प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर नुकताच ७.१ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप झाल्यानंतर जपानमध्ये भूगर्भशास्त्रज्ञांनी प्रथमच ‘महाभूकंप’ होण्याचा अंदाज वर्तविला आहे. नानकाय ट्रो म्हणजेच नानकाय भूगर्भीय भेग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भौगोलिक परिसरात होऊ घातलेल्या महाभूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची आणि कोट्यवधींचे आर्थिक नुकसान होण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. नानकाय भूगर्भीय भेग महाभूकंप म्हणजे काय, त्याचा काय धोका असू शकतो यांवर दृष्टिक्षेप…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाभूकंपासंबंधी कोणता इशारा?

जपानच्या दक्षिण किनारपट्टीवर चार दिवसांपूर्वी शक्तिशाली भूकंपाचे धक्के बसले. काही मिनिटांच्या फरकामध्ये दोन भूकंप झाले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.१ नोंदवण्यात आली. या भूकंपानंतर जपानी भूगर्भशास्त्रज्ञांनी आणखी मोठ्या क्षमतेच्या महाभूकंपाचा अंदाज व्यक्त केला आहे. या महाभूकंपाला नानकाय ट्रो म्हणजेच नानकाय भूगर्भीय भेग भूकंप असे म्हटले जाते. मात्र जपानच्या नानकाय ट्रो भूकंप सल्लागार समितीने सांगितले की, ७ रिश्टर स्केलच्या धक्क्यानंतर मोठा भूकंप होण्याची शक्यता फार कमी असते. शंभर प्रकरणांमध्ये एकदाच असे होऊ शकते. ८ पेक्षा जास्त रिश्टर तीव्रतेचे भूकंप ‘मेगाक्वेक’ किंवा महाभूकंप मानले जातात. जपानचा अंदाज आहे की पुढील नानकाय ट्रो महाभूकंप ९.१ रिश्टर स्केल इतका शक्तिशाली असू शकतो. सल्लागार समितीचे अध्यक्ष असलेले टोकियो विद्यापीठाचे प्राध्यापक नाओशी हिराता यांनी सांगितले की, अशा आपत्तीचा फटका बसलेल्या भागातील रहिवाशांनी एक आठवडा दक्षता बाळगावी आणि त्यानंतर स्थलांतर प्रक्रिया सुरू करावी. 

हेही वाचा >>> विश्लेषण : जनमत चाचण्यांत कमला हॅरिस यांची आघाडी? डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बाजी उलटवणार?

नानकाय ट्रो म्हणजे नक्की काय? 

नानकाय ट्रो जपानच्या होन्शू बेटाच्या नानकाय प्रदेशाच्या दक्षिणेस स्थित एक भूगर्भीय भेग आहे. समुद्रकिनाऱ्यापर्यंत सुमारे ९०० किलोमीटर पसरलेली ही भेग विनाशकारी भूकंपाचा स्रोत आहे. या परिसरात फिलीपीनो सी प्लेट किंवा भू प्रस्तर युरेशियन प्लेटच्या खाली जात आहे. त्यामुळे होणाऱ्या भूगर्भीय तणावामुळे अंदाजे १०० ते १५० वर्षांतून एकदा महाभूकंप होऊ शकतो. जपान सरकारने याआधी पुढील ३० वर्षांमध्ये ८ ते ९ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंप होण्याची शक्यता ७० ते ८० टक्के वर्तवली होती. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र सर्वेक्षणानुसार भूकंपाची तीव्रता ज्या फॉल्टवर होते, त्याच्या लांबीशी संबंधित असते. आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप २२ मे १९६० रोजी चिलीमध्ये सुमारे एक हजार मैल लांब असलेल्या फॉल्टवर ९.५ तीव्रतेचा होता. 

महाभूकंपामुळे काय नुकसान होऊ शकते?

महाभूकंप हे सुमारे १०० ते १५० वर्षांमध्ये एकदा होतात. आता ज्या महाभूकंपाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तो जपानच्या मार्च २०११ मधील विध्वंसक भूकंपापेक्षा मोठा असण्याची शक्यता आहे. महाभूकंप झाल्यास जपानची राजधानी टोक्योपासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर मध्य शिझुओकापासून नैर्ऋत्य मिझाझाकीपर्यंतच्या भागात त्याचा परिणाम होऊ शकतो. भूकंपानंतर काही मिनिटांतच ३० मीटरपर्यंत (९८ फूट) सुनामीच्या लाटा उसळू शकतात. भूकंपाचा केंद्रबिंदू आणि भरतीच्या परिस्थितीवर सुनामीची तीव्रता अवलंबून आहे. महाभूकंपामुळे भूस्खलन होऊन काही ठिकाणी आगी लागण्याची भीती आहे. या आपत्तीमुळे सव्वा तीन लाख नागरिकांना मृत्यू होण्याची आणि २३ लाख इमारती जमीनदोस्त होण्याचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. महाभूकंपाचा अधिक फटका बसू नये यासाठी अनेकांना स्थलांतर करण्यास भाग पाडले जाईल, असे भूगर्भतज्ज्ञांनी सांगितले. या महाभूकंपामुळे आर्थिक नुकसान २२० ट्रिलियन येनपर्यंत (सुमारे १ लाख २५ हजार ९२६ अब्ज रुपये) किंवा जपानच्या वार्षिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या एकतृतीयांशपेक्षा अधिक असू शकते. चारचाकी वाहने आणि इतर प्रमुख जपानी उत्पादनांचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांनाही याचा मोठा फटका बसू शकतो. पायाभूत सुविधा आणि पुरवठा साखळीवरही महाभूकंपाचे दीर्घकाळ परिणाम होऊ शकतात.

यापूर्वी नानकाय ट्रो महाभूकंप कधी झालेत?

जपानच्या ऐतिहासिक नोंदीनुसार नानकाय ट्रो महाभूकंप सन ६८४ पासून अनेक वेळा झाला आहे. यामुळे अनेकदा सुनामी लाटा किनारी गावांना धडकल्या आहेत. सर्वात अलीकडील नानकाय ट्रो महाभूकंप १९४६ मध्ये झाला होता. या भूकंपाची तीव्रता ८.० रिश्टर स्केल होती. त्या वेळी ६.९ मीटर सुनामीच्या लाटा उसळल्या होत्या आणि १,३३० नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याआधी दोन वर्षांपूर्वी म्हणजेच १९४४ मध्ये ८.१ रिश्टर स्केलचा महाभूकंप झाला. त्यामुळे १० मीटरच्या सुनामीच्या लाटा उसळून १,२५१ जणांना मृत्यूस सामोरे जावे लागले. १९ व्या शतकात दोनदा महाभूकंप होऊन हजारो जणांचा बळी गेला होता. त्यापूर्वी प्रत्येक शतकात किमान एकदा तरी महाभूकंपाचा फटका जपानला बसला आहे. 

sandeep.nalawade@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nankai trough megaquake mega earthquake alert in japan print exp zws
Show comments