विख्यात वानर संशोधक जेन गुडाल यांच्या निधनामुळे त्यांनी चिम्पान्झींवर केलेले संशोधन पुन्हा चर्चेत आले. गुडाल यांनी चिम्पान्झींच्या सहवासात राहून काही धक्कादायक निष्कर्ष मांडले, ज्यांना प्रसिद्धीही मिळाली. आता आणखी एका संशोधनातून चिम्पान्झींच्या मद्यप्राशनाविषयी माहिती मिळाली आहे. मद्यपान करणे हा केवळ मानवी स्वभाव आहे, असे आपण मानतो. मात्र नव्या संशोधनात चिम्पान्झीदेखील मद्यपान करतात, हे स्पष्ट झाले आहे. त्यांना हे मद्य कसे मिळते, किती मिळते आणि ते मद्यधुंद होतात का, याचा हा आढावा…

चिम्पान्झींना अल्कोहोल कसे मिळते?

अमेरिकन शास्त्रज्ञांनी अलीकडेच एक धक्कादायक खुलासा केला आहे की, आफ्रिकेच्या जंगलात राहणारे चिम्पान्झी दररोज इतकी पिकलेली फळे खातात की त्यात अल्कोहोलचे (इथेनॉल) प्रमाण एका माणसाने दोन ग्लास वाइन पिण्याइतके असते. कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथील संशोधकांनी युगांडातील किबाले राष्ट्रीय उद्यान आणि आयव्हरी कोस्टच्या ताई राष्ट्रीय उद्यानात चिम्पान्झीने खाल्लेल्या फळांमधील अल्कोहोलचे प्रमाण मोजले. संशोधकांच्या मते, चिम्पान्झी दररोज त्यांच्या वजनाच्या पाच ते दहा टक्के फळे खातात. ही फळे पिकलेली असल्याने त्यांच्यातील साखर नैसर्गिकरित्या आंबते आणि अल्कोहोल तयार करते. अभ्यासलेल्या २१ प्रकारच्या फळांमध्ये सरासरी ०.२६ टक्के अल्कोहोल होते. चिम्पान्झी दररोज सुमारे ४.५ किलो फळे खातात, असा अंदाज आहे. अशा प्रकारे ते त्यांच्या शरीरात सुमारे १४ ग्रॅम शुद्ध अल्कोहोल घेतात. इतर अनेक प्राण्यांप्रमाणे चिम्पान्झी जमिनीवर पडलेली पिकलेली फळे खाताना आढळले, परंतु ते किती मद्यपान करतात हे स्पष्ट करणारा हा पहिलाच अभ्यास असल्याचे त्यांनी सांगितले. संशोधक अलेक्सी मारो यांनी याबाबत सांगितले की, आपल्या पूर्वजांच्या चिम्पान्झींसारख्या आहारातील वारशामुळेच अल्कोहोलबद्दल मानवी आकर्षण निर्माण झाले असावे. जर्नल सायन्स ॲडव्हान्सेसमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील अलेक्सी मारो यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी हा अहवाल दिला. 

चिम्पान्झींना नशा चढते की नाही?

