-हृषिकेश देशपांडे

गुजरातचे वर्णन राजकीय क्षेत्रात भाजपच्या हिंदुत्वाची प्रयोगशाळा असे केले जाते. १९९५पासून राज्यात भाजप सत्तेत आहे. यंदा राज्यात भाजपच्या व्यारा मतदारसंघातील उमेदवाराची चर्चा आहे. त्याचे कारण दोन दशकांत पहिल्यांदाच राज्यात भाजपने ख्रिश्चन उमेदवार दिला आहे. राज्यात मुस्लीम जवळपास १० टक्के आहेत तर ख्रिश्चन अर्धा टक्का. भाजपने एकही मुस्लीम उमेदवार दिलेला नाही, मात्र दक्षिण गुजरातमधील तापी जिल्ह्यातील व्यारा मतदारसंघातील उमेदवार चर्चेत आहे. भाजपने येथे मोहन कोकणी हा ख्रिश्चन उमेदवार दिला आहे. या मतदारसंघात दोन लाख २३ हजार मतदार असून त्यातील ३५ टक्के ख्रिश्चन आहेत. १९९८पासून येथे काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपला हा गड भेदणे तसे कठीणच. तरीही पक्षाच्या या उमेदवारामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

केरळकडे लक्ष?

भाजपचे उमेदवार असलेले ४८ वर्षीय मोहन कोकणी हे १९९८पासून भाजपशी संबंधित आहेत. भाजपची सत्ता असलेल्या तापी जिल्हा पंचायतीचे ते अध्यक्ष आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चंदुभाई रुमसीभाई यांचा जवळपास २४ हजार मतांनी पराभव झाला होता. 

त्यामुळे येथे भाजपपुढे आव्हान बिकट आहे. अर्थात हार-जीत या मुद्द्यापेक्षाही ख्रिश्चन उमेदवार याला महत्त्व आहे. भाजपचा ‘सब का साथ सब का विकास’ हा नारा आहे. त्या दृष्टीनेच उमेदवारीची संधी देत भाजपने राजकीय चाल खेळल्याचे मानले जात आहे.  केवळ गुजरात नाही तर पाठोपाठ कर्नाटक आणि नंतर केरळवर भाजपचे लक्ष आहे. दक्षिण भारतात भाजपला घट्ट पाय रोवायचे आहेत. केरळची सामाजिक स्थिती पाहिली तर १८ टक्क्यांच्या आसपास ख्रिश्चन मतदार आहेत. तर २६ टक्के मुस्लीम, ५४ टक्के हिंदू आहेत. राज्यात गेल्या वेळी भाजपला विधानसभेची एक जागा जिंकता आली होती. यंदा तर पाटी कोरीच राहिली. पक्षाचे संघटन राज्यात भक्कम आहे. मात्र राज्यात प्रत्येक मतदारसंघात केवळ १० ते १२ टक्के मते मिळवून उपयोगी नाही.  ही मते १५ ते १६ टक्क्यांच्या पुढे गेल्यासच विधानसभेच्या काही जागा मिळतील. केरळमध्ये काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकाराने सध्या सत्तेत असलेली डावी आघाडी असा सरळ सामना असतो. या दोन आघाड्यांमध्ये जर पर्याय निर्माण करायचा असेल भाजपला केरळमध्ये ख्रिश्चन मतांचे महत्त्व आहे. त्या दृष्टीने नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. मग देशभरात एक संदेश जाण्याच्या दृष्टीने त्यातही गुजरातमध्ये भाजपकडून ख्रिश्चन उमेदवार देण्याकडे पाहिले पाहिजे. अर्थात केरळबरोबरच गोवा विधानसभा निवडणुकीतही भाजपने अनेक ख्रिश्चन उमेदवार दिले होते.

सात जागी निर्णायक…

गुजरातमध्ये आदिवासीबहुल २७ जागा आहेत. यातील ७ ठिकाणी ख्रिश्चन मते निर्णायक मानली जातात. गेल्या वेळी या जागांवर काँग्रेसने भाजपच्या तुलनेत यापैकी जास्त जागा जिंकल्या होत्या. यंदा आम आदमी पक्षाच्या प्रवेशाने सामना तिरंगी आहे. गुजरातमध्ये गेली २७ वर्षे भाजपची सत्ता आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेक कामे झाल्याने ख्रिश्चन समाजात भाजपबाबत काही प्रमाणात सहानुभूती आहे. त्यामुळे ख्रिश्चन उमेदवार देत काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न भाजपने चालवला आहे. गुजरातमध्ये विधानसभेच्या १८२ जागा आहेत तरी बऱ्यापैकी चर्चा आहे भाजपच्या व्यारा मतदारसंघातील उमेदवाराची.