Saudi Arabia ski resort सौदी अरेबियातील वाळवंटात एका आगळ्यावेगळ्या प्रकल्पाचे काम सुरु आहे. या प्रकल्पा अंतर्गत एका गावाची निर्मिती केली जात आहे. हे गाव पूर्णपणे बर्फाने झाकलेले असेल. हा प्रकल्प तयार झाल्यास याला चमत्कार मानले जाईल, असे सांगण्यात येते. २०२६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, असे सांगितले जात होते आणि २०२९ च्या आशियाई हिवाळी खेळांचे आयोजन याठिकाणी केले जाईल, असेही सांगण्यात येत होते. मात्र, आता काही अडचणींमुळे या प्रकल्पाचा वेग मंदावला आहे. वाळवंटाच्या मध्यभागी एक स्की रिसॉर्ट (ski resort) बांधण्याच्या कामाचा वेग मंदावल्याने आशियाई खेळ आयोजित करण्याची संधी दुसऱ्या देशाला मिळू शकते. या प्रकल्पाचे नाव ‘ट्रोजेना स्की रिसॉर्ट’ असे असून हा प्रकल्प सौदी अरेबियाच्या ५०० अब्ज डॉलर्सच्या ‘निओम’ मेगा-प्रोजेक्टचा भाग आहे. मात्र, आता त्याच्या बांधकामात अभियांत्रिकी आणि दळणवळणाशी संबंधित मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. या विश्लेषणात आपण खालील गोष्टी जाणून घेणार आहोत…

  • नेमका हा प्रकल्प काय आहे?
  • प्रकल्पाचे वैशिष्ट्य काय?
  • वाळवंटात बर्फ कसा तयार होणार?
  • हा प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होणार?
  • प्रकल्पात येणाऱ्या अडचणी कोणत्या?

ट्रोजेना स्की रिसॉर्ट काय आहे?

‘ट्रोजेना’ हा रिसॉर्ट जॉर्डनच्या सीमेजवळ समुद्रसपाटीपासून २,६०० मीटर उंचीवर असलेल्या डोंगराळ प्रदेशात बांधला जात आहे. याठिकाणी जागतिक दर्जाचे हिवाळी खेळांचे केंद्र केले जाणार आहे. या स्की रिसॉर्टची अंदाजित किंमत १९ अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळजवळ १ लाख ६६ हजार कोटी रुपये आहे, असे ब्लूमबर्गने आपल्या वृत्तात सांगितले आहे. याची रचना आणि स्थापत्यकला एक चमत्कार मानली जात आहे. या प्रकल्पात डिसेंबर ते मार्च या काळात कृत्रिम बर्फावरील ३० किलोमीटर लांबीची स्की धावपट्टी (ski runs), हॉटेल्स, स्पा, गोल्फ कोर्स आणि हायकिंगसाठीचे रस्ते यांचा समावेश असणार आहे.

‘ट्रोजेना’ हा रिसॉर्ट जॉर्डनच्या सीमेजवळ समुद्रसपाटीपासून २,६०० मीटर उंचीवर असलेल्या डोंगराळ प्रदेशात बांधला जात आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

‘ट्रोजेना’ ज्या भागात बांधले जात आहे, तिथे फार कमी हिमवर्षाव होतो. हे स्की रिसॉर्ट पूर्णपणे कृत्रिम बर्फावर अवलंबून असेल, असे या योजनेची माहिती असलेल्या लोकांनी ‘फायनान्शियल टाइम्स’ला सांगितले आहे. या बर्फासाठी लागणारे पाणी ‘अकाबाच्या आखातातून’ (Gulf of Aqaba) २०० किलोमीटर दूरवरून आणले जाईल. याच पाण्याने १४० मीटर खोल कृत्रिम तलावदेखील भरला जाईल. सध्या बांधकाम आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर ट्रकने पाणी आणले जाते. या प्रकल्पात ‘द वॉल्ट’ म्हणून ओळखले जाणारे अत्याधुनिक रिसॉर्ट असले, जिथे काही दुकाने आणि मनोरंजनाच्या इतर गोष्टी समाविष्ट असतील.

‘ट्रोजेना’च्या बांधकामामध्ये येणारी आव्हाने कोणती?

