अमेरिकी अध्यक्षीय लढतीअंतर्गत दुसऱ्या वाद चर्चेमध्ये (डिबेट) डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांनी त्यांचे रिपब्लिकन पक्षाचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बाजी मारल्याची चर्चा आहे. कमला हॅरिस यांनी अतिशय आत्मविश्वासाने प्रश्नांची मांडणी केली आणि ट्रम्प यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ट्रम्प यांची चरफड अनेकदा स्पष्टपणे दिसून आली. डिबेटच्या सुरुवातीसच हॅरिस यांनी स्वतःहून जाऊन ट्रम्प यांच्याशी हस्तांदोलन केले. या अनपेक्षित पवित्र्यासमोर ट्रम्प काहीसे गोंधळले. कारण तीन महिन्यांपूर्वी जो बायडेन आणि ट्रम्प यांनी परस्परांशी हस्तांदोलन केले नव्हते.

हॅरिस यांचा ‘गनिमी कावा’

कमला हॅरिस यांनी जराही वेळ न दवडता अनेक मुद्द्यांना थेट हात घातला आणि जनतेशीच चर्चा करत असल्याचे दाखवून दिले. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती, घरांच्या किमती आणि घरभाडी सर्वसामान्य नोकरदार अमेरिकन वर्गाच्या आटोक्यात राहतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी ट्रम्प यांना चिथावले. ‘तुमच्या सभांना येणारे सभा संपण्याआधीच कंटाळून निघून जातात. कारण तुम्ही तेच-तेच बरळत बसता’, ‘तालिबानसारख्यांशी सौदे कसले करता. तो तर तुमचा सर्वांत कमकुवत करार’ या प्रहारांनी ट्रम्प घायाळ झाल्यासारखे झाले आणि मूळ मुद्द्याला सोडून आपण कसे श्रेष्ठ आहोत हेच सांगत बसले. अर्थव्यवस्था, स्थलांतरित, गर्भपात या मुद्द्यांवर डेमोक्रॅटिक पक्षाची भूमिका हॅरिस यांनी व्यवस्थित मांडली. स्थलांतरितांच्या मुद्द्यावर डेमोक्रॅटिक पक्ष अगदी अलीकडेपर्यंत काहीसा गोंधळल्यासारखा होता आणि रिपब्लिकन आक्रमणाची सर्वाधिक धार याच मुद्द्यावर व्यक्त होते. पण या अवघड जागेवर हॅरिस यांनी वकिली चतुराईने वेळ निभावून नेली. एकदा तर ‘तुम्ही जो बायडेन यांच्यासमोर नाही, तर माझ्यासमोर उभे आहात, याचे भान असूद्या’ असेही त्यांनी सुनावले. मागच्या पानावर किती वेळ राहणार, जरा पुढच्या पानावर सरका की, हा त्यांचा टोला प्रभावी ठरला.

हेही वाचा – भारतीय वायूदलातील विंग कमांडरवर बलात्काराचा आरोप : भारताच्या सशस्त्र दलांमध्ये वाढला महिलांचा लैंगिक छळ?

ट्रम्प ‘बॅकफूट’वर

ओहायो सिटी या शहरात हैतीचे निर्वासित स्थानिकांचे पाळीव प्राणी पळवून खातात, याचा दाखला ट्रम्प यांनी दिला. पण एबीसी न्यूज वाहिनीच्या सूत्रधाराने तो दावा तथ्यहीन असल्याचे लगेच दाखवून दिल्यावर ट्रम्प गांगरले. पुढील अध्यक्षीय टर्ममध्ये आपण काय करणार हे सांगण्याऐवजी ट्रम्प यांनी त्यांच्या आधीच्या कृत्यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटॉल हिलवर झालेल्या उठावास आपण चिथावणी दिली नव्हती. आपण त्यावेळी केवळ भाषण केले असे ट्रम्प म्हणाले. करोना साथ, लष्करी सल्लागारांची हकालपट्टी या अवघड मुद्द्यांवर भाष्य करण्यास ट्रम्प यांना हॅरिस यांनी अक्षरशः भाग पाडले. अफगाणिस्तानातून माघार हा खरे तर बायडेन प्रशासनासाठी नाजूक मुद्दा. पण त्यावर आक्रमक होण्याऐवजी तालिबानला चर्चेसाठी का बोलावले, याचे समर्थन त्यांना करावे लागले.

