Rajasthan Governor Haribhau Bagade Jodha Akbar claims: राजस्थानचे राज्यपाल (Governor of Rajasthan) हरिभाऊ बागडे यांनी जोधाबाई आणि अकबर यांची प्रेमकथा काल्पनिक असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर हा ऐतिहासिक विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जोधा-अकबर ही प्रेमकथा नेहमीच भारतीय चित्रपट आणि सिरियल्सचा आवडता विषय आहे. किंबहुना भारतीय राजकारणातही या विषयावर नेहमीच उहापोह होताना दिसतो. त्याच पार्श्वभूमीवर हा विषय पुन्हा का चर्चेत आला आहे आणि त्यामागील ऐतिहासिक तथ्य नेमकं काय आहे, याचा घेतलेला हा आढावा.
राजस्थानचे राज्यपाल काय म्हणाले?
राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांनी जोधा बाईच्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. बुधवारी (२८ मे) उदयपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटले की, मुघल सम्राट अकबराच्या कारकिर्दीचा अधिकृत इतिहास असलेल्या अबुल फजल लिखित अकबरनामामध्ये जोधाबाई आणि अकबर यांच्या विवाहाचा कुठेही उल्लेख नाही. ते पुढे म्हणाले, “जोधा आणि अकबर यांचा विवाह झाला होता असं सांगितलं जात आणि त्यावर एक चित्रपटही तयार झाला आहे. इतिहासाच्या पुस्तकांमध्येही हेच लिहिलंय. परंतु, ते सगळं खोटं आहे,” असा दावा बागडे यांनी केला.
त्यानंतर त्यांनी आणखी एक वादग्रस्त विधान करत म्हटलं की, “अकबराचा विवाह राजा भारमलच्या दासीच्या मुलीशी झाला होता.” ब्रिटिशांनी आपल्या इतिहासाची मोडतोड केली, सुरुवातीला त्यांनीच लिहिलेला इतिहास मान्य केला गेला. नंतरच्या कालखंडात काही भारतीय इतिहासकारांनी इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यावरही ब्रिटिशांचाच प्रभाव होता, असं बागडे म्हणाले. किंबहुना “राजपूत राजा महाराणा प्रतापने अकबराला तहासाठी पत्र लिहिलं होतं, असा दावा केला जातो. पण तो दावा चुकीचा आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
जोधा-अकबर प्रेमकथा
मुघल बादशहा अकबराने १५६२ साली एका राजपूत राजकन्येशी विवाह केला, असे सांगितले जाते. मात्र, अनेकांच्या मते तिचे मूळ नाव ‘जोधा बाई’ नव्हते. ऐतिहासिक नोंदीनुसार अकबराचा विवाह हरखा बाईशी झाला होता. ती आमेर (आधुनिक राजस्थानमधील अंबर) येथील राजा भारमल यांची कन्या होती. अकबराची ती तिसरी पत्नी होती आणि विवाहानंतर ती आग्रा किल्ल्यात राहावयास गेली. इतिहासकारांच्या मते, हा विवाह एक राजकीय युती होती.
“ती जयपूरच्या राजघराण्यातील राजकन्या होती आणि मुघल मुस्लीम असल्याने ते अनेकदा अजमेरला यात्रेस जात असत. अजमेर हे राजस्थानकडे जाण्याचं प्रवेशद्वार मानलं जायचं. या विवाहामुळे त्या मार्गावरील प्रवास सुलभ झाला. शिवाय, जोधा बाईचे वडील राजा भारमल यांनी अकबराचे इतर राजपूत संस्थानांशी संबंध सुधारण्यात मध्यस्थी केली आणि त्यामुळे अकबराचे राज्य अधिक स्थिर झाले,” असे इतिहासकार नितीन सिंग यांनी Condé Nast Traveller या मासिकाला २०२२ साली सांगितले होते.
अनेक वर्णनांमध्ये असे म्हटले आहे की, जोधा बाई ही अकबराची सर्वांत आवडती राणी होती आणि तिच्या प्रभावामुळे तो अधिक सहिष्णू आणि सर्वधर्मसमभाव मानणारा शासक झाला. अकबराच्या मुलाचा जन्म जोधा बाईच्या पोटी झाला. तोच सलीम जो पुढे जहांगीर म्हणून ओळखला गेला. अकबर मुलाच्या जन्मासाठी फारच आतुर होता, त्यामुळे त्याने जोधाला मरीयम-उझ-ज़मानी हे मानपद दिलं. मरीयम-उझ-ज़मानी म्हणजे “या युगातील मरियम,” असं Condé Nast Traveller च्या लेखात नमूद करण्यात आलं आहे. मुलगा झाल्यामुळे जोधा बाईला महत्त्व आल्याचे काही अभ्यासक मानतात.
