पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत आहे. भारताने पुन्हा पाकिस्तानविरोधात मोठा निर्णय घेतला आहे. भारताने पाकिस्तानसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या विशाल हवाई क्षेत्रावरील प्रवेश प्रतिबंधित करण्याच्या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक तणाव आणखी वाढला आहे. भारतातील हवाई क्षेत्र बंद केल्याने पाकिस्तानचे कोणतेही नागरी किंवा लष्करी विमान भारतीय हवाई हद्दीतून जाऊ शकणार नाही. भारताच्या या निर्णयाचा पाकिस्तानला कसा फटका बसणार? या निर्णयाने पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स बंद करण्याची वेळ येणार का? त्याविषयी जाणून घेऊ.

प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते, याचेच प्रत्युत्तर म्हणून भारतानेही पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या निर्णयाचा गंभीर परिणाम आधीपासून मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या राष्ट्रीय विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) वर होणार आहे. हा निर्णय ३० एप्रिलपासून लागू करण्यात आला आहे, जो किमान २३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. तोट्यात चाललेल्या या विमान कंपनीचे खाजगीकरण करण्यासाठी पाकिस्तानच्या सुरू असलेल्या संघर्षामध्ये या निर्णयाचा मोठा फटका पाकिस्तानला बसणार आहे.

भारताने औपचारिकरित्या NOTAM म्हणजेच नोटीस टू एअर मिशन्सद्वारे विमान वाहतूक अधिकाऱ्यांना सूचित केले आहे. “पाकिस्तानमधील नोंदणीकृत विमाने आणि पाकिस्तान एअरलाइन्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र आता उपलब्ध नाही, यामध्ये लष्करी विमानांचादेखील समावेश आहे,” असे त्यात नमूद करण्यात आले आहे. भारतीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने निर्बंधांविषयी सांगताना म्हटले की, पाकिस्तानशी संबंधित कोणतेही व्यावसायिक किंवा लष्करी विमानाला भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. आर्थिक आणि राजकीय दबाव आणण्यासाठी हे पाऊल प्रभावी मानले जात आहे.

या निर्णयाचा पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सवर परिणाम

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्ससाठी हा निर्णय म्हणजे खूप मोठा झटका आहे. ही एअरलाइन्स सध्या १०० पेक्षा कमी विमानांसह कार्यरत आहे आणि खाजगीकरणासाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. भारताने घेतलेल्या या निर्णयानंतर पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या आठवड्यातील सहा ते आठ उड्डाणांवर लगेच परिणाम झाला आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स क्वालालंपूर आणि सोलसारख्या ठिकाणी जाण्यासाठी भारतीय हवाई क्षेत्राचा वापर करायचे. ‘इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए)’च्या आकडेवारीनुसार, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सला खालील गोष्टींसाठी मंजुरी मिळाली होती:

  • इस्लामाबाद आणि क्वालालंपूरदरम्यान आठवड्यातून चार उड्डाणे
  • लाहोर ते क्वालालंपूर दोन उड्डाणे
  • लाहोर आणि सोलदरम्यान दोन उड्डाणे

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सला आता चीन, लाओस आणि थाई हवाई क्षेत्रांमधून लांब मार्ग निवडावा लागत आहे, त्यामुळे त्यांच्या वेळेत आणि इंधन खर्चात वाढ होत आहे. कोलंबो, ढाका, बँकॉक आणि हनोई येथील विमान कंपन्यांनाही आता भारताचे हवाई क्षेत्र सोडून लांबचा मार्ग निवडावा लागत आहे, त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सची आठवड्याची ३०८ आंतरराष्ट्रीय उड्डाणे पश्चिम आशियाकडून जातात; ज्यात सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, ओमान आणि कुवेतसारख्या देशांचा समावेश आहे, त्यामुळे ही उड्डाणे भारतीय क्षेत्रावरून जात नाही. मात्र, आग्नेय आशियाई मार्गांकडून जाणाऱ्या उड्डाणावर परिणाम झाल्याने हे पाकिस्तानसाठी मोठे आर्थिक नुकसान आहे.