‘ट्रोजेना’चे डोंगराळ स्वरूप बांधकामासाठी एक मोठे आव्हान ठरत आहे. ‘द वॉल्ट’ संकुल बांधण्यासाठी प्रचंड प्रमाणात खडक फोडावे लागत आहेत. ‘फायनान्शियल टाइम्स’च्या सूत्रांनुसार, इतर बांधकाम सुरू होण्यापूर्वी ३,००० तारा (Tension cables) उर्वरित खडकांमध्ये बसवाव्या लागतील. मात्र, कंत्राटदारांना दररोज फक्त एकच तार बसवता येत आहे, याचा अर्थ हे बांधकाम पूर्ण होण्यास आठ वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. ‘ट्रोजेना’ला जाणाऱ्या रस्त्याला प्रत्येक दिशेने फक्त एकच मार्गिका आहे आणि त्याचा उतार खूप तीव्र असल्यामुळे आणि वळणेही तीव्र असल्यामुळे बांधकाम वाहने चालवणे कठीण आहे. कृत्रिम तलावात पूर्ण क्षमतेने पाणी भरण्यासाठी कमीत कमी दोन वर्षे लागतील. हे काम अजून सुरू झालेले नाही आणि ‘ट्रोजेना’च्या मुख्य पाणी शुद्धीकरण (Desalination) प्रकल्पाचे बांधकामदेखील अद्याप सुरू झालेले नाही.

२०२९ चे आशियाई हिवाळी खेळ सौदी अरेबियाबाहेर आयोजित केले जातील का?

सौदी अरेबिया आपल्या स्की रिसॉर्टच्या बांधकामात नियोजित वेळेपेक्षा मागे असल्याने, २०२९ च्या आशियाई हिवाळी खेळांसाठी चीन आणि दक्षिण कोरियाच्या निवडीचा पर्याय म्हणून विचार केला जात असल्याची माहिती आहे. ब्लूमबर्ग’च्या वृत्तांनुसार, रियाधच्या प्रतिनिधींनी चीनशी संपर्क साधला आहे आणि अनौपचारिक चर्चा केली आहे. दरम्यान, ‘ऑलिंपिक कौन्सिल ऑफ एशिया’ने (Olympic Council of Asia – OCA) कोरियाच्या क्रीडा आणि ऑलिंपिक समितीशी या स्पर्धेचे यजमानपद स्वीकारण्याबद्दल चर्चा केली आहे.

अनेक सूत्रांनी फायनान्शियल टाइम्सला सांगितले की, सौदीचे अधिकारी २०२९ चे सामने दक्षिण कोरिया किंवा चीनमध्ये आयोजित करण्याचा विचार करत आहेत आणि २०३३ मध्ये हे सामने सौदी अरेबियामध्ये आयोजित केले जातील. ‘ट्रोजेना’ वेळेत पूर्ण होण्याची शक्यता नाही. या चर्चेची माहिती असलेल्या लोकांनी ब्लूमबर्गला सांगितले की, रियाध अंतिम मुदती पूर्ण करण्यासाठी स्की रिसॉर्टच्या योजना कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. चीनने ‘आशियाई हिवाळी खेळां’चे आयोजन सौदी अरेबियातून दुसरीकडे हलवण्याबद्दलचा निर्णय ‘ऑलिंपिक कौन्सिल ऑफ एशिया’वर सोडल्याचे वृत्त आहे. “चीन सौदी अरेबियाला या आशियाई हिवाळी खेळांचे यजमानपद भूषवण्यासाठी पाठिंबा देतो. तुम्ही सांगितलेल्या घडामोडींची आम्हाला माहिती नाही,” असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका टीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सौदीचे अधिकाऱ्यांनीही स्की रिसॉर्टचे बांधकाम वेळापत्रकापेक्षा मागे असल्याचे सार्वजनिकरित्या मान्य केलेले नाही. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीने फायनान्शियल टाइम्स या वृत्तपत्राला सांगितले, “ते असे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत जे यापूर्वी कधीही झाले नाही आणि ते सौदी अरेबिया योग्यरित्या करण्यासाठी कटिबद्ध आहे. असा प्रकल्प प्रत्येकासाठी एक मोठे आव्हान आहे आणि त्यातून मार्ग काढला जात आहे.” ते पुढे म्हणाले, “सौदी अरेबिया खेळांच्या आयोजनासाठी तयार आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार त्यांचा नाही, तो ‘ऑलिंपिक कौन्सिल ऑफ एशिया’चा आहे.”