Microplastics in Penise मायक्रोप्लास्टिक्स म्हणजेच प्लास्टिकचे बारीक कण, विविध माध्यमातून आपल्या शरीराच्या आत शिरतात, असे तज्ज्ञांचे सांगणे आहे. अनेक संशोधनातून मायक्रोप्लास्टिक्सविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘टॉक्सिकोलॉजिकल सायन्सेस’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात पुरुषांच्या अंडकोषात प्लास्टिकचे बारीक कण आढळून आल्याची माहिती समोर आली होती.

आता आणखी एका संशोधनात शास्त्रज्ञांना प्रथमच मानवी लिंगाच्या ऊतीमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळले आहे. यामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि इरेक्टाइल डिसफंक्शन होण्याचाही संभाव्य धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यापूर्वी केलेल्या काही संशोधनात वीर्यांमध्येही मायक्रोप्लास्टिक्स आढळून आले आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ इम्पोटेन्स रिसर्चमध्ये संशोधकांनी हा निष्कर्ष प्रकाशित केला आहे. या अभ्यासात नक्की काय सांगण्यात आले आहे? खरंच इरेक्टाईल डिसफंक्शनचा धोका निर्माण होऊ शकतो का? याविषयी जाणून घेऊ या.

हेही वाचा : संसदेची सुरक्षा कशी असते? संसदेच्या सुरक्षेत बदल का करण्यात आले?

संशोधन काय सांगतंय?

संशोधकांच्या टीमने प्रथम ऑगस्ट ते सप्टेंबर २०२३ दरम्यान मियामी विद्यापीठात इरेक्टाइल डिसफंक्शनशी संबंधित कृत्रिम अवयवांसाठी शस्त्रक्रिया केलेल्या सहा पुरुषांच्या ऊतींचे नमुने घेतले. रासायनिक इमेजिंग वापरून नमुन्यांचे विश्लेषण केल्यानंतर, शास्त्रज्ञांना सहापैकी पाच नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळले. “पेनाईल टिश्यूमध्ये सात प्रकारचे मायक्रोप्लास्टिक्स आढळले, ज्यामध्ये पॉलीथिलीन टेरेफ्थालेट आणि पॉलीप्रॉपिलीन या प्लास्टिकचे प्रमाण जास्त होते,” असे संशोधकांनी सांगितले.

पॉलीथिलीन टेरेफ्थालेट (पीइटी) प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर अन्नाच्या पॅकेजिंगमध्ये वापरले जाते. जसे की, प्लास्टिकच्या बाटल्या आणि प्लास्टिकचे कंटेनर. तसेच पॉलीप्रॉपिलीन हा प्रकार सामान्यतः प्लास्टिकच्या बाटलीच्या टोप्यांमध्ये आढळते. अभ्यासानुसार, मायक्रोप्लास्टिक्स दोन मायक्रोमीटर किंवा मिलिमीटर इतके लहान होते. चाचणी करण्यात आलेल्या सहा पुरुषांपैकी ज्या पुरुषाच्या लिंगामध्ये कोणतेही मायक्रोप्लास्टिक आढळले नाही, तो पुरुष अतिशय पारंपरिक जीवनशैली जगतो”, असे संशोधनाचे प्रमुख डॉ. रंजित रामासामी यांनी ‘बिझनेस इनसाइडर’ला सांगितले. त्यांनी सांगितले की, ती व्यक्ती जास्त प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करत नाही. रामासामी यांनी ‘सीएनएन’ला सांगितले की, लिंगामध्ये मायक्रोप्लास्टिक सापडल्याने त्यांना फारसे आश्चर्य वाटले नाही, कारण ते हृदयासारखे अतिशय संवहनी अवयव आहे. संशोधक गटाला मागील एका अभ्यासात मानवी हृदयातही मायक्रोप्लास्टिक आढळून आले होते.

यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होऊ शकते का?

मायक्रोप्लास्टिक पाच मिलिमीटर (०.२ इंच) पेक्षा लहान प्लास्टिक आहे. आपण जे अन्न खातो, पाणी पितो, श्वास घेतो आणि अगदी शारीरिक संपर्काद्वारेदेखील या प्लास्टिकचे कण शरीरात प्रवेश करत आहेत. संशोधनात हे स्पष्ट करण्यात आले आहे की, मायक्रोप्लास्टिक मानवी शरीराला मोठ्या प्रमाणात आजारी करत आहे. शास्त्रज्ञांना प्लास्टिकचे कण जवळजवळ शरीरात सर्वत्र आढळून येत आहेत.

एका अभ्यासानुसार शारीरिक संबंधावेळी उच्च रक्त प्रवाहामुळे मानवी लिंग अतिशय संवेदनाक्षम असू शकतो. शास्त्रज्ञांना शंका आहे की, या प्रक्रियेदरम्यान रक्तवाहिन्यांचे विस्तारीकरण अशी स्थिती तयार करू शकतात, ज्यामुळे मायक्रोप्लास्टिक्स पेनिल टिश्यूच्या म्हणजेच ऊतींच्या संपर्कात येऊ शकतात आणि जमा होऊ शकतात. त्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शनसारखी लक्षणे जाणवू शकतात. इरेक्टाइल डिसफंक्शनच्या स्थितीला शारीरिक संबंधावेळी पुरुषाच्या लिंगात ताठरेची कमतरता म्हणता येऊ शकते. इरेक्टाइल डिसफंक्शनची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी, रामासामी यांनी ही प्रक्रिया पूर्णपणे समजून घेण्यासाठी आणखी एका संशोधनाची गरज असल्याचे सांगितले आहे. “मायक्रोप्लास्टिक्स इरेक्टाइल डिसफंक्शन्सशी जोडलेले आहेत की नाही हे ओळखणे आवश्यक आहे,” असे त्यांनी ‘सीएनएन’ला सांगितले.

हेही वाचा : अमेरिकेतील स्थलांतरितांसाठी बायडन सरकारचे नवे धोरण; भारतीयांना कसा होणार फायदा?

संशोधकांनी सांगितले की, मायक्रोप्लास्टिक्सचा शरीरातील व्यापक प्रसार चिंताजनक आहे. “एक समाज म्हणून आपण हे जाणले पाहिजे की, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांमधून पाणी पिणे, प्लास्टिकच्या डब्यातून अन्न घेणे आणि त्याहूनही वाईट म्हणजे प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये अन्न मायक्रोवेव्ह करणे या गोष्टी टाळायला हव्यात. याद्वारेच शरीरात जास्त प्रमाणात प्लास्टिकचे कण शिरतात. याचा पुरुष जननेंद्रियांवर जास्त परिणाम होत आहे,” असे रामासामी यांनी ‘द गार्डियन’ला सांगितले.