कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला नुकतंच अमेरिकेतून अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या आयोवा येथील ऐतिहासिक स्क्विरल केज जेलमध्ये त्याला कैद करण्यात आल्याने या ऐतिहासिक कारागृहाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. २६ वर्षीय अनमोल बिश्नोईला काही दिवसांपूर्वी बेकायदा कागदपत्रांसह त्या देशात प्रवेश केल्याबद्दल आणि त्याच्यावर भारतात दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसह डझनभर गुन्हेगारी खटले दाखल आहेत. त्याविरोधात त्याला अटक करण्यात आली आहे. जून २०२४ मध्ये अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार केल्याच्या प्रकरणातही अनमोल बिश्नोई याच्या नावाचा समावेश होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतातील अनेक राज्यांमध्ये सुमारे १८ ते २० प्रकरणांमध्ये तो वाँटेड गुन्हेगार आहे. बिश्नोई त्याच्या बेकायदा कारवायांसाठी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी)देखील रडारखाली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये त्याची चौकशी सुरू आहे, पण बिश्नोईला अमेरिकेतील ज्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे ते सामान्य तुरुंग नाही. १९व्या शतकातील हे अद्वितीय वास्तुकलेसाठीच नाही तर त्याच्या अलौकिक कथांसाठीदेखील ओळखले जाते. काय आहे ‘स्क्विरल केज जेल’? त्याचा इतिहास काय? खरंच या तुरुंगात भुताचा वास आहे का? त्याविषयी जाणून घेऊ.

‘स्क्विरल केज जेल’ म्हणून प्रसिद्ध असलेले पोट्टावाट्टामी जेलहाऊस १८८५ मध्ये जुन्या चर्चच्या शवागराच्या जागेवर बांधले गेले होते. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : कडुलिंबाची पाने खाऊन नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीची कॅन्सरवर मात? हे खरंच शक्य आहे का? तज्ज्ञ काय सांगतात?

१९व्या शतकातील तुरुंग

‘स्क्विरल केज जेल’ म्हणून प्रसिद्ध असलेले पोट्टावाट्टामी जेलहाऊस १८८५ मध्ये जुन्या चर्चच्या शवागराच्या जागेवर बांधले गेले होते. स्थापत्यशास्त्रातील कलेसह हे तुरुंग त्याच्या विचित्र रचनेसाठी ओळखले जाते. कारण या तुरुंगात फिरत्या कोठडी आहेत. असे अमेरिकेत उर्वरित तीन तुरुंग आहेत. त्यापैकी स्क्विरल केज जेल एक आहे. या कोठडी एका वर्तुळाकार संरचनेत फिरतात. विशिष्ट कैद्यापर्यंत पोहोचणाऱ्या जेलरांना प्रवेश देण्यासाठी या संरचनेत एकच दरवाजा देण्यात आला आहे. त्यामुळेच या तुरुंगाला १९ व्या शतकातील चमत्कार, असे नाव देण्यात आले आहे. याला एका लहान प्राण्यांसाठी असलेल्या पिंजऱ्यांचे स्वरूप आल्याने ‘स्क्विरल केज जेल’ असे नाव देण्यात आले.

परंतु, या तुरुंगाचेही कल्पक डिझाइन सुरुवातीलाच फेल ठरले होते. तुरुंग उघडल्यानंतर यातील कोठडी फिरताना काही विचित्र आवाज येत असल्याने, याची चर्चा होऊ लागली आणि या विषयी अनेक दावे केले जाऊ लागले. त्याव्यतिरिक्त कोठडी फिरताना वारंवार त्याचे गियर्स जाम व्हायचे, ज्यामुळे अनेकदा कैद्यांना उपासमारीचा सामना करावा लागायचा. स्थानिक यूएस वेबसाइटनुसार, याच्या फिरत्या डिझाइनमुळे कैद्यांना वेगळे करणेदेखील कठीण होते. या रचनेमुळे कैद्यांना वारंवार दुखापत व्हायची. कारण कोठडी फिरताना अनेक कैदी त्यातून हात-पाय बाहेर काढायचे; ज्यामुळे त्यांना गंभीर जखमा व्हायच्या आणि काहींचे हात पायही तुटायचे.

तुरुंगाशी जुळलेल्या भुताच्या कथा

१९७१ मध्ये कौन्सिल ब्लफ्स पार्क बोर्डाने जतन करण्यासाठी जेलहाऊस विकत घेतले आणि नंतर पोट्टावाट्टामी काउंटी (एचएसपीएस)च्या ऐतिहासिक सोसायटीने त्याचे संग्रहालयात रूपांतर केले. त्याच्या भुताटकी कथांसाठी या तुरुंगाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका कथेनुसार १९५० च्या दशकातील एका जेलरने रिकाम्या मजल्यावर वारंवार पावलांचा आवाज ऐकल्यानंतर चौथ्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये राहण्यास नकार दिला होता. त्याला अनेक भयावह आवाज येत असल्याचेही त्याने सांगितले होते. या घटनेनंतर तो दुसऱ्या मजल्यावर राहण्यासाठी गेला. आज, संग्रहालयातील कर्मचारी आणि स्वयंसेवकांना इमारतीमध्ये असेच विचित्र अनुभव आले आहेत.

हेही वाचा : वाढत्या गरिबीमुळे ‘हे’ आशियाई शहर ठरत आहे ‘सेक्स टुरिझम हब’; कारण काय?

“कारागृहातील अनेक कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी पाऊल, विचित्र आवाज, कुजबूज आणि दरवाजे हलताना पाहिले आहेत. काहींनी पायऱ्या किंवा दरवाजामागे गडद सावल्या फिरतानाही पाहिल्या आहेत,” असे संग्रहालयाचे व्यवस्थापक कॅट स्लॉटर यांनी कौन्सिल ब्लफ्स वेबसाइटवरील लेखात म्हटले आहे. स्लॅटर यांचा असा विश्वास आहे की, तुरुंगात झालेल्या काही मृत्यूमुळे या अफवा पसरल्या गेल्या आहेत. एका प्रकरणात कैद्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, दुसऱ्या प्रकरणात एक व्यक्ती छतावर आपले नाव कोरण्याचा प्रयत्न करताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली होती, एकाने गळफास लावून आत्महत्या केली होती आणि प्रशिक्षण बंदुकीतून चुकून गोळी निघाल्याने एका अधिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागला होता, असे अनेक मृत्यू या तुरुंगात झाले आहेत. त्यासह ही तुरुंग शवागराच्या जागेवर बांधण्यात आल्याने, लोकांचा या कथांवर विश्वासही सहज बसत आलाय.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inside america squirrel cage jail gangster lawrence bishnoi brother anmol is lodged rac