इजिप्तचे परराष्ट्र मंत्री डॉ. बद्र अब्देलत्ती यांनी गेल्या आठवड्यात नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली आणि भारत-इजिप्त संबंधांवर चर्चा केली. अब्देलत्ती यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे पुन्हा एकदा भारत-इजिप्त संबंधांच्या नव्या अध्यायाला सुरूवात झाली आहे. हमासने इस्रायलवर केलेला हल्ला व त्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर म्हणून गाझावर केलेले हल्ले (संयुक्त राष्ट्रांमधील तज्ज्ञांनी त्या हल्ल्यांचा नरसंहार असा उल्लेख केला होता) यांचा परिणाम भारत-इजिप्त संबंधांवर झाला होता. इजिप्तने इस्रायल व हमास दरम्यान सुरू असलेल्या संघर्षाकडे लक्ष केंद्रीत केले होते.

आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या २० कलमी शांतता प्रस्तावाने इस्रायल व गाझा दरम्यान सुरू असलेली हिंसा कमी झाली आहे. त्यामुळे भारताने २०२३ नंतर पुन्हा एकदा मध्य-पूर्वेकडे (Middle East) लक्ष केंद्रीत केले आहे. मध्य-पूर्वेमध्ये सुरू असलेला ‘इंडिया मिडल इस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEC)’ प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. भारत-इजिप्त दरम्यान २०२३ मध्ये राजनैतिक संबंध कसे होते? तसेच भारत-इजिप्त संबंधांमध्ये संरक्षण क्षेत्राची भूमिका काय? आणि इजिप्तबरोबर असलेले संबंध भारतासाठी भविष्यात महत्वाचे ठरतील का? यांचा हा आढावा.

भारत-इजिप्त या दोन देशांमध्ये एकमेकांना सहकार्य करण्याचा इतिहास असून शीतयुद्धात दोन्ही देशांची वैचारिक भूमिका सारखीच होती. तसेच मध्य पूर्वेमधील इस्लामिक राजेशाहीपेक्षा धर्मनिरपेक्षता व राष्ट्रवादाची भावना असणाऱ्या देशांना भारत नेहमीच प्राधान्य देत आला आहे. भारताच्या या भूमिकेमुळे दोन्ही देशांमध्ये सलोख्याचे संबंध आहेत. दरम्यान, मागील दशकात इजिप्तने स्थिरतेवर लक्ष केंद्रीत केले. इजिप्तमध्ये २०१३ मध्ये झालेल्या उठावानंतर अब्देल फतेह अल-सिसी सत्तेवर आले. त्यानंतर इजिप्तने मध्य-पूर्वेमध्ये वैचारिक मतभेदांना बाजूला ठेवून आखात, लेवंटाईन आणि उत्तर आफ्रिकेतील देशांशी संबंध प्रस्थापित केले. तसेच अब्राहम अकॉर्ड २०२० नुसार अरब देश व इस्रायलमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले.

इस्रायल-हमास संघर्षापूर्वीचे भारत-इजिप्तमधील राजनैतिक संबंध कसे होते?

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे ऑक्टोबर २०२२ मध्ये इजिप्तची राजधानी कैरो येथे गेले होते. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये भारत व इजिप्तमध्ये काही महत्वाच्या प्रकल्पांसाठी भागीदारी करण्याबाबत चर्चा झाली होती. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारत व इजिप्त दरम्यान असलेला व्यापार प्रथमच सर्वाधिक ७.२६ अब्ज डॉलरवर पोहचला होता. २०२३ मध्ये भारत व इजिप्तने अभूतपूर्व ऐतिहासिक राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते.

भारताचे लष्करप्रमुख मे २०२३ मध्ये इजिप्तच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल-सिसी यांची भेट घेतली होती. इजिप्तमध्ये भारतीय लष्कराची भूमिका या विषयावरील पुस्तक देखील त्यावेळी प्रकाशित करण्यात आले होते. त्याच वर्षी भारत व इजिप्तच्या लष्कराने राजस्थानमध्ये ‘सायक्लोन १’ या एकत्रित युद्धसराव केला.