एव्हिएशन अॅनालिटिक्स ‘फर्म सिरियम’ने सांगितले की, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या ८० टक्क्यांहून अधिक आंतरराष्ट्रीय सेवा पश्चिम आशियामध्ये चालतात आणि या मार्गांवर बंदीमुळे मोठा परिणाम झालेला नाही. एअर मार्शल (निवृत्त) संजीव कपूर यांनी सांगितले, “पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या इस्लामाबादहून क्वालालंपूरला जाणारी उड्डाणे यांना साधारणपणे ५ तास ३० मिनिटे लागतात, मात्र आता ही वेळ वाढून ८ तास ३० मिनिटे झाली आहे. पाकिस्तानहून बांगलादेश किंवा श्रीलंकेला जाणाऱ्या विमानांना समुद्रावरील मार्ग निवडावा लागत आहे, त्यामुळे प्रवासाचा वेळ, ऑपरेटिंग खर्च आणि तिकिटे (किमती) वाढली आहेत.”

हा ताण वाढत असताना ३० एप्रिल रोजी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने गिलगिट, स्कार्दू आणि इतर उत्तरेकडील प्रदेशांना जाणाऱ्या सर्व सेवा बंद करण्याची घोषणा केली. ही सर्व ठिकाणे दुर्गम आहेत, जिथे रस्तेमार्ग व्यवस्थित नाहीत, त्यामुळे तेथील लोक हवाई वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. उड्डाणे थांबविण्यात आल्याने प्रवाशांची, तसेच वस्तूंची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने या निर्णयाचे कारण अद्याप अधिकृतपणे उघड केले नाही. मात्र, पाकिस्तानच्या विमान वाहतूक उद्योगातील काही सूत्रांनी असे सांगितले की, वाढत्या आर्थिक दबावादरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे.

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या खाजगीकरणाचा प्रश्न

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स खाजगीकरणासाठी प्रयत्न करत आहे. खाजगीकरणासाठी पाकिस्तानी सरकारने आतापर्यंत दोनवेळा प्रयत्न केले आहेत. आता सरकारने याच्या खाजगीकरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. सरकारने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी १०० टक्के मालकी आणि पूर्ण व्यवस्थापकीय नियंत्रण देऊ केले आहे, असे वृत्त ‘द इकॉनॉमिक टाईम्स’ने दिले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान अंतिम लिलाव अपेक्षित आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये खाजगीकरणाचा पहिला मोठा प्रयत्न करण्यात आला, जो अयशस्वी ठरला. बोलीदार ‘ब्लू वर्ल्ड सिटी कन्सोर्टियम’कडून १० अब्ज रुपये ऑफर करण्यात आले होते.

मात्र, हा आकडा पाकिस्तानच्या खाजगीकरण आयोगाने निश्चित केलेल्या आकड्यापेक्षा ७५ अब्ज रुपये कमी होता. पाकिस्तानच्या खाजगीकरण आयोगाने खाजगीकरणासाठी ८५.०३ अब्ज रुपये निश्चित केले होते. त्यानंतर सरकारकडून काही गोष्टी बदलण्यात आल्या, मात्र दुसराही प्रयत्न अयशस्वी ठरला, असे वृत्त ‘द इकॉनॉमिक टाईम्स’ने दिले. उद्योग विश्लेषकांचे असे सांगणे आहे की, भू-राजकीय अनिश्चितता आणि एअरलाइन्सच्या टर्नअराउंड संभाव्यतेवरील विश्वासाचा अभाव, यामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सची ही परिस्थिती आहे. भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश नाकारल्याने विमान वाहतूक खर्च वाढला असल्याने, कंपनी मोठ्या अडचणीत सापडली आहे.