प्रज्ञा तळेगावकर
युरोपियन महासंघाने भारतीय नागरिकांसाठी शेंगन व्हिसाचे नियम शिथिल केले आहेत. या नियमांनुसार पाच वर्षांच्या वैधतेसह मल्टिपल एंट्री शेंगन व्हिसा मिळणार आहे. याद्वारे २९ देशांना भेटी देणे सहज शक्य होणार आहे. शेंगन व्हिसा म्हणजे काय, त्याचे नियम यांच्याविषयी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेंगन व्हिसा म्हणजे काय?

शेंगन व्हिसाच्या अंतर्गत, व्हिसा धारकांना शेंगन क्षेत्रात कोणत्याही १८० दिवसांच्या कालावधील ९० दिवस मुक्तपणे प्रवास करण्याची, राहण्याची दिलेली परवानगी. मात्र, या परवानगीमध्ये काम करण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. या परवानगीमध्ये शेंगन क्षेत्रातील देशांमध्ये व्हिसा धारक प्रवास करू शकतो.

आणखी वाचा-यहुदी तालिबानʼवर अमेरिकाही नाराज… इस्रायलच्या नेत्झा यहुदा बटालियनवर कोणते आरोप आहेत?

शेंगन क्षेत्रामध्ये कोणत्या देशांचा समावेश होतो?

शेंगन क्षेत्रामध्ये २९ युरोपीय देशांचा समावेश होतो, ज्यात २५ युरोपियन महासंघातील सदस्य देश आहेत. बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, चेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, जर्मनी, एस्टोनिया, ग्रीस, स्पेन, फ्रान्स, इटली, लाटविया, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, हंगेरी, माल्टा, नेदरलँड्स, ऑस्ट्रिया , पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोव्हेनिया, स्लोव्हाकिया, फिनलंड आणि स्वीडन. याव्यतिरिक्त, आइसलँड, लिकटेंस्टीन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंडचाही यात समावेश आहे.

नवीन बदल महत्त्वाचे का?

शेंगन व्हिसा भारतीय प्रवाशांसाठी त्यांच्या अल्प वैधतेमुळे त्रासदायक आणि खर्चिक होता. १८ एप्रिल २०२४ रोजी, युरोपियन कमिशनने भारतीय नागरिकांना (मल्टिपल एंट्री) एकाधिक-प्रवेश व्हिसा जारी करण्यासाठी विशिष्ट नियम स्वीकारले आहेत. जे आजपर्यंत लागू झालेल्या व्हिसा संहितेच्या मानक नियमांपेक्षा अधिक अनुकूल आहेत. नवीन नियम हे भारतीय आणि युरोपीय देशांतील नागरिकांमधील संपर्क वाढविण्याच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. नवीन पाच वर्षांचा बहु-प्रवेश व्हिसा वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी ते फायदेशीर आहेत. या व्हिसासह, भारतीय प्रवासी युरोपियन देशांमध्ये १८० दिवसांच्या कालावधीत ९० दिवसांपर्यंत, वर्षातून एकूण १८० दिवस आणि पाच वर्षांत ९०० दिवसांपर्यंत राहू शकतात. अर्थात त्यांना सलग ९०० दिवस राहाता येणार नाही. याव्यतिरिक्त, हा व्हिसा धारक शेंगन क्षेत्राबाहेरील देशांमध्ये प्रवास करण्यासाठी देखील वापरू शकतात, उदाहरणार्थ, शेंगन व्हिसा असलेले भारतीय नागरिक शेंगन क्षेत्राबाहेरील ३७ पेक्षा जास्त देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास करू शकतात.

आणखी वाचा-दिल्लीत जाण्याच्या भुजबळ यांच्या प्रयत्नांना धक्का? नाशिकवरून महायुतीतच शह-काटशह…

नवीन बदल कोणते?

युरोपियन महासंघाने विशेषत: भारतीय नागरिकांसाठी ‘कॅस्केड’ नावाची नवीन व्हिसा प्रणाली स्वीकारली आहे. भारतीय नागरिकांना आता दोन वर्षांसाठी वैध दीर्घकालीन, एकाधिक-प्रवेश शेंगन व्हिसा जारी केला जाऊ शकतो. याआधी सादर केलेल्या संभाव्य कमी-वैधता व्हिसाच्या तुलनेत ही लक्षणीय सुधारणा आहे. दोन वर्षांच्या व्हिसासाठी पात्र होण्यासाठी, अर्जदारांनी गेल्या तीन वर्षांमध्ये दोन शेंगन व्हिसा मिळवलेले आणि वैधपणे वापरलेले असणे गरजेचे आहे. दोन वर्षांचा व्हिसा यशस्वीरित्या मिळवल्यानंतर, भारतीय प्रवासी पाच वर्षांचा शेंगन व्हिसा मिळण्यासाठी पात्र ठरू शकतात आणि त्यासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी त्यांच्या पासपोर्टची पुरेशी वैधता शिल्लक असणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indians are eligible for multi entry schengen visa for longer validity why changes in schengen visa rules matter print exp mrj