दत्ता जाधव

भारतीय हवामान विभागाने यंदाच्या पावसाळयात दमदार सरींचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याविषयी..

आयएमडीचा पावसाविषयी अंदाज का?

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) यंदाच्या पावसाळयाविषयी जाहीर केलेल्या अंदाजानुसार देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाच्या मुख्य क्षेत्रासह म्हणजे मध्य भारतासह दक्षिण भारत, उत्तर भारतात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज असला, तरीही जम्मू-काश्मीर, लडाख, ईशान्य भारत आणि ओडिशा, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात आयएमडीकडून नैर्ऋत्य मोसमी पावसाचा सुधारित अंदाज जाहीर केला जाईल.

एल-निनो जाऊन ला-निना येणार?

आयएमडीने जगभरातील हवामानविषयक स्थिती देशातील मोसमी पावसासाठी पोषक असल्याचे जाहीर केले आहे. त्यातील अत्यंत महत्त्वाची पोषक स्थिती ला-निनाच्या रूपाने समोर आली आहे. जून २०२३ मध्ये प्रशांत महासागरात सक्रिय असलेली एल-निनोची स्थिती आजअखेर सक्रिय असून, ती मध्यम अवस्थेत आहे. एल-निनोमुळे मागील वर्षांच्या मोसमी पावसावर विपरीत परिणाम झाला होता. यंदाचा मोसमी पावसाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी म्हणजे जूनमध्ये एल-निनोची स्थिती हळूहळू निवळून ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये ला-निनाची स्थिती सक्रिय होईल. ती मोसमी पावसाला पोषक ठरणार आहे.

हेही वाचा >>> सर्वोच्च न्यायालयाचे नऊ न्यायाधीशांचे खंडपीठ कोणत्या प्रकरणांवर सुनावणी करणार?

ला-निनाच्या स्थितीचा किती फायदा?

प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान वाढते आणि प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब वाढलेला असतो, तेव्हा पश्चिमेकडून पूर्व दिशेस वारे वाहतात आणि जमलेली पाण्याची वाफ ढग तिकडे वाहून नेतात. तेव्हा पूर्वेकडील भागात अतिवृष्टी, तर पश्चिमेकडील भागात दुष्काळी स्थिती, अशा प्रकारे एल-निनोचा परिणाम दिसतो. याच्या उलट ला-निनाची स्थिती असते. प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान थंड होते, तेव्हा पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब कमी होतो. तेव्हा प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागाकडे वारे पाण्याची वाफ ढगांच्या स्वरूपात वाहून आणतात आणि त्यातून पश्चिमेकडील भागात अतिवृष्टी होते. ला-निनाच्या काळात आजवर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याचे निरीक्षण आहे. १९७४ ते २००० या काळात २२ वेळा ला-निना स्थिती सक्रिय होती. या २२ वर्षांत मोसमी हंगामाच्या सुरुवातीस एल-निनो स्थिती जाऊन, ला-निना स्थिती आल्याची घटना नऊ वेळा झाली आहे. या नऊ वर्षांत देशात सरासरीपेक्षा जास्तच पाऊस पडला. ला-निना काळात नैर्ऋत्य मोसमी पाऊस सरासरी वेळेत केरळमध्ये दाखल होऊन, सरासरी वेळेत देशभरात पोहोचतो, असेही निरीक्षण आहे.

हेही वाचा >>> एबी’ फॉर्म म्हणजे काय? निवडणुकीत या फॉर्मला इतके महत्त्व का?

हिंद महासागरीय द्विध्रुविता फायदेशीर?

हिंद महासागरीय द्विध्रुविता (इंडियन ओशन डायपोल- आयओडी) सध्या निष्क्रिय अवस्थेत आहे. ती मोसमी पावसाच्या सुरुवातीस सक्रिय होण्याचा आणि त्यामुळे पावसाला पोषक स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. पश्चिम हिंद महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान पूर्व हिंद महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानापेक्षा कमी किंवा जास्त होणे, या स्थितीला हिंद महासागर द्विध्रुविता म्हटले जाते. ती कधी तटस्थ, कधी नकारात्मक तर कधी सकारात्मक असते. तटस्थ किंवा सामान्य स्थितीच्या काळात पूर्व हिंद महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान थोडेसे वाढते. तेव्हा पूर्व हिंद महासागर क्षेत्रात मोसमी पाऊस सामान्य राहतो. नकारात्मक स्थितीच्या काळात पूर्व हिंद महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान पश्चिम हिंद महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानापेक्षा जास्त असते. प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याच्या प्रवाहामुळेही तापमानवाढ होते. या काळात देशात पाऊसमान तुलनेने कमी असते. सकारात्मक स्थितीच्या काळात पश्चिम हिंद महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान पूर्व हिंद महासागराच्या तुलनेत जास्त उष्ण असते. या काळात देशात चांगले पाऊसमान असते.

युरेशियातील बर्फवृष्टीचा परिणाम होतो?

युरेशिया म्हणजे युरोप आणि आशियातील बर्फ पडण्याच्या क्षेत्रात २०२४ च्या पहिल्या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा कमी हिमवृष्टी झाली आहे. मार्चमध्ये उत्तर गोलार्धात बर्फाचे आच्छादन १९९१-२०२०च्या सरासरीपेक्षा कमी राहिले. युरेशियात दोन लाख २० हजार चौरस मैल क्षेत्रावर बर्फाचे आच्छादन होते. युरेशियाच्या सरासरीच्या तुलनेत ते कमीच राहिले. बर्फवृष्टी जास्त राहिल्यास हिमालयीन भागासह राजस्थानसारख्या प्रदेशात तापमान कमी राहते. बर्फ कमी पडल्यास तापमान वाढते. त्यामुळे  हवेचा दाब कमी होऊन मोसमी वाऱ्याचा प्रवाह जोमाने पुढे सरकतो. युरेशियात बर्फ कमी पडणे देशातील मोसमी पावसासाठी पोषक ठरते. यंदा ला-निनो, आयओडी आणि युरेशियातील कमी बर्फवृष्टी, या हवामानविषयक जागतिक घडामोडी देशातील मोसमी पावसासाठी पोषक ठरतील, असा आयएमडीचा अंदाज आहे.

dattatray.jadhav@expressindia.com