ब्रिटनच्या राजेशाहीसाठी सध्याचा सर्वात मोठा कठीण काळ आहे. कारण ब्रिटनचे राजे चार्ल्स हे सध्या एका प्रकारच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. बकिंगहॅम पॅलेसने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ७५ वर्षीय राजा चार्ल्स यांना नुकतेच वाढलेल्या प्रोस्टेटवरील उपचारांमुळे कर्करोग झाल्याचे निदान झालेय. किंग चार्ल्स तिसरे कोणत्या कर्करोगाने त्रस्त आहे हे अद्याप उघड झालेले नाही. सोमवारपासून त्यांच्यावर नियमित उपचार सुरू झाल्याचे बकिंगहॅम पॅलेसने सांगितले. किंग चार्ल्स यांच्या कर्करोगाच्या निदानाची बातमी संपूर्ण ब्रिटनमध्ये पसरली आहे. परंतु राजवाड्याकडून यासंदर्भात अजूनही संपूर्ण माहिती देण्यात आलेली नसल्यानं जनताही संभ्रमात आहे. त्यांचे पुत्र विल्यम आणि हॅरी यांच्या काय प्रतिक्रिया आहेत यासुद्धा तिथल्या जनतेला जाणून घ्यायच्या आहेत. किंग चार्ल्स यांच्यानंतर राजगादी कोणाला मिळणार, याचीच आता चर्चा रंगू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किंग चार्ल्सला झाला कर्करोग

सोमवारी बकिंगहॅम पॅलेसने एक निवेदन जारी केले की, किंग चार्ल्स यांना कर्करोगाचे निदान झाले. कर्करोगाचा प्रकार घोषित केला गेला नसला तरी पॅलेसने सांगितले की, वाढलेल्या प्रोस्टेटसाठी त्यांच्या अलीकडील उपचारादरम्यान हे आढळून आले. किंग चार्ल्स यांनी सोमवारी नियमित उपचार घेणे सुरू केले होते आणि या काळात सार्वजनिक कार्यक्रम आणि कर्तव्ये पुढे ढकलली होती. ७५ वर्षीय किंग चार्ल्स मात्र आपले अधिकृत व्यवसाय आणि कार्यालयीन कामकाज नेहमीप्रमाणे सुरू ठेवणार आहेत. पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी त्यांचे साप्ताहिक बोलणे सुरू आहेच. डॉक्टर जोपर्यंत असा संपर्क मर्यादित ठेवण्याचा सल्ला देत नाहीत, तोपर्यंत तो सुरूच राहणार आहे.

हेही वाचाः निवडणुकीच्या तोंडावर इम्रान खान तिसऱ्या पत्नीमुळे अडचणीत, कोण आहेत बुशरा बीबी? जाणून घ्या

राजवाड्याच्या निवेदनात असे म्हटले आहे की, किंग चार्ल्स त्यांच्या उपचारांबद्दल पूर्णपणे सकारात्मक आहेत आणि शक्य तितक्या लवकर सार्वजनिक कर्तव्यावर परत येण्यास उत्सुक आहेत”. दुसरीकडे पत्नी मेघन आणि त्याच्या दोन मुलांसह अमेरिकेमध्ये राहणारा हॅरी त्याच्या वडिलांसाठी युनायटेड किंगडमला परत येण्याची अपेक्षा आहे. मेघन आणि मुलेदेखील परत येतील की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. बातमी समजल्यानंतर प्रिन्स चार्ल्स लवकर बरे व्हावेत यासाठी अनेक जण प्रार्थना करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी प्रिन्स चार्ल्स यांना पूर्ण आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी चिंता व्यक्त केली.

हेही वाचाः बाटलीपासून ते पलंगापर्यंत! पाकिस्तानच्या निवडणुकीतील निवडणूक चिन्हांची चर्चा, अनेक नेते नाराज; वाचा नेमकं प्रकरण काय? 