गर्भपाताच्या प्रश्नावर कोंडी

गर्भपाताच्या प्रश्नावर कमला हॅरिस यांनी वर्चस्व गाजवणे अपेक्षित होते. तसेच झाले. पण या प्रश्नावर ट्रम्प हे अनपेक्षित गोंधळल्यासारखे दिसले आणि बचावात्मक वावरले. बायडेन यांना २७ जून रोजीच्या डिबेटमध्ये ट्रम्प यांना कोंडीत पकडण्याची सुवर्णसंधी होती, ती त्यांनी गमावली. हॅरिस यांनी ती चूक केली नाही. आपण गर्भपाताच्या विरोधात नाही. पण आता आपल्या मताला काही अर्थ उरलेला नाही. कारण हा विषय राज्यांच्या अखत्यारीतला बनला आहे, असे सांगत ट्रम्प यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. रो वि. वेड खटल्यातील निकाल रद्द ठरवण्याची प्रतिगामी कृती अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने केली, कारण ट्रम्प यांनी रिपब्लिकन न्यायाधीशांची तेथे नेमणूक केली. त्यामुळे त्या निकालाची जबाबदारी ट्रम्प यांचीही आहे. अर्थात हॅरिस यांनी ट्रम्प यांना सहजासहजी सोडले नाही. ट्रम्प यांची गर्भपातावरील भूमिका अमेरिकेतील महिलांसाठी अवमानास्पद असल्याचे हॅरिस यांनी ठासून सांगितले.

हेही वाचा – ९/११ च्या आत्मघातकी हल्ल्यानंतर काय बदललं? विमान वाहतुकीच्या सुरक्षा व्यवस्थेत काय बदल झाले?

निवडणुकीवर परिणाम किती?

कमला हॅरिस यांच्यासाठी आणि डेमोक्रॅटिक पक्षासाठी ही डिबेट अत्यंत महत्त्वाची होती. विशेषतः मागील डिबेटमुळे या पक्षावर अध्यक्षीय उमेदवार – तोही विद्यमान राष्ट्राध्यक्ष – बदलण्याची नामुष्की ओढवली होती. पण बायडेन यांचा समजूतदारपणा आणि परिपक्व नेतृत्व यांच्या जोरावर डेमोक्रॅटिक पक्षाने हे आव्हान पेलले. कमला हॅरिस यांना आता पक्षातून निःसंदिग्ध पाठिंबा आहे आणि त्यांच्यामुळे उलट डेमोक्रॅटिक पक्षाची अध्यक्षीय निवडणुकीत जिंकून येण्याची संधी वाढली, अशी समर्थक आणि हितचिंतकांची भावना आहे. सध्याच्या मतदान चाचण्यांनुसार हॅरिस यांना ४९ टक्के, तर ट्रम्प यांना ४७ टक्के मतदारांची पसंती मिळत आहे. अर्थात अजून प्रत्यक्ष निवडणुकीस बरेच दिवस आहेत. शिवाय डिबेटमध्ये निस्तेज ठरणारे उमेदवार अध्यक्षीय निवडणूक जिंकतच नाहीत, असे नाही. २००४ मध्ये जॉर्ज डब्ल्यू. बुश आणि २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्षीय वादचर्चेत पराभूत झाल्याचे नोंदवले गेले. पण दोघेही अध्यक्षीय निवडणुकीत जिंकून आले. निर्वासित गुन्हे करतात, हा ट्रम्प यांचा दावा अजूनही त्यांच्या समर्थकांना विश्वसनीय वाटतो. अमेरिकी अर्थव्यवस्था कोविडच्या आघातातून म्हणावी तितक्या वेगाने आणि तितक्या प्रमाणात सावरलेली नाही. त्यामुळे अजूनही दोन्ही उमेदवारांमध्ये चुरस आहे असेच म्हणावे लागेल.