nadav lapid statement on the kashmir files in iffi controversy | Loksatta

विश्लेषण: वादाआधीचे आणि नंतरचे…नदाव लापिड यांचे ज्ञात-अज्ञात पैलू!

वादाआधी आंतरराष्ट्रीय चित्रमहोत्सवांपर्यंत आपल्या सिनेमांनी ओळख असलेल्या नदाव लापिड स्पष्ट राजकीय भूमिकेसाठी पुढले काही दिवस चर्चेत राहणार आहेत. लापिड यांनी घेतलेल्या पवित्र्याच्या निमित्ताने या प्रकरणावर चर्चेचे काही नवे मुद्दे.

विश्लेषण: वादाआधीचे आणि नंतरचे…नदाव लापिड यांचे ज्ञात-अज्ञात पैलू!
वादाआधीचे आणि नंतरचे : नदाव लापिड यांचे ज्ञात-अज्ञात पैलू (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पंकज भोसले

गेल्या तीनेक दिवसांपासून सिनेशोधकांची भारतातील आख्खी डाउनलोडनिष्णात पिढी नदाव लापिड या इस्रायली दिग्दर्शकाच्या सिनेमांना आपल्या हार्डडिस्कवर उतरवण्याच्या खटाटोपात रंगली आहे. गोव्यातील चित्रपट महोत्सवाच्या मुख्य परीक्षकपदी असलेल्या लापिड यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट अत्यंत बटबटीत, प्रचारकी आणि अस्वस्थ करणारा असल्याचे ठणकावून सांगितले. वर इतक्या प्रतिष्ठित महोत्सवात असा चित्रपट दाखविला जाणे अयोग्य असल्याचे विधान ‘द काश्मीर फाईल्स’चे सर्व उच्च समर्थक व्यासपीठाच्या निकटवर्तुळात आसनस्थ झालेले असताना केले. लापिड यांच्या ‘वीकिपिडीया’च्या पानावर चार दीर्घ ओळींची अद्ययावत माहिती या वादाच्या तपशीलासह सजली आहे. वादाआधी आंतरराष्ट्रीय चित्रमहोत्सवांपर्यंत आपल्या सिनेमांनी ओळख असलेल्या नदाव लापिड स्पष्ट राजकीय भूमिकेसाठी पुढले काही दिवस चर्चेत राहणार आहेत. लापिड यांनी घेतलेल्या पवित्र्याच्या निमित्ताने या प्रकरणावर चर्चेचे काही नवे मुद्दे.

वादानंतर घडले काय?

नदाव लापिड यांच्या विधानानंतर माध्यमे आणि समाजमाध्यमे पुुन्हा दोन गटांमध्ये विभागली गेली. चित्रपट सिनेगृहात प्रदर्शित झाल्यानंतर काश्मिरी पंडितांच्या काश्मीरमधील विस्थापनाचा मुद्दा अनेकांच्या जिव्हाळ्याचा आणि खदखदीचा बनला, तसेच काहीतरी व्हायला लागले. गोव्याच्या चित्रपट महोत्सवात असलेल्या विचारवंत, अभ्यासक आणि सनेप्रेमींच्या गटाने तात्काळ लापिड यांच्या स्पष्टवक्तेपणाचे जोरदार अभिनंदन केले. काहींनी आपला महोत्सव सार्थकी लागल्याच्या प्रतिक्रियाही केल्या. पण इस्रायलच्या राजदूतांसह ‘फौदा’ या जगप्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्याने हे लापिड यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट करून एक प्रकारे लापिड यांच्यावर टीकाच केली. अभिनेते अनुपम खेर यांनी तोंडसुख घेतले. ‘काश्मीर फाईल्स’च्या कलाकारांसह अनेकांनी लापिड यांच्यावर टीका केली. यांना परीक्षक गटाचे प्रमुख कुणी केले इथपासून ते त्यांची परीक्षक प्रमुखपदी निवड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी झाली. नवी दिल्लीत तर लापिड यांच्याविरोधात एका वकिलाने सहा कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

विश्लेषण : बिहारी ‘गब्बर’च्या मुसक्या आवळणारे ‘दबंग’ अधिकारी; ‘बिहार डायरीज’चे खऱ्या आयुष्यातील हिरो IPS अमित लोढा कोण?

विधानानंतरचे नवे भाष्य…

वादाच्या मुलाम्यात न्हाल्यानंतर आणि आपल्या देशातूनही ‘टीका-स्वयंवर’ झाल्यानंतर लापिड यांनी केलेले भाष्य हे महत्त्वाचे आहे. ‘द काश्मीर फाईल’सारखा चित्रपट भारत सरकारचे काश्मीरबाबतचे धोरण आणि येथील दडपशाहीचे भविष्य स्पष्ट करणारे असून पुढील दोन वर्षांत ‘द काश्मीर फाईल्स’सारखा चित्रपट इस्रायलमध्येही तयार झाल्यास त्याचे मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. सत्य बोलण्याची क्षमता हळुहळू पुसट होत चाललेल्या देशात कुणीतरी मनापासून आणि बुद्धिभेदित होता भूमिका घ्यायला हवी. याचे परिणाम काय होतील माहिती नसले, तरी मी परतीच्या प्रवासात समाधानी आहे, असे त्यांनी सांगितले.

