पैसा हवा म्हणून बुटा सिंगने आपली जमीन विकली आणि दिल्लीत आला, जिथे त्याने इस्लाम स्वीकारला आणि जमील अहमद हे नाव घेतले. पाकिस्तानचे नागरिक बनू इच्छिणारा मुस्लिम म्हणून पाकिस्तानला जाणे सोपे जाईल असे त्याला वाटले होते. त्याने पाकिस्तानी पासपोर्टसाठी अर्ज केला. त्याने बराच काळ वाट पाहिली पण त्याचा पासपोर्ट आला नाही. पाकिस्तानच्या दूतावासात त्याच्या सततच्या जाण्यामुळे तो पाकिस्तानी अधिकाऱ्यांमध्ये इतका परिचित झाला की, त्यांनी त्याला पाकिस्तानसाठी अल्पकालीन व्हिसा मंजूर केला.

तो पोहोचला, पण…

पाकिस्तानमध्ये, जैनबच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. तिच्या आई-वडिलांचं निधन झालं होत. पूर्व पंजाबमधील मालमत्तेच्या बदल्यात या कुटुंबाला लायलपूर येथे जमीन देण्यात आल्याने, त्या जमिनीची कायदेशीर वारस जैनबआणि तिची बहीण होती. त्यांच्या जमिनीला लागूनच त्यांच्या मामाची जमीन होती. ही सर्व जमीन कुटुंबात ठेवण्यासाठी उत्सुक असलेल्या मामाने जैनबवर आपल्या चुलत भावाच्या मुलाशी लग्न करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. तिने प्रतिकार केला. जैनबच्या चुलत भावालाही तिच्याशी लग्न करण्याची इच्छा नव्हती, कारण ती एका शिखाबरोबर राहून आलेली होती. जैनब कौटुंबिक दबावाचा प्रतिकार करत असतानाच बुटा सिंगला पाकिस्तानकडून एक पत्र मिळाले, जे तिच्या शेजाऱ्याने तिच्या सांगण्यावरून लिहिले होते. बुटा सिंग पाकिस्तानात पोहोचला तेव्हा जैनबचे लग्न ठरलेल्या मुलाशी झाले होते. लेखिका म्हणते कदाचित तिला वाटले असेल की, बुटा सिंग तिच्यासाठी कधीच येणार नाही.

मृत्यूनंतरही इच्छा अपुरीच!

जैनबला शोधण्याच्या घाईत, बुटा सिंग पाकिस्तानला पोहोचल्याच्या २४ तासांच्या आत पोलिसांना कळवायला विसरला. २०१७ मध्येही त्याला अटक करण्यात आली आणि कोर्टात हजर करण्यात आले. त्याने आपली कहाणी मॅजिस्ट्रेटला सांगितली, ज्यांनी जैनबवर समन्स बजावले. जैनब कोर्टात आली, तिच्या नातेवाईकांनी तिच्या भोवती गराडा घातला होता. तिने मॅजिस्ट्रेटला सांगितले: “मी एक विवाहित स्त्री आहे. आता या माणसाशी माझा काहीही संबंध नाही. मी त्याच्या घरून आणलेल्या दुसऱ्या मुलाला तो घेऊ शकतो…” या प्रसंगाच्या काही तासांनंतर रात्री, बुटा सिंगने धावत्या ट्रेनसमोर स्वतःला झोकून दिले. त्याचा मृतदेह लाहोरला शवविच्छेदनासाठी नेण्यात आला होता. त्याच्या मृतदेहाजवळ एक आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी सापडली. त्यात त्याने जैनबच्या गावात त्याचे दफन करण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. पण तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना बुटा सिंगची शेवटची इच्छा पूर्ण करू दिली नाही आणि त्याला लाहोरमध्ये दफन करण्यात आले.

तरीही शेवटी लेखिकेचा एक प्रश्न अनुत्तरित राहतो, खरंच जैनबचं बुटा सिंगवर प्रेम होत की, जगण्याची तात्पुरता केलेली तडजोड? की दोन्ही?

अधिक वाचा: रवींद्रनाथ टागोर जेव्हा मराठी मुलीच्या प्रेमात पडले; टागोरांच्या आयुष्यातील अल्पायुषी प्रेमकथा!

