इराणमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इराण सरकारकडून भारतीय नागरिकांसाठी व्हिसाची अट रद्द करण्यात आली आहे. इराण सरकारने ४ फेब्रुवारी २०२४ पासून भारतीय नागरिकांसाठी व्हिसाची अट रद्द करण्यास मान्यता दिली आहे. इराण सरकारच्या या निर्णयामुळे इराणमध्ये भारतीय पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. मात्र, यामध्ये काही अटींचाही समावेश आहे. सामान्य पासपोर्ट असलेल्या लोकांना आता व्हिसाशिवाय इराणमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल, परंतु काही निर्बंध कायम राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इराणमध्ये व्हिसामुक्त प्रवास कोण करू शकतो?

सामान्य पासपोर्ट धारण केलेले भारतीय नागरिक जोपर्यंत पर्यटनाच्या उद्देशाने इराण देशाला भेट देत आहेत, तोपर्यंत ते व्हिसाशिवाय इराणमध्ये प्रवेश करू शकतात. तसेच त्यांनी हवाई मार्गेच इराणमध्ये प्रवेश केला पाहिजे. परंतु काम किंवा अभ्यास यांसारख्या इतर कारणांसाठी इराणमध्ये प्रवेश करणाऱ्यांना ही सूट लागू होत नाही.

तुम्ही इराणमध्ये किती काळ राहू शकता?

व्हिसाशिवाय इराणमध्ये प्रवेश करणारे जास्तीत जास्त १५ दिवस राहू शकतात. हा १५ दिवसांचा कालावधी वाढवता येणार नाही. जर तुम्ही व्हिसाशिवाय एकदा इराणला भेट दिली तर सहा महिन्यांनंतर तुम्ही पुन्हा इराणला भेट देऊ शकता. जे लोक पर्यटनासाठी इराणला जात आहेत त्यांनाच व्हिसाशिवाय प्रवेश मिळेल. जर एखाद्या भारतीय नागरिकाने इराणमध्ये दीर्घ कालावधीसाठी राहण्याची योजना आखली असेल किंवा सहा महिन्यांच्या आत अनेक भेटी दिल्या तर त्याला किंवा तिला वेगळा व्हिसा घ्यावा लागेल. भारतातील दूतावासातून इराणचा व्हिसा मिळू शकतो, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचाः चंदीगड महापौर निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाने ‘लोकशाहीची हत्या’ असे का म्हटले? नक्की काय घडले?

इराणने व्हिसाची अट का उठवली?

डिसेंबर २०२३ मध्ये इराणने भारतासह इतर ३२ देशांसाठी व्हिसाची शिथिलता जाहीर केली होती. पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि जगभरातून अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले होते, असे इराणचे सांस्कृतिक वारसा, पर्यटन आणि हस्तकला मंत्री एझातोल्लाह जरघामी यांनी सांगितले होते. या निर्णयाचा उद्देश जागतिक परस्परसंवादासाठी इराणची वचनबद्धता दर्शविण्याचा आहे. इतर ३२ देशांमध्ये रशिया, संयुक्त अरब अमिराती (यूएई), बहरीन, सौदी अरेबिया, कतार, कुवेत, लेबनॉन, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, ट्युनिशिया, मॉरिटानिया, टांझानिया, झिम्बाब्वे, मॉरिशस, सेशेल्स, इंडोनेशिया, दारुसलाम, जपान, कंबोडिया, मलेशिया, व्हिएतनाम, ब्राझील, पेरू, क्युबा, मेक्सिको, व्हेनेझुएला, बोस्निया आणि हर्जेगोविना, सर्बिया, क्रोएशिया आणि बेलारूस, तुर्कस्तान, अझरबैजान, ओमान, चीन, आर्मेनिया, लेबनॉन आणि सीरियाचा समावेश आहे.

हेही वाचाः किंग चार्ल्स यांना कर्करोग झाल्यानं आता ब्रिटनच्या राजगादीचे काय होणार? वाचा सविस्तर

इतर कोणते देश भारतासाठी व्हिसामुक्त प्रवासाला परवानगी देतात?

मलेशिया, श्रीलंका आणि व्हिएतनामनेही अलीकडेच भारतीय नागरिकांसाठी व्हिसाची आवश्यकता शिथिल केली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये थायलंडनेही व्हिसामुक्त प्रवासाला परवानगी दिली होती. थायलंडची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात पर्यटनावर अवलंबून असल्याने त्यांनी भारतीय नागरिकांसाठी १० मे २०२४ पर्यंत व्हिसा सूट जाहीर केलीय. ऑक्टोबर २०२३ मध्ये श्रीलंकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अली साबरी यांनी भारत, चीन आणि रशियासह सात देशांच्या नागरिकांसाठी व्हिसा आवश्यकता काढून टाकल्याची घोषणा केली होती, ज्यात ही सवलत ३१ मार्च २०२४ पर्यंत सुरू राहणार आहे. जारी केलेल्या निवेदनानुसार, श्रीलंका सरकारने उचललेले हे पाऊल पर्यटनाला चालना देण्यासाठी संकटग्रस्त देशाच्या प्रयत्नांचा एक भाग होता आणि २०२६ पर्यंत ५०,००,००० पर्यटकांचे लक्ष्य गाठायचे आहे. सध्या २७ देश भारतातील नागरिकांना व्हिसामुक्त प्रवेश देतात. यामध्ये केनिया, इंडोनेशिया, बार्बाडोस, भूतान, डोमिनिका, हैती, मालदीव, मॉरिशस, नेपाळ, सामोआ आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indians can now visit iran without a visa what are the exact conditions vrd
First published on: 07-02-2024 at 10:00 IST