अन्वय सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या वरिष्ठ संघापाठोपाठ युवा (१९ वर्षांखालील) संघालाही विश्वविजयाने हुलकावणी दिली. गेल्या सात महिन्यांत भारताला तीन जागतिक क्रिकेट स्पर्धांमध्ये जेतेपदाची संधी होती. भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी), एकदिवसीय विश्वचषक आणि युवा विश्वचषक या स्पर्धांची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, तिन्ही वेळा ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्याने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम टप्प्यापर्यंत पोहचूनही भारतीय संघाला शिखर सर करण्यात अपयश का येते आणि ऑस्ट्रेलियासमोर त्यांचा खेळ का ढेपाळतो, याचा आढावा.

युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषकात काय घडले?

विक्रमी पाच वेळच्या विजेत्या भारतीय संघाला यंदाही युवा विश्वचषकात जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात होते. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेत भारताने सातत्यपूर्ण कामगिरी केली. साखळी फेरी आणि ‘सुपर सिक्स’ फेरीतील आपले सर्व सामने जिंकून भारताने दिमाखात उपांत्य फेरी गाठली. मग उपांत्य फेरीत यजमान दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. जेतेपदासाठी त्यांच्यासमोर तुल्यबळ ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. यापूर्वीच्या युवा विश्वचषकांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केल्याने, यंदाही अंतिम सामन्यात त्यांचेच पारडे जड मानले जात होते. मात्र, भारतीय खेळाडू मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यात अपयशी ठरले. त्यातही भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत २५३ धावांवर रोखले होते. आताच्या जमान्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० चेंडूंत २५४ धावांचे आव्हान हे तसे सोपे मानले जाते. परंतु संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या भारतीय फलंदाजांनी अंतिम सामन्यात मात्र निराशा केली. सलामीवीर आदर्श सिंह (४७) आणि मुरुगन अभिषेक (४२) यांचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्करली. परिणामी भारताचा डाव १७४ धावांत संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने ७९ धावांनी सामना जिंकत चौथ्यांदा युवा विश्वचषकाचे जेतेपद पटकावले.

हेही वाचा >>> विश्लेषण : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशातून कोणती रणनीती? विरोधकांच्या वजाबाकीशिवाय काय हाती?

युवा विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषकातील कामगिरीत साम्य काय?

गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारताच्या वरिष्ठ संघालाही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेतील भारतीय संघाची कामगिरी आणि युवा विश्वचषकातील भारतीय संघाची कामगिरी यात बरेच साम्य होते. दोन्ही स्पर्धांमध्ये भारताला जेतेपदासाठी मुख्य दावेदार मानले जात होते. दोन्ही स्पर्धांमध्ये भारतीय संघांनी अंतिम फेरी गाठण्यापूर्वी सर्व सामने जिंकले होते. तसेच या प्रवासात जवळपास सर्वच खेळाडूंनी आपले योगदान दिले होते. दोन्ही वेळा अंतिम सामन्यात त्यांची ऑस्ट्रेलियाची गाठ पडली आणि अखेरीस त्यांना जेतेपदापासून वंचित राहावे लागले.

भारताच्या युवा संघाला दडपण जाणवले का?

मोठ्या स्पर्धांमध्ये महत्त्वाच्या टप्प्यात खेळ उंचावून सर्वोत्तम कामगिरी करण्यात ऑस्ट्रेलियन संघाचा हातखंडा आहे. याचाच अनुभव भारतीय संघांनी घेतला. एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाने पराभूत केले. त्यामुळे १४० कोटी भारतीयांचा हिरमोड झाला होता. भारतीय संघाचे २०१३ नंतर ‘आयसीसी’चे पहिले जेतेपद पटकावण्याचे स्वप्नही अधुरे राहिले होते. भारतीय युवा संघ या पराभवाची परतफेड करणार अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली. अंतिम सामन्यापूर्वी भारतीय युवा संघाचा कर्णधार उदय सहारनला अनेकदा याबाबत प्रश्न विचारण्यात आला. आम्ही असा कोणताही विचार करत नसल्याचे सहारन म्हणाला खरा, पण भारताच्या युवा खेळाडूंना याचे दडपण निश्चित जाणवले. त्यांच्या देहबोलीतूनही ते स्पष्टपणे दिसून येत होते. यापूर्वीच्या सर्व सामन्यांत निडरपणे खेळलेल्या भारतीय फलंदाजांना आपली आक्रमकता राखता आली नाही. त्यांनी फटके मारण्यापेक्षा खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न फसला. अंतिम सामन्यात सचिन धसचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज चेंडूपेक्षा अधिक धावा करू शकला नाही. धसचीही खेळी आठ चेंडूंत नऊ धावांवर मर्यादित राहिली.

हेही वाचा >>> UAE मधील पहिल्या हिंदू मंदिरांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन, काय आहे विशेष? वाचा सविस्तर

अंतिम सामन्यांत ऑस्ट्रेलियासाठी कोणत्या खेळाडूंची कामगिरी निर्णायक ठरली?

गेल्या वर्षी जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) आणि एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यांत भारतीय संघाने सुरुवातीला ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकले होते. मात्र, दोन्ही वेळा डावखुरा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने उत्कृष्ट शतक साकारताना ऑस्ट्रेलियाला यातून बाहेर काढले होते. युवा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी कोणा एका खेळाडूची कामगिरी निर्णायक ठरली नाही. फलंदाजीत भारतीय वंशाच्या हरजस सिंगने अर्धशतक साकारले, तर कर्णधार ह्यू वेबगेन, ऑली पेपे आणि सलामीवीर हॅरी डिक्सन यांनी प्रत्येकी ४० हून अधिक धावांचे योगदान देत ऑस्ट्रेलियाला २५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. मग गोलंदाजीत महिल बिअर्डमन आणि फिरकीपटू राफ मॅकमिलन यांनी प्रत्येकी तीन, तर कॅलम विडलरने दोन गडी बाद करत भारताचा डाव १७४ धावांतच संपुष्टात आणला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विश्वविजय सुकर झाला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis why india lost world cup final against australia print exp zws
First published on: 14-02-2024 at 07:00 IST