Japan flu outbreak करोना महामारीनंतर आता जगावर आणखी एका संकट घोंघावत आहे. जपानमध्ये इन्फ्लुएंझाच्या (Influenza – फ्लू) रुग्णांमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. ही वाढ झाल्यानंतर देशात अधिकृतपणे राष्ट्रव्यापी ‘इन्फ्लुएंझा महामारी/फ्लू महामारी’ घोषित करण्यात आली आहे. त्याचाच अर्थ इन्फ्लुएंझा हा साथीचा रोग असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. फ्लूच्या नेहमीच्या हंगामाच्या अनेक आठवडे आधीच ही वाढ झाली आहे. या अचानक आलेल्या लाटेमुळे तेथील नागरिक आणि वैद्यकीय तज्ज्ञ दोघेही चिंतेत आहेत, ज्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य संकटाची भीती निर्माण झाली आहे.

साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP) नुसार, या उद्रेकामुळे अनेक शाळा बंद कराव्या लागल्या असून, रुग्णांची संख्या इतकी आहे की, देशातील रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल करून घेण्यास अडचणी येत आहेत. अनेक वॉर्डमध्ये त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल केले जात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा करोना महामारीच्या भयावह आठवणी जाग्या झाल्या आहेत. जपानमधील या संकटाची कारणे काय? त्याचा भारतासह जगाला धोका आहे का? नक्की काय घडतंय? इन्फ्लुएंझाला महामारी घोषित करण्याचे कारण काय? जाणून घेऊयात…

जपानमधील महामारी

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, जपानी आरोग्य प्राधिकरणांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्फ्लुएंझा रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. या वर्षीची सर्वांत असामान्य गोष्ट म्हणजे याची वेळ. जपानमध्ये फ्लूचा हंगाम सामान्यतः नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरमध्ये सुरू होतो; परंतु हा उद्रेक सुमारे पाच आठवडे लवकर झाला आहे, ज्यामुळे नागरिक आणि अधिकारी दोघेही अचंबित झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, ३ ऑक्टोबरपर्यंत चार हजारहून अधिक लोकांना इन्फ्लुएंझामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही मागील आठवड्याच्या तुलनेत चार पटींनी झालेली वाढ आहे.

संपूर्ण देशातील रुग्णालयांमधील गर्दी पाहाता, कोविड-१९ महामारीची आठवण होत आहे. प्रतीक्षालये पूर्णपणे भरलेली आहेत आणि कर्मचाऱ्यांची कमतरता वाढलेला ताण दर्शवत आहे. अधिकाऱ्यांनी लोकांना अनावश्यकपणे रुग्णालयात येण्यास मनाई केली आहे. तसेच, फ्लूची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले आहे. आतापर्यंत जपानमधील ४७ पैकी २८ विभागांमध्ये (Prefectures) रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदवली गेली आहे. टोकिओ, ओकिनावा व कागोशिमा येथे पुढील प्रसार रोखण्यासाठी किमान १३५ शाळा आणि बालसंगोपन केंद्रे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत.

आरोग्य अधिकारी वृद्ध, लहान मुले आणि इतर आरोग्य समस्या असलेल्या नागरिकांना विलंब न करता, लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले जात आहेत. होक्काइडोच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठातील प्रोफेसर योको त्सुकामोतो यांच्या मते, “बहुतेक निरोगी लोकांसाठी, फ्लू त्रासदायक असू शकतो; पण तो धोकादायक नसतो. पण असुरक्षित गटांनी लवकर लसीकरण करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

फ्लूचा उद्रेक चिंताजनक का आहे?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जपानमधील फ्लूच्या हंगामाची लवकर झालेली सुरुवात दर्शवते की महामारीनंतरच्या जगात इन्फ्लूएंझा विषाणू नवीन परिस्थितीशी कसा जुळवून घेत आहे. त्सुकामोतो यांनी SCMP ला सांगितले की, “बदलत्या जागतिक वातावरणात, हे एक सामान्य चित्र ठरू शकते.” अधिकाऱ्यांनी रहिवासी आणि पर्यटक दोघांनाही लवकर लसीकरण करून घेण्याचे आणि मूलभूत स्वच्छतेच्या उपायांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्सुकामोतो यांनी यावर म्हटले की, निरोगी प्रौढांसाठी फ्लू क्वचितच धोकादायक असतो; परंतु लहान मुले, वृद्ध आणि आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

