गेल्या आठवडाभरापासून इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू आहे. हा तणाव दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्र, बॉम्बगोळ्यांच्या माध्यमातून मोठे हल्ले करत आहेत. या दोन देशांतील युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसत आहे. मात्र, आता इस्त्रायलने थेट इराणच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे. इस्त्रायलने इराणमध्ये असणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर बॉम्ब हल्ला केला आहे. या हवाई हल्ल्यानंतर प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठी आग पसरली आहे, त्यामुळे इराणला साऊथ पार्स गॅस क्षेत्राचे कामकाज अंशतः बंद करावे लागले आहे. साऊथ पार्स गॅस क्षेत्र हे जगातील सर्वात मोठे गॅस क्षेत्र आहे. साऊथ पार्स नक्की काय आहे? जगावर या हल्ल्याचा काय परिणाम होणार? त्याविषयी जाणून घेऊयात.
काय आहे साऊथ पार्स?
- साऊथ पार्स गॅस क्षेत्र इराणच्या दक्षिणेकडील बुशेहर प्रांतात आहे. आखाताच्या मध्यभागी असणारे हे गॅस क्षेत्र इराण आणि कतार यांच्या संयुक्त मालकीचे आहे. हे देश त्याला नॉर्थ डोम म्हणतात.
- हे क्षेत्र ९७०० चौरस किलोमीटर पसरलेले आहे आणि त्यातील ३,७०० चौरस किलोमीटर क्षेत्रावर इराणची मालकी आहे.
- त्यात एक तेल क्षेत्र आहे आणि एक प्रक्रिया प्रकल्प आहे.
- असे मानले जाते की, या क्षेत्रात ५१ ट्रिलियन घनमीटरपेक्षा जास्त नैसर्गिक वायू आहे.
- इराणच्या नैसर्गिक वायू साठ्यामध्ये या प्रकल्पाचा सुमारे ४८ टक्के वाटा आहे.
- इराणी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यामुळे प्रकल्पाच्या क्षेत्रात आग लागली आहे.
साऊथ पार्सच्या फेज १४ च्या चार युनिटपैकी एका युनिटमध्ये लागलेली आग आता आटोक्यात आली आहे. या आगीमुळे १२ दशलक्ष घनमीटर गॅसचे उत्पादन थांबले आहे. दुसरीकडे, नॅशनल इराणी ऑइल रिफायनिंग अँड डिस्ट्रिब्युशन कंपनीने म्हटले आहे की, तेल शुद्धीकरण आणि साठवण सुविधांना या हल्ल्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही आणि ते अजूनही कार्यरत आहेत. इराण दरवर्षी सुमारे २७५ अब्ज घनमीटर (बीसीएम) गॅसचे उत्पादन करतो. हे उत्पादन जागतिक गॅस उत्पादनाच्या सुमारे ६.५ टक्के आहे. मुख्य म्हणजे, निर्यात निर्बंधांमुळे याचा वापर केवळ देशांतर्गत केला जातो.
या हल्ल्याचा काय परिणाम होणार?
इराणच्या तेल आणि वायू पायाभूत सुविधांवर पहिल्यांदाच इस्रायलने थेट हल्ला केला आहे. दोन्ही राष्ट्रांमधील संघर्षात यामुळे मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच्या संभाव्य परिणामांबद्दल जागतिक विश्लेषकदेखील चिंतेत आहेत. रायस्टॅड एनर्जीचे विश्लेषक जॉर्ज लिओन यांनी २०१९ मध्ये सौदी अरेबियाच्या तेल क्षेत्रांवर झालेल्या हल्ल्याबद्दल बोलताना ‘ब्लूमबर्ग’ला सांगितले, “अबकाईकनंतर तेल आणि वायू पायाभूत सुविधांवर हा कदाचित सर्वात मोठा हल्ला आहे.” एनर्जी अॅस्पेक्ट्सचे भू-राजकारण प्रमुख रिचर्ड ब्रॉन्झ यांनी ‘द न्यूयॉर्क टाईम्स’शी बोलताना सांगितले, “जर इस्त्रायली नागरिकांना लक्ष्य केले गेले, तर इस्त्रायल इराणी ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला करण्यास तयार आहे.”
इस्त्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर शुक्रवारी तेलाच्या किमती आधीच १४ टक्क्यांनी वाढल्या होत्या. तेलाच्या किमती पुन्हा सात टक्क्यांनी वाढून ७३ डॉलर्स म्हणजेच प्रति बॅरल ६,२०० रुपये झाल्या. नुकत्याच झालेल्या या हल्ल्यामुळे १६ जूनपासून तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात. पश्चिम आशियातील संघर्षामुळे उर्वरित जगाला होणारा तेलाचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इराण पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या संघटनेचा (ओपेक) भाग आहे. इराण सध्या दररोज सुमारे ३.३ दशलक्ष बॅरल (बीपीडी) उत्पादन करतो आणि दररोज २० लाख बॅरलपेक्षा जास्त तेल आणि इंधन निर्यात करतो.
“इस्त्रायली कारवाईने आतापर्यंत इराणी ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य केलेले नाही. त्यात इराणमधील खार्ग बेटाचा समावेश आहे. खार्ग बेटावरून इराणमधील अंदाजे ९० टक्के कच्च्या तेलाची निर्यात केली जाते,” असे सोसायटी जनरल येथील कमोडिटी रिसर्चचे प्रमुख बेन हॉफ यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे सांगितले, ” अलीकडील हल्ल्यामुळे ऊर्जा प्रकल्पांवर अधिक हल्ले होण्याची शक्यता निर्माण होते, त्यामुळे या संघर्षात आणखी वाढ होऊ शकते. एका बाजूने तेल पायाभूत सुविधांवर हल्ला केल्यास दुसऱ्या बाजूच्या तेल क्षेत्रावर प्रत्युत्तरात्मक हल्ला होऊ शकतो,” असे हॉफ म्हणाले.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराकच यांनी रविवारी सांगितले की, इस्त्रायलने साऊथ पार्स गॅस क्षेत्रावर हल्ला करण्याचा घेतलेला निर्णय प्रचंड आक्रमकता आणि अतिशय धोकादायक होता. ते म्हणाले, “पर्शियन आखाती प्रदेशात संघर्ष ओढवणे ही एक मोठी धोरणात्मक चूक आहे. ही चूक कदाचित जाणूनबुजून आणि इराणच्या पलीकडे युद्ध वाढवण्याच्या उद्देशाने केली गेली असेल,” असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, आखाती प्रदेशातील लष्करी हालचाली संपूर्ण प्रदेशावर आणि कदाचित संपूर्ण जगावर परिणाम करू शकतात.” त्यांनी म्हटले की, तेहरानने आतापर्यंत केलेल्या कृती परकीय आक्रमणापासून स्वसंरक्षणार्थ केल्या गेल्या आहेत.
त्यांनी असाही दावा केला की, इस्त्रायल सध्या सुरू असलेल्या इराण-अमेरिका अणु चर्चा थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी पुढे सांगितले, “अमेरिकेने हिरवा कंदील दिल्याशिवाय आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय इस्त्रायलचा हल्ला कधीच झाला नसता. जर अमेरिकेला त्यांची सद्भावना सिद्ध करायची असेल तर इस्त्रायली हल्ल्यांचा निषेध करणे आवश्यक आहे.”