इस्रायलने १३ जूनच्या पहाटे इराणवर लक्ष्यभेदी हल्ले करून तेथील लष्करी कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांना ठार केले. इराणवर हल्ला करण्याची योजना इस्रायल अनेक महिने आखत होता. पण अमेरिकेची इराणशी चर्चा सुरू असल्यामुळे असेल किंवा हेजबोला व हमासचा निःपात करण्यास इस्रायलने प्राधान्य दिल्यामुळे असेल हा हल्ला लांबला. या वर्षात एप्रिलमध्ये इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांनी परस्परांवर ड्रोन आणि हल्ले केले. गेल्या कित्येक वर्षांत परस्परांच्या भूमीवर झालेले ते पहिले हल्ले होते. त्या हल्ल्यांतूनच पुढील संघर्षाची नांदी झाली. वेळ आल्यास पुन्हा एकदा परस्परांवर हवाई हल्ले करण्यास दोन्ही देश मागेपुढे पाहणार नाहीत हे त्यावेळी स्पष्ट झाले होते. पण या संघर्षात सध्या तरी इस्रायलने आघाडी घेतली आहे. या मोहिमेस इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ असे नाव दिले.
ऑपरेशन रायझिंग लायन
इराणची राजधानी तेहरानच्या आसपासचे सहा लष्करी तळ, लष्करी कमांडरांसाठी असलेली दोन निवासी संकुले, ताब्रिझ आणि नान्ताझ येथील युरेनियम समृद्धीकरण आणि संशोधन केंद्रे यांवर १३ जूनच्या पहाटे तीन ते साडेचार या काळात सहा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांची पुष्टी इराणकडून झाली. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी सकाळी व्हिडियो संदेशाद्वारे इस्रायली नागरिकांना या हल्ल्यांची माहिती दिली. तेहरान शहरात ठिकठिकाणी हल्ले झाल्यामुळे इराणी नेतृत्वाला आणि नागरिकांना मोठा धक्का बसला. लष्करी नियंत्रण कक्ष, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र केंद्रे, हवाई बचाव प्रणाली यांनाही लक्ष्य करण्यात आले. नान्ताझ येथील युरेनियम समृद्धीकरण केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर परिसरात किरणोत्सर्ग झाला का, याची चौकशी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेने इराण सरकारच्या सहकाऱ्याने सुरू केली आहे.
कोण ठार झाले?
इराणचे तीन वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि दोन अणुशास्त्रज्ञ या हल्ल्यात मारले गेल्याचे तेथील अधिकृत वृत्तसंस्थेने सरकारी हवाल्याने जाहीर केले. इराणी सैन्यदलांचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल मोहम्मद बाघेरी, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे कमांडर इन चीफ जनरल हुसेन सलामी, इराणी सैन्यदलांचे डेप्युटी कमांडर जनरल घोलामाली रशीद, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे हवाई विभाग प्रमुख जनरल अमीर अली हाजीझादे हे ठार झाले. मोहम्मद मेहदी तेहरांजी आणि फेरेदून अब्बासी हे वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ मारले गेले. अब्बासी हे पूर्वी इराणच्या अणुऊर्जा संस्थेचे अध्यक्ष होते. यापूर्वी इराणचे लष्करी कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांना इस्रायलने एकल हल्ले किंवा हत्येद्वारे संपवले होते. मात्र लष्करी मोहिमेत त्यांना प्रथमच लक्ष्य करण्यात आले.
हल्ले कशासाठी?
इस्रायलवर हल्ले करण्याची तयारी इराणकडून सुरू होती असे इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे. याशिवाय इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम जवळपास पूर्णत्वाकडे आला असून, अण्वस्त्रनिर्मितीची क्षमता त्यांनी हस्तगत केली असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये इराण १५ अणुबॉम्ब बनवू शकेल, असा इस्रायलचा दावा आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगानेही इराणच्या अण्वस्त्र विकास कार्यक्रमाविषयी आदल्याच दिवशी म्हणजे १२ जून रोजी चिंता व्यक्त केली होती. इस्रायलच्या अस्तित्वाला या घडामोडीमुळे धोका उत्पन्न होतो असे पंतप्रधान नेतान्याहू यांनी त्यांच्या व्हिडियो संदेशात सांगितले.
अमेरिकेचा सहभाग किती?
हा हल्ला इस्रायलने अमेरिकेला पूर्णपणे बगल देऊन आणि अजिबात विश्वासात न घेता घडवून आणला. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला बोल न लावता उलट इराणलाच इशारा दिला. अण्वस्त्रबंदी करार करा अन्यथा यापेक्षाही भीषण परिणाम होतील असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. त्यामुळे इस्रायलच्या कारवाईविषयी ते नाराज नाहीत हे स्पष्ट झाले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनीही इराणला इशारा देताना, अमेरिकेच्या हितसंबंधांना बाधा येईल अशी कृती पश्चिम आशियात करू नये असा इशारा दिला. इराणच्या परराष्ट्र खात्याने मात्र या हल्ल्यांची अमेरिकेला पूर्वकल्पना होती, असा दावा केला. दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणचा शेजारी देश इराकमधून अमेरिकेच्या वकिलातीतील बहुतेक कर्मचाऱ्यांना मायदेशा बोलावून घेतले होते हे सूचक आहे.
इराणचा प्रतिहल्ला कधी?
इराणने इस्रायलवर पुन्हा एकदा ‘ड्रोनवर्षाव’ केला आणि जवळपास १०० ड्रोन इस्रायलच्या दिशेने धाडले. इस्रायलनेही याचे अनुमान बांधून हवाई संरक्षण यंत्रणा बळकट करण्यावर भर दिला आहे. इराणकडे अजूनही ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची क्षमता आहे. इस्रायलकडूनही आणखी हल्ले होण्याची शक्यता आहे.
पश्चिम आशिया पुन्हा अस्थिर
इराण आणि इस्रायल यांच्यात पुन्हा एकदा हल्ले-प्रतिहल्ल्याचे सत्र सुरू झाल्यास पश्चिम आशिया अस्थैर्याच्या गर्तेत ढकलला जाईल. इस्रायलच्या हल्ल्यानंतर या टापूत प्रवासी विमाने पाठवणे जगभरातील विमान कंपन्यांनी स्थगित केले आहे. खनिज तेलाचे भाव नऊ टक्क्यांनी वधारले. हे भाव गेले कित्येक दिवस खाली जात होते. या टापूतील सागरमार्गे व्यापारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. हा संघर्ष कधी संपेल याची हमी देता येत नाही.