बचाव आणि प्रेम

कृष्णा सोबती यांनी आलोक भल्ला यांना सांगितलेल्या आवृत्तीत बुटालिया यांनी निर्माण केलेलं प्रश्न निरर्थक ठरतात. सोबती यांनी कथेवर संशोधन केल्याचा दावा केलेला नाही. त्यांनी सांगितलेली आवृत्ती लोककथांवर अवलंबून आहे. सोबती यांच्या आवृत्तीत जैनबला नाव नाही. ती ‘साधी मुस्लिम मुलगी’ आहे. दंगलखोर जमावापासून पळून जात असतानाच ती बुटा सिंगच्या घरात धावत आली आणि अंगणातील गवताच्या गंजीखाली लपली. संध्याकाळी बुटा सिंग ज्यावेळी घरी आला त्यावेळी ती त्याच्या नजरेस पडली. त्याने तिला आश्वस्त केले “भिऊ नकोस, तू इथे सुरक्षित आहेस. दंगल संपेपर्यंत घरातच राहा.” मुलगी बाहेर आली आणि त्याच्या घरी राहू लागली. बुटा सिंगने तिच्यासाठी स्वयंपाक केला तरी ते एकमेकांशी बोलत नव्हते. काही दिवसानंतर गावातल्या लोकांना बुटा सिंगच्या घरात मुस्लिम मुलगी असल्याचे समजले. “त्याने मोठ्या धैर्याने तिचा बचाव केला आणि शेजाऱ्यांना तिला इजा न करण्याचा इशारा दिला. त्याचा प्रामाणिकपणा आणि धैर्य या मुलीला स्पर्शून गेले. ती त्याच्यासोबत राहिली. लवकरच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. कोणत्याही परिस्थितीत, तिच्याकडे फारसे पर्याय नव्हते. गावकऱ्यांनी बुटा सिंगला त्या मुस्लिम मुलीशी लग्न करण्याचे सुचवले.

न्यायालयात नकार आणि…

त्यांनी लग्न केले, परंतु शोध पक्ष त्यांच्या दारात आला तेव्हा त्यांना मुलं नव्हती. सर्च पार्टीमध्ये तिचे भाऊ होते. त्यांनी मुस्लिम मुलीला परत पाकिस्तानात नेण्याचा आग्रह धरला. बुटा सिंगने अधिकाऱ्यांना विनंती केली की, तिला तिच्यासोबत राहण्याची परवानगी द्यावी कारण तिचे स्वतःच्या इच्छेने त्याच्याशी कायदेशीररित्या लग्न झाले आहे. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सोबती यांच्या आवृत्तीतही, बुटा सिंग तिच्या मागे पाकिस्तानला गेला. त्यांच्या लग्नाचे प्रकरण न्यायालयात गेले. मुस्लीम तरुणीला विचारण्यात आले की, तिने खरंच बुटा सिंगशी लग्न केले आहे का? पण तिने बोलण्यास नकार दिला. सोबती सांगतात येथे तिच्या मानसिक स्थितीची कल्पना करणे कठीण नव्हते. न्यायालयाने बुटा सिंगच्या विरोधात निर्णय दिला. बुटा सिंग इतका खचला की त्याने आत्महत्या केली.

फाळणीच्या आठवणींचे राजकारण

भूतकाळातील मौखिक कथांमध्ये अनेकदा नाट्यमय बदल होतात. कारण त्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातात. सोबती यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत, जैनब आणि बुटा सिंगची प्रेमकथा शीख शौर्य आणि सन्मानाच्या कल्पनांना उजाळा देणाऱ्या कथेत रूपांतरित झाली होती. बुटा सिंगने जैनबला विकत घेतले होते हे सोबती यांच्या आवृत्तीतून काढून टाकण्यात आले. त्याऐवजी, ती बुटा सिंग या बॅचलरच्या माणसाच्या घरात गेली असे म्हटले गेले, जो तिच्याबरोबर काहीही करू शकला असता परंतु त्याने तसे केले नाही. त्याच्या निर्दोष आचरणामुळे, मुस्लिम मुलगी त्याच्या प्रेमात पडली. तिच्या भावांमुळे त्यांचे प्रेम तुटले, जे भारतातून पाकिस्तानात गेले आणि आपल्या बहिणीला घेऊन जाण्यासाठी परत आले,असा उल्लेख आहे. ही कथा एवढी अजरामर झाली की, स्वातंत्र्य- फाळणी असा उल्लेख येतो त्या त्या वेळेस दोन्ही देशांतील लोक या कथेचे पारायण करतात!

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independence day why tragic love story of zainab and buta singh based on india pakistan partition so popular svs
Show comments