जोधाचा प्रभाव
जोधा ही बुद्धिमान आणि दूरदृष्टी असलेली राणी होती. तिने अकबराच्या राजकीय आणि सामाजिक धोरणांवर मोठा प्रभाव टाकला. अकबरनामाचा उल्लेख करत Condé Nast Traveller च्या अहवालात असं म्हटलं आहे की, अकबरच्या सर्वधर्मसमभाव वृत्तीमागे जोधाचा प्रभाव हा प्रमुख प्रेरणास्रोत म्हणून वर्णन केलं गेलं आहे. १५६३ साली अकबराने जिझिया कर रद्द केला आणि त्यामुळे त्याला हिंदू प्रजेमध्ये मोठा पाठिंबा मिळाला. त्याचप्रमाणे त्याने सुल्ह-ए-कुल म्हणजेच शांतता धोरण राबवलं.
इतिहासकार विल्यम डालरिंपल यांनी त्यांच्या Empire या इतिहासावर-आधारित पॉडकास्टमध्ये अकबराच्या Empire of Tolerance अर्थात सहिष्णुतेच्या साम्राज्याची चर्चा केली आहे. “सम्राट म्हणून अकबराने प्रशासनातील सर्व स्तरांवर हिंदूंना प्रोत्साहन दिलं. राजपूत राजकन्येशी विवाह केला आणि जयपूरच्या राजा मानसिंह या आपल्या माजी हिंदू विरोधकाच्या हाती सैन्याची जबाबदारी सोपवली,” असं त्यांनी म्हटलं आहे. जोधा बाई शाकाहारी असल्यामुळे अकबराने तिच्यासाठी स्वतंत्र स्वयंपाकघर उभारण्याचे आदेश दिले होते. “विवाहानंतर अकबर आठवड्यातून तीन दिवस स्वतःहून शाकाहार पाळत असे,” अशी माहिती नितीन सिंग यांनी Condé Nast Traveller ला दिली.
शिक्षण न मिळालेला अकबर जोधा बाईवर इतका विश्वास ठेवत असे की, तिला अधिकृत शासकीय हुकुमनामे (फरमाने) जारी करण्याचा आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकारही दिला होता. अकबरच्या जोधावरील प्रेमामुळे त्याने हिंदू धार्मिक रितीरिवाजही स्वीकारले. त्याने केवळ तिच्यासाठी खास राजवाडा बांधला नाही, तर त्या राजवाड्यात भगवान श्रीकृष्णाचे मंदिरही उभारले. Condé Nast Traveller India ला दिलेल्या माहितीनुसार, नितीन सिंग यांनी सांगितले की, जोधाचा हा राजवाडा पुढे जहांगीरने वापरला आणि तो जहांगीरी महाल म्हणून ओळखला जाऊ लागला.
टाइम्स ऑफ इंडियाच्या (TOI) अहवालानुसार, आग्र्यातील अकबराच्या समाधीपासून अवघ्या एका किलोमीटर अंतरावर जोधा बाईची समाधी आहे. या समाधीच्या प्रवेशद्वारावर भारतीय पुरातत्त्व विभागाने (ASI) ठेवलेल्या शिलालेखात (बोर्डवर) नमूद केले आहे की, ही समाधी मरीयम-उझ-ज़मानी..अंबरच्या राजकन्येची आहे.. तिने अकबराशी विवाह केला होता.
विरोधाभासी कथा
अकबरानामामध्ये जोधा बाईच्या नावाचा उल्लेख आढळत नसल्यामुळे काही इतिहासकार असा दावा करतात की, जोधाचा अकबराशी विवाहच झाला नव्हता. त्याऐवजी, काहींच्या मते जोधा ही अकबरचा मुलगा जहांगीरची पत्नी होती. पार्वती शर्मा यांच्या Akbar of Hindustan या चरित्रग्रंथात उल्लेख आहे की, अकबराचा विवाह राजा बिहारीमल कछवाहा यांची कन्या हरखा हिच्याशी झाला होता. शर्मा यांनी लिहिलं आहे की, हरखा हिला “अनेकदा चुकीने जोधा बाई समजलं जातं”. त्यात पुढे असंही म्हटलं आहे की, “इतिहासात हरखा केवळ अकबराची पत्नी म्हणूनच ओळखली जात नाही, तर ती एक यशस्वी व्यापारी महिला म्हणूनही ओळखली जाते. तिचा अकबराच्या विचारांवर, धर्म, धोरण, अगदी आहार यांवरही मोठा प्रभाव होता.” शर्मा यांनी हेही स्पष्ट केलं आहे की, हरखा हीच अकबरच्या पहिल्या पुत्राची माता होती.
दुसरीकडे, लेखक लुईस द असिस कोरेया यांनी एक वेगळाच दावा केला आहे. जोधा बाई राजपूत नव्हे, तर डोना मारिया मास्करेनहास नावाची पोर्तुगीज महिला होती. त्यांच्या Portuguese India and Mughal Relations, 1510-1735 या पुस्तकात म्हटलं आहे की, मास्करेनहास हिला गुजरातच्या सुलतान बहादुरशाहने पकडलं आणि तिला तरुण अकबराच्या स्वाधीन केलं. तिच्या सौंदर्यावर मोहित होऊन अकबराने तिच्याशी विवाह केला. एकुणातच या साऱ्या विरोधाभासी कथा आजही वाद निर्माण करतात.