जपानमध्ये १५ वर्षांहून अधिक काळ राहणाऱ्या प्रवास विश्लेषक ॲशले हार्वे यांनी SCMP ला सांगितले की, प्रवाशांनी वारंवार हात धुणे, हवेशीर जागा आणि आवश्यक असल्यास मास्क घालणे यांसारखी खबरदारी घ्यावी. ते पुढे म्हणाले, “लोकांनी सामान्य ज्ञान वापरून खबरदारी घ्यावी, लसीकरण करावे, नियमितपणे हात धुवावेत आणि संसर्ग पसरवणे टाळावे.” जागतिक प्रवास विषाणूला नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत करू शकते, असा इशारा त्सुकामोतो यांनी दिला. त्यामुळे याचा प्रसार इतर देशांतही होऊ शकतो. इन्फ्लूएंझा स्ट्रेन्स (विषाणूचे प्रकार) अधिक वेगाने पसरण्यासाठी विकसित होत असावेत, असे त्यांचे सांगणे आहे.

यामुळे भयावह महामारीची परिस्थिती निर्माण होईल का?

हा एक हंगामी इन्फ्लूएंझाचा उद्रेक (Seasonal Influenza Epidemic) आहे, जो मुख्यतः H3N2 स्ट्रेनमुळे होतो. परंतु, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, ही एक धोक्याची सूचना आहे. या विषाणूचा जलद आणि तीव्र प्रसार दर्शवतो की, फ्लूचे विषाणू किती वेगाने स्वरूप बदलतात. त्यामुळे त्यांचे सतत निरीक्षण आणि लसीकरण आजही महत्त्वाचे आहे.

भारतासाठी याचा काय अर्थ आहे?

भारतातही फ्लूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, विशेषतः उत्तर आणि पूर्व भागांमध्ये. डॉक्टरांनी आधीच H3N2 चे रुग्ण नोंदवले आहेत. त्याव्यतिरिक्त लोकांना बरेच दिवस चालणारा खोकला, थकवा आणि जास्त ताप येत असल्याचे दिसून येत आहे. जपानमध्ये या काळात प्रचंड थंडी असते, तर भारतात उबदार हवामान असते. साधारणपणे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात भारतात जास्त प्रकरणे दिसून येतात. अनेक देशांच्या तुलनेत भारतात इन्फ्लूएंझा लसीकरणाचा दर खूप कमी आहे. सण-समारंभाच्या काळात वाढलेला प्रवास आदी गोष्टींमुळे भारताला प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम आणि जनजागृती मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

फ्लूच्या या काळात स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?

१. लवकर लसीकरण करा : फ्लूची लस हा सर्वांत प्रभावी मार्ग आहे, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, मुले, गर्भवती महिला आणि मधुमेह, हृदय किंवा श्वसनविकार असलेल्या लोकांसाठी.

२. आजारी असल्यास घरीच थांबा : हलका ताप किंवा खोकलादेखील संसर्ग पसरवू शकतो. विश्रांती घ्या आणि बाहेर जाण्याची आवश्यकता असल्यास मास्क घाला.

३. हवा खेळती ठेवा आणि स्वच्छता राखा : शक्य असेल तेव्हा खिडक्या उघड्या ठेवा, वारंवार हात धुवा आणि सणासुदीच्या काळात गर्दीच्या वेळी पृष्ठभाग निर्जंतुक करा.

४. शरीरातील पाणी आणि पोषण नियंत्रणात ठेवा : मजबूत रोगप्रतिकार शक्ती तुमचे संरक्षण करण्यास प्रभावी ठरू शकते. फळे, भाज्या आणि व्हिटॅमिन सीने समृद्ध पदार्थ खा.

५. लवकर वैद्यकीय मदत घ्या: लक्षणे दिसू लागल्यानंतर पहिल्या ४८ तासांत अँटीव्हायरल औषधे चांगला परिणाम करतात. लक्षणे बिघडल्यास किंवा जास्त काळ राहिल्यास दुर्लक्ष करू नका.

जपानमधील फ्लूची लाट उर्वरित आशियासाठी एक इशारा आहे. फ्लूच्या विषाणूमध्ये बदल होत आहेत. प्रवास आणि हवामान बदलांमुळे विषाणू अधिकाधिक वेगाने पसरत आहे. भारतात फ्लूचे लसीकरण ऐच्छिक न ठेवता, तो आरोग्य दिनचर्येचा भाग करण्याची गरज आहे. एकूणच परिस्थितीतून हे स्पष्ट होते की, लसीकरण करणे, विश्रांती घेणे आणि जबाबदारीने वागणे फायद्याचे ठरू शकेल. जागरूकता आणि कृतीतून फ्लू जीवघेणा ठरणार नाही.