२६ जानेवारी २०२३ रोजी नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल-सिसी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी झालेल्या पथसंचलनात इजिप्तच्या लष्कराने देखील सहभाग घेतला होता. त्यानंतर जून २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तच्या दौऱ्यावर गेले होते. ऑक्टोबर २०२३ मध्ये हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला केला. त्यानंतर इस्रायल व हमासमध्ये संघर्ष सुरू झाला. इजिप्तने इस्रायल व हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे भारत-इजिप्त दरम्यान सुरू असलेल्या महत्वाच्या विषयांवरील चर्चा स्थगित करण्यात आल्या.

भारत-इजिप्त संरक्षण क्षेत्रातील भागीदारी

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा इजिप्तने निषेध केला होता. त्याबद्दल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इजिप्तचे परराष्ट्र मंत्री अब्देलत्ती यांचे दिल्लीत आभार मानले. भारत-इजिप्तमध्ये संरक्षण सहकार्य कायम राहिले आहे. तसेच आफ्रिकन देशांना भारताकडून संरक्षण सामग्री निर्यात करण्यात इजिप्तची महत्वाची भूमिका आहे. भारत हा आफ्रिकेतील देशांना सुरक्षा सामग्री पुरवणारा एक महत्वाचा देश आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या इंडिया-आफ्रिका डिफेन्स डायलॉगमध्ये आफ्रिकेतील ५० देशांनी सहभाग नोंदवला होता. आफ्रिकेतील नागरिकांना भारतीय संरक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण देखील दिले जाते.

भारत-इजिप्त हे देश रशियाकडून मोठ्या प्रमाणात संरक्षण सामग्री खरेदी करतात. भारतीय बनावटीच्या एचएएल तेजस या लढाऊ विमानांची इजिप्तला होणारी विक्री काही कारणांमुळे अपयशी ठरली. परंतु, दोन्ही देश ‘हेलवान ३०० फायटर’ हे लढाऊ विमान संयुक्तपणे विकसित करत आहेत. तसेच दोन्ही देशांच्या लष्कराचा राजस्थानमधील वाळवंटात ‘सायक्लॉन’ युद्ध सराव आयोजित केला जातो. आफ्रिकन देशांना होणाऱ्या भारतीय संरक्षण सामग्री निर्यातीत इजिप्त महत्वाची भूमिका बजावतो.

भारतासाठी इजिप्तचे महत्व काय ?

भारत व इजिप्त दरम्यान अनेक प्रकल्पांवर काम सुरू आहे, त्यात प्रामुख्याने भारताच्या ‘इंडिया मिडल इस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEC)’ या प्रकल्पाचा समावेश आहे. यात अमेरिका देखील भागीदार आहे. तर इजिप्तच्या ‘इजिप्शियन सुएझ कॅनल इकॉनॉमिक झोन’ या प्रकल्पात इजिप्तने भारताला सहभागी करून घेतले आहे. इजिप्त हा मध्य-पूर्वेमधील एक महत्वाचा देश आहे. दरम्यान, इजिप्तने लाल समुद्र आणि भूमध्य समुद्रात उभारलेले बंदर हे इस्रायलच्या हैफा बंदराला एक पर्याय असल्याचे म्हटले जाते. जून २०२५ मध्ये इराणी क्षेपणास्त्रांनी हैफा शहरातील बंदराच्या परिसरात हल्ला केला होता. त्यामुळे हैफा बंदरापेक्षा इजिप्तच्या मालकीचे बंदर सुरक्षित असल्याचे इजिप्तचे म्हणणे आहे.

इस्रायल व पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेला संघर्ष थांबवण्यात तसेच ट्रम्प यांचा २० कलमी शांतता प्रस्ताव राबवण्यात इजिप्त महत्वाची भूमिका बजावत आहे. इजिप्तच्या शर्म-एल शेख येथे ‘गाझा शांतता शिखर परिषद’ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत पार पडली होती. गाझा पट्ट्यातील युद्ध संपुष्टात आणण्याचे उद्दिष्ट या परिषदेचे होते. दरम्यान, भारताच्या ‘इंडिया मिडल इस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEC)’ या प्रकल्पाचे यश इजिप्तवर अवलंबून असल्याचे म्हटले जाते.