Dating App Scams सोशल मीडिया हे आभासी जग आहे. त्यात आता डेटिंग अ‍ॅप्सचा वापर सर्वच महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जात आहे. टिंडर, बम्बल, हिंज, एसले यांसारख्या अनेक डेटिंग ॲप्सची लोकप्रियता तरुणांमध्ये वाढत असल्याचे दिसत आहे. या डेटिंग अ‍ॅप्समुळे भारतातील डेटिंग संस्कृतीच बदलत चालली आहे, असे म्हणायला हरकत नाही. या डेटिंग अ‍ॅप्सवर अगदी संवादापासून सुरू होणाऱ्या गोष्टी आयुष्यातील महत्त्वपूर्ण म्हणजेच विवाहाच्या टप्प्यावर येऊन पोहोचतात.

परंतु, बहुतांश वेळा या डेटिंग अ‍ॅप्सचा वापर फसवणुकीसाठी केला जातो. या डेटिंग अ‍ॅप्सचा वापर वाढल्यामुळे तसा धोकाही वाढला आहे. नुकत्याच, मुंबईसारख्या शहरात घडलेल्या फसवणुकीच्या घटनेने तरुणांना विचार करण्यास भाग पाडले आहे. तरुणांची फसवणूक नक्की कशी होत आहे? मुंबईत काय घडलं? या फसवणुकीपासून स्वतःचा बचाव कसा करावा? जाणून घेऊयात…

मुंबईसारख्या शहरात घडलेल्या फसवणुकीच्या घटनेने तरुणांना विचार करण्यास भाग पाडले आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

मुंबईतील फसवणुकीचे प्रकरण

डेटिंग ॲपच्या माध्यमातून भेटलेल्या एका तरुणीबरोबर डेटवर गेलेल्या एका व्यक्तीला २४ हजार रुपयांचा फटका बसला. त्याने आपल्याबरोबर काय घडले, याची सविस्तर माहिती ‘रेडिट’वर शेअर केली, ज्याने तरुणांची चिंता वाढवली. या तरुणाने मान्य केले की, सुरुवातीपासून काहीतरी चुकीचे घडते आहे, असे त्याला वाटत होते; परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. पीडित व्यक्तीने लिहिले, “चुकीचे कृत्य, चुकीचे परिणाम. डेटिंग ॲप ‘एसले’वर एका मुलीला भेटलो. भेटायचं लगेच ठरलं आणि त्या रात्री माझा काही विशेष प्लॅन नव्हता. त्यामुळे भेटून पाहूया, असं वाटलं. त्या व्यक्तीला भेटायला ठाण्याला गेलो. भेटण्यापूर्वी मी तिच्याशी बोललोही होतो.”

त्याने पुढे सांगितले की, दोघांनी त्या तरुणीने निवडलेल्या एका बारमध्ये भेटायचे ठरवले. तिथे पोहोचल्यावर तो तरुण आत गेला; पण त्याला तिथे काही मोजकेच लोक दिसले. त्याने पुढे लिहिले, “मला तिची जवळपास एक तास वाट पाहावी लागली आणि आमची भेट उपवन तलावाजवळ झाली. माझ्याकडे गाडी असल्यामुळे मी तिला भेटायला तिथे गेलो. ती बारजवळच्या एका ठिकाणी होती आणि म्हणाली, ‘माझ्या ठिकाणाच्या जवळच आहे, इथे जाऊया.’ मी मूर्खासारखं हो म्हणालो आणि आत गेलो. आतमध्ये खुर्च्या, गाणी वगैरे सुरू असलेला एक मोठा हॉल होता; पण लोक फार कमी होते. हा पहिला धोक्याचा संकेत होता, जो मी तेव्हाच लक्षात घ्यायला हवा होता आणि लगेच निघून जायला हवं होतं.”

त्या व्यक्तीने पुढे सांगितले की, त्याच्या ‘डेट’बरोबर गप्पा चांगल्या झाल्या; पण त्या तरुणीने थेट ब्ल्यू लेबल व्हिस्की मागवली. व्हिस्कीची मात्रा न विचारताच कर्मचारी तिला पेग देत होते, हे पाहून त्याला थोडा संशय आला; पण त्यानं दुर्लक्ष केलं. शेवटी त्या महिलेनं प्रीमियम व्हिस्कीचे चार पेग प्यायले आणि वेटरनं बिल आणलं. त्यानं लिहिलं, “ते बिल २४,००० चं निघालं, ज्यात २,००० सेवा शुल्क जोडलेलं होतं आणि त्यांनी फक्त ६० मिली व्हिस्की दिली होती. माझ्यासारखे आणखी लोक याच जाळ्यात अडकले आहेत, हे मला समजलं. कारण- त्या तरुणीनं ‘रेड बुल’ मागितलं नव्हतं आणि तरीही त्यांनी ते दिलं होतं.”

कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे धाक वाटल्याने त्या व्यक्तीने बिलाचे १०,००० रुपये भरले. “शेवटी मला १०,००० रुपये भरावे लागले. कारण- तिथे असलेले वेटर असे दिसत होते की, त्यांच्याशी वाद घालणे योग्य नव्हते. वाद वाढवण्याऐवजी तिथून निघून जाणं चांगलं होतं. तिनं ऑर्डर करण्यापूर्वीच मी बिल तपासायला हवं होतं,” असे त्याने नमूद केले. त्याने सांगितले की, ती तरुणी आधीच तिथून निघून गेली. बाहेर पडल्यावर तिनं ऑटोरिक्षा पकडली आणि निघून गेली. त्यानंतर तिचा काही पत्ता नव्हता. या बारचे नाव पाब्लो बार ॲण्ड लाऊन्च असून, कथित घोटाळा चालवणारा हा कॅफे Zomato किंवा कोणत्याही फूड डिलिव्हरी ॲप्सवर सूचीबद्ध नाही.

मुंबई – घोटाळ्याचं केंद्र?

गेल्या वर्षी पत्रकार दीपिका नारायण भारद्वाज यांनी एका डेटिंग ॲप घोटाळ्यावर लक्ष वेधले होते. त्यात कमीत कमी डझनभर पीडित होते, ज्यांच्याबरोबर अशाच घटना घडल्या होत्या. प्रत्येक पीडिताच्या बिलाची रक्कम २३ हजार ते ६० हजारच्या घरात होती. पीडितांनी या बारच्या संशयास्पद कृती उघडकीस आणल्यानंतर त्याची चौकशी सुरू करण्यात आली होती. भारद्वाज यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर)वरील त्यांच्या पोस्टमध्ये मुंबईतील ‘द गॉडफादर’ नावाच्या कॅफेचा उल्लेख केला होता. ते डेटिंग घोटाळ्यांचे कथित केंद्र असल्याचे सांगण्यात आले होते.

या फसवणुकीच्या घटना केवळ मुंबईतच घडल्यात, असे नाही. ‘रेडिट’वरील एका पोस्टमध्ये दिल्लीतील एका व्यक्तीने दिल्लीच्या ईस्ट ऑफ कैलास येथील ‘लोकस’ नावाच्या कॅफेमधील डेटच्या एका त्रासदायक घटनेचा अनुभव सांगितला. वापरकर्त्याच्या म्हणण्यानुसार, त्याच्याबरोबरच्या तरुणीने जेगरबॉम्ब्स नावाचे कॉकटेल मागवायला सुरुवात केली, ज्याची किंमत प्रत्येकी १,२०० रुपये होती. त्यालाही शेवटी आपले बिल बघून धक्का बसला. बिलाची रक्कम ११,००० पेक्षा जास्त होती. तरुणीने आपल्याकडे १०० रुपये असल्याचे सांगून पळ काढला. अखेर धमक्या आणि कायदेशीर कारवाईच्या आव्हानानंतर तरुणालाही सोडण्यात आले. आपण केवळ २,५०० रुपये बिल दिल्याचे त्याने सांगितले.

डेटिंग ॲप घोटाळ्यांना कसे टाळावे?

तज्ज्ञांनी खाली काही सोपे खबरदारीचे उपाय सुचवले आहेत:

  • अनोळखी लोकांशी बार किंवा पब्समध्ये, विशेषत: एकाकी ठिकाणी भेटणे टाळा.
  • पहिल्या भेटीसाठी सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याचा आग्रह धरा.
  • आपले ठिकाण नेहमी मित्र किंवा कुटुंबाला कळवा.
  • जर कोणी खूप महागडी ड्रिंक्स मागवत असेल किंवा तुम्हालाच बिल भरण्यास सांगत असेल, तर सावध राहा.