Labubu Doll social media trend आजकाल सोशल मीडियावर एका खास बाहुलीची चर्चा आहे. या बहुलीचे नाव आहे लबुबू डॉल. बाहुली म्हटलं तर डोळ्यासमोर येतो गोंडस, देखणा, लांब केस असलेला चेहरा. अशाच बाहुल्यांबरोबर आपण खेळत आलो आहोत. परंतु, सध्या जगाला ज्या बहुलीची भुरळ पडली आहे, ती या व्याख्येत बसत नाही. या लबुबू डॉलचा चेहरा थोडा गोंडस पण कुरूप आणि विचित्रही आहे.

या बहुलीच्या खरेदीसाठी लोक दुकानांच्या बाहेर रांगा लावत आहेत. बार्बी डॉल आणि टेडी बेअरबरोबर खेळून मोठी झालेली मुले आता विचित्र स्वरूपाची लबुबू डॉल खरेदी करण्यासाठी धडपड करत आहेत. पण, ही बाहुली नेमकी काय आहे? तिची क्रेझ का वाढत आहे? लोक ही बाहुली खरेदी करण्यासाठी का धडपडत आहेत? त्याविषयी जाणून घेऊयात..

लबुबू डॉलची क्रेझ वाढण्याचे कारण काय?

  • लबुबू डॉलचा केवळ ट्रेंड नाही. ही बाहुली एक काल्पनिक पात्रदेखील राहिली आहे.
  • २०१५ मध्ये हाँगकाँगमधील कलाकार केसिंग लंग यांनी ‘द माँन्स्टर्स’ नावाच्या मालिकेंतर्गत काही खेळणी तयार केली होती. त्यातील एका पात्राचे नाव लबुबू आहे.
  • या बाहुलीचे वैशिष्ट्य म्हणजे टोकदार कान, मोठे डोळे आणि नऊ दात दिसणारे धूर्त हास्य आहे.
  • चिनी खेळण्यांची दिग्गज कंपनी पॉप मार्टने या बाहुल्या तयार केल्या आहेत.
(छायाचित्र-रॉयटर्स)

त्यांनी या बाहुल्यांची सीरिज तयार केली आहे. लबुबू बाहुल्यांना ब्लाइंड बॉक्समध्ये पॅक केले जाते आणि खरेदीदारांना त्यांना कोणती आवृत्ती मिळत आहे याची माहिती नसते. ही कंपनीची मार्केटिंग स्ट्रेटेजी आहे आणि त्यामुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता निर्माण होते. ब्लाइंड बॉक्स ही कंपनीची जुनी मार्केटिंग स्ट्रेटेजी आहे.

या बाहुलीच्या विक्रीने कंपनीचे शेअर्स ५०० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. ही बाहुली असणाऱ्या प्रत्येक ब्लाइंड बॉक्सची किंमत ४,००० रुपये आहे. त्यांच्या दुर्मीळ आवृत्त्यांची किंमत तब्बल एक लाखांपर्यंत आहे. या बाहुलीचा संग्रह करणारे लोक नवीन बाहुलीच्या सीरिजची आतुरतेने वाट पाहतात. खेळण्यांच्या दुकानात लोक इतकी गर्दी करतात की काही मिनिटांमध्येच या बाहुल्या विकल्या जातात. ही बाहुली खरेदी करण्यासाठी गर्दी इतकी तीव्र असते की लबुबू बाहुल्या काही मिनिटांतच विकल्या जातात.

या लबुबू डॉल खरं तर जगातील अनेक सेलिब्रिटींच्या हातात दिसल्याने त्यांची क्रेझ वाढताना दिसत आहे. ब्लॅकपिंकच्या के-पॉप सेन्सेशन लिसा, गायिका रिहाना, दुआ लिपा ते फुटबॉल आयकॉन डेव्हिड बेकहॅम आणि बॉलीवूड स्टार अनन्या पांडेपर्यंत प्रत्येकाच्या हँडबॅग्जवर या बाहुल्या लटकल्याचे दिसून येत आहे. एकेकाळी या बाहुलीच्या विचित्र दिसण्यामुळे थट्टा केली जायची, आज तीच लबुबू बाहुली फॅशन अॅक्सेसरी झाली आहे.

ही बाहुली लोकांना का खरेदी करायची आहे?

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, ही खेळणी आजच्या पिढीसाठी आकर्षण ठरत आहे. नॉस्टॅल्जिया आणि मीम संस्कृतीत वाढलेल्या मिलेनियल्ससाठी ही बाहुली आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. लोक आपल्या बॅगवर, घरात ठेवण्यासाठी ही बाहुली खरेदी करत आहेत. सामाजिक मानसशास्त्रज्ञ डॉ. रितू अवस्थी यांनी नमूद केले की, “लबुबूसारखी कुरूप खेळणी सध्याच्या पिढीची क्रेझ झाली आहे.”

परंतु, बाल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रियंका श्रीवास्तव यांनी इशारा दिला की, या विचित्र चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांसह असणाऱ्या बाहुल्या लहान मुलांना मानसिकदृष्ट्या गोंधळात टाकणाऱ्या असू शकतात. त्यांनी म्हटले, “काही मुलांना भयानक स्वप्ने पडू शकतात. खेळण्यातील राक्षसी वैशिष्ट्ये एकतर सर्जनशील विचार वाढवू शकतात किंवा भीती निर्माण करू शकतात, हे मुलाच्या संवेदनशीलतेवर अवलंबून असते,” असे त्यांनी सांगितले.

पालकांना अशा बाहुल्यांबाबत मुले कशी प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष देण्याचा सल्लाही त्यांनी दिला. अशी खेळणी लहान किंवा अधिक संवेदनशील मुलांपासून दूर ठेवण्याचीही त्यांनी शिफारस केली. एका अर्थाने, लबुबू हे केवळ खेळणे राहिलेले नाही. या डॉलच्या विक्रीमुळे पॉप मार्ट कंपनीचे संस्थापक वांग निंग यांची संपत्ती अनेक अब्ज डॉलर्सने वाढली आहे. लबुबू बाहुल्यांची लोकप्रियता सुरुवातीला चीनपुरतीच मर्यादित होती.

मात्र, आता या बाहुल्या जगभरात लोकप्रिय होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक देशांनी केलेल्या या बाहुल्यांच्या मागणीमुळे त्यांची विक्रीदेखील थांबवली आहे. बीजिंगमधील योंगले इंटरनॅशनल लिलावात एका माणसाच्या आकाराची लबुबू बाहुली १.२५ कोटींना विकली गेली आहे. ही बाहुली जगातील सर्वात महागडी लबुबू बाहुली ठरली आहे.