विनायक डिगे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मधुमेह, रक्तदाब यांसारख्या जीवनशैलीशी निगडित आजारांचे रुग्ण येत्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढण्याचा अंदाज विविध अहवालांच्या निष्कर्षांत दिसून येतो. त्यातच आता कर्करोगाची भर पडली आहे. येत्या काही काळात भारतात कर्करोगाचे जगातील सर्वाधिक रुग्ण असतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

परिस्थिती लवकरच गंभीर

इतर देशांच्या तुलनेत लोकसंख्या अधिक असल्याने भारतात विविध आजारांच्या रुग्णांची संख्या अधिक दिसते. हे सरधोपट गणित नाकारता येणारे नसले तरी सध्या कर्करोगाच्या रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे. मागील पाच वर्षांमध्ये देशात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रमाण याच गतीने वाढत राहिल्यास पुढील २० वर्षांमध्ये भारत कर्करोग रुग्णांच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकेल अशी शक्यता ‘ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरी’ या जागतिक संस्थेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात वर्तविली आहे.

सध्या काय स्थिती?

देशात २०२० मध्ये १३ लाख ९२ हजार १७९ कर्करोगाच्या रुग्णांची नोंद झाली होती. ही रुग्णसंख्या २०२३ मध्ये १४ ला‌ख ९६ हजार ९७२ इतकी झाली आहे. म्हणजे जवळपास एक लाखांपेक्षा अधिक कर्करोग रुग्णांची नाेंद झाली आहे. २०२३ मध्ये नोंद झालेल्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद उत्तर प्रदेशमध्ये २ लाख १० हजार ९५८ इतकी झाली. त्याखालोखाल महाराष्ट्रात १ लाख २१ हजार ७१७, पश्चिम बंगालमध्ये १ लाख १३ हजार ५८१ , बिहारमध्ये १ लाख ९ हजार २७४ आणि तामिळनाडूमध्ये ९३ हजार ५३६ इतक्या रुग्णांची नाेंद झाली आहे. यामध्ये स्तन, ओठ आणि तोंड, गर्भाशय ग्रीवा, फुप्फुस आणि अन्ननलिका कर्करोगाचे रुग्ण अधिक आहेत. 

हेही वाचा >>> विश्लेषण: आयटीतील घसघशीत पगाराला मंदीची कात्री?

ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरी अहवाल काय सांगतो?

ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरीच्या अहवालानुसार २० वर्षांनंतर भारतातील नवीन कर्करोग रुग्णांची संख्या २४ लाख ५६ हजार ४७८ पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. यावरून २०२२ च्या तुलनेत २०४५ पर्यंत कर्करोग रुग्णांच्या संख्येत ७३.८ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र याच २० वर्षांत अमेरिकेतील नवीन कर्करोग रुग्णांच्या संख्या ४२ टक्क्यांनी तर संपूर्ण जगातील कर्करोग रुग्णांची संख्या ६३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता अहवालात वर्तवली आहे. कर्करोग रुग्णांची संख्या वाढण्याबरोबरच मृत्यूच्या प्रमाणातही वाढ होईल, असा अंदाज आहे. २०२२ मध्ये भारतात कर्करोगाने ९ लाख १६ हजार ८२७ रुग्णांचा मृत्यू झाला. २०४५ मध्ये ही संख्या १६ लाख ५७ हजार ५१९ इतकी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातील कर्करोगाने एकूण मृत्यूंचे प्रमाण सध्याच्या २०२२च्या तुलनेत ८०.८ टक्क्यांनी वाढणार आहे. तर याच कालावधीत अमेरिकेतील वाढ ५४ टक्के तर जगातील वाढ ७३ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यावरून पुढील २० वर्षांत नवीन रुग्ण आणि कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत भारत अमेरिकेला मागे टाकून जगाची कर्करोगाची राजधानी बनणार असल्याचे ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील स्थिती कशी?

आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात २०१३ मध्ये कर्करोग रुग्णांची संख्या ९७ हजार ७५९ इतकी होती. मागील १० वर्षांत राज्यात कर्करोग रुग्णांची संख्या १ लाख २१ हजार ७१७ इतकी झाली आहे. कर्करोग रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये स्तन कर्करोग, मौखिक कर्करोग आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोग रुग्णांची संख्या अधिक आहे.

हेही वाचा >>> कायदेशीर जगतातील ‘भीष्म पितामह’; कोण होते फली एस नरिमन? वाचा सविस्तर

कारणे काय?

बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, मद्यपान, धूम्रपान, वाढते प्रदूषण, वाढता तणाव आणि शारीरिक व्यायामाचा अभाव अशा अनेक महत्त्वाच्या कारणांमुळे मागील काही वर्षांपासून कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच भारतातील नागरिकांमध्ये जंक फूडच्या सेवनाचे प्रमाण वाढल्याने स्थूलपणाही वाढत चालला आहे. स्थूलपणा हे  कर्करोगाचे महत्त्वाचे कारण समजले जाते. यामुळे मागील पाच वर्षांत देशात कर्करोग रुग्णांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ होताना दिसून येत असल्याचे नायर रुग्णालयातील कर्करोग विभाग प्रमुख डॉ. गिरीश राजाध्यक्ष यांनी सांगितले.

दुर्लक्षाची किंमत?

पाच टक्के रुग्णांमध्ये कर्करोग होण्याचे कारण हे अनुवांशिक असते. तंबाखूजन्य पदार्थ आणि रासायनिक घटकांच्या वापरामुळे होणारे कर्करोग टाळणे शक्य आहे. मात्र त्याकडे भारतात दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते, असे बॉम्बे रुग्णालयातील कर्करोग तज्ज्ञ व रेडिओथेरपी विभागप्रमुख डॉ. दिलीप निकम यांनी सांगितले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis india estimated highest number of cancer patients in the world print exp zws
First published on: 22-02-2024 at 07:30 IST