लोकसभा निवडणूक निकालांच्या धामधुमीत ओडिशा विधानसभेत भाजपने मिळवलेले यश दुर्लक्षित राहिले. बिजु जनता दलाची सलग चोवीस वर्षांची सत्ता भाजपने उलथून टाकली. बिजु जनता दलाचे सर्वेसर्वा ७७ वर्षीय नवीन पटनायक हे सर्वाधिक काळ राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र भाजपच्या या लाटेत नवीनबाबूंना एका मतदारसंघातून पराभूत व्हावे लागले, तर पारंपरिक मतदारसंघातून जेमतेम मताधिक्य घेत विजय मिळवता आला. राज्यात भाजपच्या बाजूने लाट इतकी जोरदार होती की, लोकसभेला बिजु जनता दलाला भोपळाही फोडता आला नाही. राज्यातील लोकसभेच्या २१ जागांपैकी भाजपला २०, तर काँग्रेसला उर्वरित जागा जिंकता आली. बिजु जनता दलाच्या पराभवाची अनेक कारणे आहेत. त्यात अतिआत्मविश्वास हा पक्षाला अडचणीत आणण्यास कारणीभूत ठरला.

परिस्थितीचा अंदाज नाही

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यात मुसंडी मारली होती. पाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता. मुळात ओडिशाच्या आदिवासी पट्ट्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारांच्या वनवासी कल्याण आश्रमाचे काम पूर्वीपासून आहे. चिकाटीने काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्याचा लाभ भाजपला अर्थातच झाला. गेल्या म्हणजेच २०१९ मध्ये ११२ जागा जिंकणारा बिजु जनता दल ५१ जागांवर आला. तर भाजपने गेल्या वेळच्या २३ जागांवरून ७८ जागांवर मुसंडी मारली. राज्यात विधानसभेच्या १४७ जागा आहेत. बिजु जनता दलाच्या नेतृत्वाला सत्ताविरोधी लाट आहे हे लक्षात आले नाही. भाजप फार तर २३ जागांवरून ४० ते ४५ जागांपर्यंत मजल मारेल, सत्ता आपलीच राहील अशी बिजद नेत्यांची अटकळ होती. त्यातच भारतीय प्रशासन सेवेतून निवृत्ती घेऊन बिजु जनता दलात दाखल झालेल्या व्ही. के. पांडियन यांच्यावर बिजु जनता दलाचे नेतृत्व विसंबून राहिले. पांडियन मूळचे तमिळ आहेत. नवीनबाबूंचे ते राजकीय वारसदार असल्याचा भाजपचा प्रचार प्रभावी ठरला. राज्याबाहेरच्या व्यक्तीकडे सूत्रे सोपवणार काय, अशी भावनिक साद भाजपने प्रचारात घालत ओडिया अस्मिता जागृत केली. त्यातून राज्य सरकारविरोधात जनमत गेले. पांडियन यांच्या ताब्यात सारे प्रशासन असल्याचे भाजपने सातत्याने ठसविले. याखेरीज मयूरभंज येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन पटनायक यांच्या प्रकृतीबाबत काही गोष्टी गोपनीय ठेवल्याचा आरोप केला. त्याच बरोबर १२ व्या शतकातील पुरी जगन्नाथ मंदिरातील रत्नभंडारातील बेपत्ता किल्ल्यांचा मुद्दाही प्रचारात निर्णायक ठरला. त्यामुळे मतदार बिजु जनता दलाकडून भाजपकडे वळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आक्रमक प्रचार तसेच रोड शोंना प्रतिसाद मिळाला यातून वातावरण बदलले.

हेही वाचा : मोदींच्या शपथविधी सोहळ्याला ७ देशांचे प्रमुख उपस्थित राहणार; कोण कोण भारतात येणार?

युतीच्या चर्चांचा फटका

बिजु जनता दलाने २००९ मध्ये निवडणुकीच्या तोंडावर भाजपशी युती तोडली. मात्र राज्यात त्यांची एकहाती सत्ता होती. वंचितांसाठी राबविलेल्या कल्याणकारी योजनांच्या जोरावर तसेच नवीन पटनायक यांची स्वच्छ प्रतिमा राज्यात बिजु जनता दलाची दीर्घकाळ सत्ता टिकण्यास कारणीभूत ठरली. नवीनबाबूंनी नात्यातील कोणत्याही जवळच्या व्यक्तीला राजकारणात आणले नाही, त्यामुळे घराणेशाहीचा मुद्दाच नव्हता. यंदा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप-बिजद यांच्यात युती होईल अशा चर्चा सुरू होत्या. याला फारसा दुजोरा कुणी दिला नसला तरी, यातून बिजु जनता दल कमकुवत झाला असल्यानेच आघाडीसाठी प्रयत्न करत आहे असा एक संदेश गेला. तोही पक्षासाठी मारक ठरला. त्याच प्रमाणे दोन दशकांच्या सत्तेमुळे जनतेच्या वाढत्या अपेक्षांची पूर्तता न होणे, पक्षात पटनायक यांच्या व्यतरिक्त जनाधार असलेला अन्य नेता नसणे याबाबीही पराभवास कारणीभूत ठरल्या. सलग सहाव्यांदा मुख्यमंत्री होऊन देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम करण्याचे नवीनबाबूंचे स्वप्न या पराभवाने भंगले.

हेही वाचा : दक्षिण आफ्रिकेत ‘अबकी बार, युनिटी सरकार?’; तीव्र मतभेद असूनही सर्वच राजकीय पक्ष एकत्र येतील?

भाजपचा पूर्वेकडे विस्तार

हिंदी भाषक पट्ट्यातील पक्ष अशी भाजपची ओळख काही प्रमाणात या वेळच्या निकालाने पुसली. कारण तमिळनाडूत जरी पक्षाला एकही जागा मिळाली नसली, तरी प्रमुख द्रविडी पक्षांशी युती केल्याशिवायदेखील भाजपने मतांची टक्केवारी दोन आकडीपर्यंत नेली. तर केरळमध्ये खाते उघडून धक्का दिला. तेलंगणमध्येही आठ जागा जिंकल्या. लोकसभेला दक्षिणेत पक्षाने जागांमध्ये वाढ केली नसली, तरी मतांच्या दृष्टिकोनातून मोठी मजल मारली. आता पूर्वेकडील मध्यम आकाराच्या ओडिशात भाजपचा पहिला मुख्यमंत्री असेल. एकेकाळी काँग्रेसची एक हाती सत्ता येथे होती. पुढे बिजु जनता दलाने काँग्रेसला मागे ढकलले. नंतरच्या काळात भाजपने काँग्रेसला तिसऱ्या क्रमांकावर फेकले. यातून बिजु जनता दलाला पर्यायी पक्ष म्हणून भाजप पुढे आला आणि आता सत्तेत आला. पक्षाच्या विस्ताराच्या दृष्टीने या यशाचे महत्त्व आहे. राज्यातील कोणत्याही व्यक्तीला पुढे न करता, पंतप्रधानांचा चेहरा पुढे ठेवत भाजपने हे यश मिळवले आहे. लोकसभा निवडणुकीत देशभरात अकाली दल, भारत राष्ट्र समिती, अण्णा द्रमुक असे प्रमुख प्रादेशिक पक्ष कोणत्याही आघाडीत न जाता अडचणीत आले आहेत. आता त्यात बिजु जनता दलाची भर पडली आहे.

hrishikesh.deshpande@expressindia.com