थोडी नवी माहिती…

जगाच्या तिकीटबारीवर ३४०.९२ कोटी इतका व्यवसाय करणारा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट या वर्षात बरी कमाई करणारा हिंदी सिनेमा आहे. पण दक्षिण भारतीय चित्रपटांनी जगभरात केलेला व्यवसाय पाहता त्या तुलनेत ‘द काश्मीर फाईल्स’ एक साधारण चित्रपट म्हणून समोर येतो. ‘केजीएफ : चॅप्टर टू’ या कन्नड चित्रपटाने १२०० ते १२५० कोटी इतका खेळ तिकीटबारीवर केला आहे. त्यानंतर तेलुगू चित्रपट ‘आरआर’आरने ११०० ते ११५० कोटींच्या पताका लावून आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे. कमल हसनच्या ‘विक्रम’ने ४५० कोटींची रेषा पार केली आहे. खूपशी टीका झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटानेही ‘काश्मीर फाईल्स’पेक्षा शंभर कोटींनी अधिक व्यवसाय केला आहे.

विधानाचा नवा अन्वयार्थ…

‘फौदा’ नावाची एक प्रचंड गाजलेली चार सीझन्स आणि ४८ भागांमध्ये असलेली ही मालिका भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेचा निर्माता आणि ‘डोरान’ या नायकाच्या भूमिकेने जगाचे कौतुक मिळविलेला लिओ राझ या अभिनेत्याने लापिड यांच्या विधानवादात उडी घेतली. ‘तुम्ही भारतीय संस्कृतीचा भाग नसलात आणि इथे काय चालते, त्याविषयी तुम्ही परिचित नसलात तर त्याविषयी काहीही बोलण्यात तथ्य नाही,’ असे या इस्रायली अभिनेत्याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले. मात्र भारतीय संवेदना आणि काश्मिरी पंडितांच्या वेदना यांच्याशी कसलाही परिचय नसताना लापिड यांना हा चित्रपट ‘बटबटीत आणि प्रचारवादी’ वाटला आणि तसे स्पष्ट सांगण्याची धमक त्यांनी दाखविली. भारतात हा चित्रपट लागल्यापासून हा चित्रपट मने दुभंगणारा आहे, अशी टीका करणाऱ्या येथील प्रत्येक विचारवंतांची भूमिकाच लापिड यांनी अधोरेखित केल्याची चर्चा समाजमाध्यमांत सुरू झाली आहे. लापिड यांना इथल्या संस्कृतीचा काडीचाही गंध नसतानाही प्रथमदर्शनातच त्यांनी या चित्रपटातील प्रचारकी थाट ओळखला याबाबत त्यांचे अभिनंदन अद्याप सुरूच आहे.

विश्लेषण : ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट व्हल्गर? IFFI मधील विधानांमुळे पुन्हा फुटलं वादाला तोंड; नेमकं झालं तरी काय?

लापिड यांच्याविषयी नवे काही…

तत्त्वज्ञान आणि साहित्य या दोन्ही गोष्टींमध्ये निष्णात असलेल्या लापिड यांचे पूर्वसूरीही चित्रपटांतलेच. तेल अवीव विद्यापीठातून तत्त्वज्ञानाची पदवी घेऊन त्यांनी साहित्यिकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्रान्समधून साहित्याचे शिक्षण घेतले. लष्करभरती अनिवार्य असलेल्या या देशामध्ये निर्धारित काळातील लष्करी शिक्षण पूर्ण करून त्यांनी घरातून वारशाने आलेल्या सिनेमा उद्योगाकडे रोख वळवला. कान चित्रपट महोत्सवापासून जगभरच्या महोत्सवांत लापिड सिनेमासह किंवा परीक्षकाच्या भूमिकेत हजर असतात. ‘पोलिसमन’, ‘किंडरगार्टन टीचर’, ‘सिनॉनिम्स’, ‘अहेद्स नी’ या त्यांच्या कलाकृती आत्तापर्यंत फेस्टिवल वर्तुळात गाजल्या आहेत. हेच चित्रपट नव्या वादाच्या निमित्ताने अधिक प्रमाणात दर्शक मिळविणार आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 17:55 IST
Next Story
विश्लेषण: Apple Tax वरुन टेक जगतात दोन गट; एलॉन मस्क विरुद्ध Apple वादाच्या केंद्रस्थानी असलेला हा कर आहे तरी काय?