राजघराण्यांवर दबाव

किंग चार्ल्स आता उपचार घेत असताना सार्वजनिक कर्तव्यांपासून दूर गेल्याने मे महिन्यात कॅनडा आणि ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाचे रॉयल दौरे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. तसेच ते बरे होत असतानाच राजघराण्याला आतापासूनच आपली पावलं सावधपणे टाकावी लागणार आहेत. राजा आजारी असल्यावर राणी कॅमिला चार सल्लागार देखील नेमू शकते. त्यांनी त्यांच्या कार्यक्रमांची संपूर्ण डायरी तयार करून ठेवली आहे, तसेच त्यांच्या पतीला पाठिंबा दिला आहे.

रॉयल समालोचक क्रिस्टन मीन्झर यांनी बिझनेस इनसाइडरला सांगितले की, किंग चार्ल्स यांच्यावर उपचार सुरू असताना कॅमिला जनतेसाठी उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. ही वेळ राणी कॅमिला यांच्यासाठी कठीण असेल कारण त्यांना चार्ल्स यांना मदत करण्यासाठी त्यांच्या शाही कर्तव्यापासून दूर जावे लागेल, जे सद्यस्थितीत त्यांची करायची इच्छा नसावी. ओटीपोटाच्या शस्त्रक्रियेतून हल्लीच बरे झाल्यामुळे कॅमिला यांनी इस्टरपर्यंत शाही कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली आहे. तसेच विल्यमच्याही शाही कुटुंबातील त्यांच्या भूमिकेतील जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. उदाहरणार्थ, बुधवारी ते बकिंघम पॅलेसमध्ये एका समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. विल्यमवर आतापर्यंत कधीही जास्त दबाव आला नाही, कारण पत्नी आणि त्याची तीन मुले आहेत, त्यांची तो काळजी घेत असतो, परंतु आता त्याला वडिलांचे कार्य सांभाळावे लागू शकते.”

विल्यम व्यतिरिक्त राजा चार्ल्स यांची बहीण राजकुमारी ऍनी आणि त्यांचा भाऊ प्रिन्स एडवर्डदेखील आहेत. प्रिन्सेस ऍनी आधीच एक मेहनती राजेशाही घराण्यातील स्त्री आहे, तिने अनेक सार्वजनिक कार्ये पार पाडली आहेत. खरं तर २०२३ मध्ये त्यांनी तब्बल ४५७ साखरपुड्यांचे कार्यक्रम आयोजित केलेत. परंतु तिचेही वय वाढत आहे. ऍनी मेहनती आहेत, तसेच त्या लोकांचा आदर करतात, परंतु त्या आता एक ज्येष्ठ नागरिकही झाल्या आहेत. त्यामुळे त्या किती काळ काम करतील हे आम्ही सांगू शकत नाही, असंही शाही घराण्यातील एकाने सांगितले.

किंग चार्ल्स यांच्या कर्करोगाच्या निदानाची बातमी ब्रिटिश राजेशाहीसाठी एक मोठा धक्का आहे. चार्ल्स आई राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर सप्टेंबर २०२२ मध्येच चार्ल्स राजाच्या पदावर विराजमान झाले. चार्ल्स यांच्या हितचिंतकांना आता राजेशाही घराण्याचा वारसा पुढे कोण चालवणार याची चिंता सतावत आहे. त्यांच्या आई राणी एलिझाबेथ यांनी समर्पित शैलीनं राजेशाही कारभार चालवला. किंग चार्ल्स यांनीसुद्धा आपल्या शांत स्वभावाने कामकाज चालवण्याचा प्रयत्न केला. तसेच चार्ल्स यांनी राजगादी मिळाल्यापासून त्यांची लोकप्रियताही प्रचंड वाढली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले की, ५९ टक्के ब्रिटनच्या मते ते राजा म्हणून चांगले काम करीत आहेत, तर केवळ १७ टक्के लोक म्हणतात की, ते वाईट काम करीत आहेत. परंतु कॅन्सरच्या बातम्यांमुळे आणि सार्वजनिक कर्तव्यापासून दूर गेल्याने ब्रिटनला राजा आवश्यक का आहे याचे महत्त्व अधोरेखित होत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: King charles diagnosed with cancer now what will happen to the throne of britain read in detail vrd