दत्ता जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याला नुकताच गारपिटीच्या संकटाचा सामना करावा लागला. ही गारपीट का झाली, या गारपिटीमुळे किती नुकसान झाले त्याविषयी..

राज्यात गारपीट का झाली?

ईशान्य मोसमी वाऱ्यांनी म्हणजे बंगालच्या उपसागरावरून दक्षिण भारतात येणाऱ्या वाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर बाष्प वाहून आणले होते. त्यासह अरबी समुद्रातून राज्यात आलेल्या वाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर बाष्प आणले होते. त्याच वेळी पश्चिमेकडून थंड वारे राजस्थानमार्गे राज्याच्या उत्तर भागात दाखल झाले. थंड वारे आणि बाष्पयुक्त वाऱ्याच्या संयोगातून राज्यात नुकतीच गारपीट झाली. पहिल्या टप्प्यात बाष्पयुक्त वारे दक्षिण कोकण आणि कर्नाटकातून राज्यात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात होती. पण, या वाऱ्यात अपेक्षित जोर दिसला नाही. अरबी समुद्रावरून आलेल्या वाऱ्यांनी उत्तर महाराष्ट्रापर्यंत वेगाने मुसंडी मारली. या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या आणि पश्चिमेकडून आलेल्या थंड वाऱ्याच्या संयोगातून गारपीट झाली. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात गारपिटीचा अंदाज व्यक्त केला होता. सुदैवाने प्रत्यक्षात नाशिकमधील चार तालुके आणि नगर, पुण्यातील प्रत्येकी एका तालुक्यात गारपीट झाली. त्यामुळे राज्याचा मोठय़ा नुकसानीपासून बचाव झाला.

उन्हाळय़ातील गारपिटीपेक्षा ही वेगळी का?

बंगालच्या उपसागरावरून येणारे किंवा अरबी समुद्रावरून येणारे वारे सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. परिणामी येणारे ढग किंवा बाष्पयुक्त वारे उंची वाढून नऊ ते बारा किलोमीटरवर जाऊन पोहोचतात. उन्हाळय़ात किंवा उन्हाळय़ाच्या सुरुवातीला हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये असणारे थंड वारे काही कारणामुळे दक्षिणेकडे वाटचाल करतात. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. हा वाऱ्याचा प्रवाह कोरडा असतो. तो वरच्या थरात आणि बाष्प असलेली आद्र्रतायुक्त हवा खालच्या थरात, अशी स्थिती निर्माण होते. थंड हवा आणि बाष्पयुक्त हवेच्या संयोगातून गारांची निर्मिती होते. ही स्थिती जास्त काळ टिकून राहिल्यास गारपीट होते. काही प्रसंगी पश्चिमेकडून अथवा उत्तरेकडून थंड वारे आले नाही, तरीही बाष्पयुक्त ढग उंचीवर जातात. त्यामुळे पाण्याचे थेंब गोठतात. ढगातील पाणी गोठण्याची पातळी खाली उतरल्यामुळे गारांची निर्मिती होऊन गारा पडतात.

हेही वाचा >>>जगातील आठवे आश्चर्य अशी मान्यता लाभलेले अंकोरवाट आहे तरी काय? या मंदिराचा हिंदू संस्कृतीशी काय संबंध?

विशिष्ट ढगामुळे गारांची निर्मिती होते का?

गारांची निर्मिती होण्यात ढगांचे योगदानही मोठे असते. आकाशात शुभ्र पांढरे, काळसर, काळेकुट्ट, मोठे, लहान, विस्तीर्ण, उंचच उंच वाढलेले असे विविध प्रकारचे ढग दिसतात. जे ढग कमी उंचीवर असतात त्यात पाण्याचे सूक्ष्म कण असतात. जे ढग उंचच उंच वाढतात त्यांच्याभोवती तापमान कमी कमी होत जाऊन शून्याहून कमी होते. त्यामुळे पाणी गोठते आणि पाण्याच्या कणाचे हिमकण तयार होतात. ते अत्यंत हलके असल्यामुळे खाली पडत नाहीत. पण, हवेतील अंतर्गत प्रवाहामुळे हिमकण प्रवाहित होतात, त्यांची हालचाल होते. हिमकणांच्या हालचालीमुळे अन्य तरंगणारे कण एकमेकांना चिकटतात आणि हिमकणांचा आकार वाढतो. ते मोठे होऊन, त्याचे लहान-मोठय़ा गारांमध्ये रूपांतर होते. या गारांचे वाढलेले वजन ढग पेलू शकत नाहीत आणि त्या जमिनीवर येऊन पडतात.

हेही वाचा >>>बिहार विशेष दर्जाची मागणी का करत आहे? विशेष दर्जाच्या राज्याला कोणत्या सुविधा मिळतात?

पावसाळय़ात गारपीट का होत नाही?

आकाशात गारांची निर्मिती सतत होत नाही किंवा ती सतत घडणारी घटना नाही. त्यासाठीची विशिष्ट परिस्थिती उन्हाळय़ात किंवा उन्हाळय़ाच्या सुरुवातीला तयार होते. प्रामुख्याने पावसाळय़ात अशी स्थिती निर्माण होत नाही. पावसाळय़ात विशिष्ट उंचीवर जाणारे ढग असत नाहीत. त्यामुळे गारपिटीच्या घटना बहुतेक फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यांत म्हणजे उन्हाळय़ाच्या सुरुवातीस घडतात. हिमालय पर्वतांच्या रांगांमध्ये हिमवर्षांव होतो, तर मध्य आणि दक्षिण भारतात गारपीट होते. महाराष्ट्रात गारपीट होण्याचा धोका जास्त असतो. कारण, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या दमट वाऱ्याचा आणि उत्तरेकडील थंड वाऱ्याचा राज्यावर संयोग होतो. बाष्पयुक्त आणि थंड वाऱ्यांच्या परस्परविरोधी प्रवाह एकमेकांना भिडल्यानंतर गारपीट होते.

गारपिटीची पूर्वसूचना शक्य आहे का?

ढगांची उंची, बाष्पयुक्त वाऱ्याचा प्रवाह आणि थंड वाऱ्यांच्या प्रवाहाचा अंदाज घेऊन गारपीट होण्याची पूर्वसूचना दिली जाते. ज्या ढगातून वादळी पाऊस पडतो किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडतो, विजांचा कडकडाट होतो, त्या ढगांचा अंदाज अत्याधुनिक रडारच्या माध्यमातून लावणे शक्य होते. अनेकदा पूर्वअंदाज एक किंवा दोन तासच अगोदर देता येतो. अनेकदा ढग विशिष्ट भागापुरतेच असतात. ढगांची व्याप्ती मोठी असत नाही तेव्हा त्यांचे पूर्वानुमान जास्त दिवस अगोदर करता येत नाही. तरीही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या, रडारच्या मदतीने गारपिटीचा अंदाज चार-पाच दिवस अगोदर व्यक्त करता येणे शक्य झाले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained how much damage was caused due to hailstorm in the state print exp 1123 amy