कॅलिफोर्निया विद्यापीठातील अभ्यासादरम्यान संशोधकांना सुरुवातीला वाटले की, अल्कोहोलचे सेवन जास्त केल्याने चिम्पान्झी सतत मद्यधुंद होतील. मात्र त्यांच्यात कधीही नशेची लक्षणे दिसून आली नाहीत. कारण ते दिवसभर हळूहळू खातात आणि त्यांचे शरीर ते सहन करण्यास सक्षम असते, असे संशोधकांचे मत आहे. अशाच काहीशा गोष्टी एक्सेटर विद्यापीठात झालेल्या अभ्यासात दिसून आल्या. येथील संशोधकांनी पश्चिम आफ्रिकेतील गिनी-बिसाऊ येथील कॅन्टानहेझ फॉरेस्ट्स नॅशनल पार्कमध्ये चिम्पान्झींना एकत्र आफ्रिकन ब्रेडफ्रूट ट्री फळे खाताना पाहिले. तपासणी केलेल्या बहुतेक फळांमध्ये अल्कोहोलचे प्रमाण ०.६१ टक्के होते. संशोधकांनी सांगितले की, अल्कोहोलच्या सेवनाने चिम्पान्झींना नशा झाली की नाही हे स्पष्ट झाले नाही. कॅमेऱ्याने त्यांनी ७० घटना नोंदवल्या ज्यामध्ये चिम्पान्झी जवळजवळ नेहमीच एकत्र अल्कोहोल तयार झालेली फळे खाताना दिसून आले. वेगवेगळ्या वयोगटातील चिम्पान्झींचा या संशोधनात अभ्यास करण्यात आला. या संशोधकांनीही ‘मानवांमध्ये निर्माण होणारी मद्यप्राशन करण्याची आवड ही उत्क्रांतीच्या इतिहासात रुजलेली आहे’, या कल्पनेला समर्थन देणारा निष्कर्ष करंट बायोलॉजी जर्नलमध्ये नोंदवला. विशेष म्हणजे चिम्पान्झींबाबत दोन्ही विद्यापीठांमध्ये झालेला अभ्यास ‘मद्यपी माकड’ गृहितकाचे समर्थन करणारा ठरला.

‘मद्यपी माकड’ गृहितक आहे काय?

मानवाला मद्याची आवड आपल्या आदिम पूर्वजांकडून वारशाने मिळाली आहे ही कल्पना म्हणजेच ‘मद्यपी माकड’ हे गृहितक. हे गृहितक प्रथम कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कलेचे प्राध्यापक रॉबर्ट डडली यांनी मांडले होते. प्राध्यापक रॉबर्ट डडली हे नुकत्याच झालेल्या संशोधनातील सहसंशोधक आहेत. सुरुवातीला शास्त्रज्ञांना याबद्दल शंका होती. परंतु अलीकडच्या काळात याबद्दल अधिक निरीक्षणे समोर आली आहेत, असे सेंट अँड्र्यूज विद्यापीठातील प्राइमेटोलॉजिस्ट प्रोफेसर कॅथरीन होबेटर यांनी सांगितले. त्या या संशोधन पथकाचा भाग नव्हत्या. त्यांनी सांगितले की, या कामातून आपल्याला जे जाणवत आहे ते म्हणजे अल्कोहोलशी असलेले आपले नाते उत्क्रांतीच्या काळात, कदाचित सुमारे ३० दशलक्ष वर्षांपूर्वीचे आहे.

इतर प्राणीही मद्यपान करतात का?

संशोधकांच्या मते प्राण्यांमध्ये मद्यपान असामान्य नाही. बऱ्याच काळापासून, संशोधकांनी असे गृहित धरले होते की फळे खाणारे वन्यप्राणी क्वचित आणि अपघाताने अल्कोहोलचे सेवन करतात. जानेवारी २०२५ मध्ये, ट्रेंड्स इन इकाॅलॉजी अँड इव्होल्यूशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात जंगली माकडे, पक्षी आणि कीटकांमध्ये अल्कोहोलचे सेवन सामान्य असल्याचे म्हटले आहे. एक्सेटर विद्यापीठातील वर्तणुकीय पर्यावरणशास्त्रज्ञ किम्बर्ली हॉकिंग्स यांनी सांगितले की, आपण पूर्वी विचार केला होता त्यापेक्षा नैसर्गिक जगात हे प्रमाण खूपच जास्त आहे आणि साखरेची फळे खाणारे बहुतेक प्राणी इथेनॉलच्या काही प्रमाणात संपर्कात येत असतात. त्यांनी असेही म्हटले आहे की, अल्कोहोल जवळजवळ प्रत्येक परिसंस्थेत आढळू शकते.

चिम्पान्झींना मद्यपानाची गरज का असते?

अधिक पिकलेली फळे चिम्पान्झी का खातात, आणि ते अल्कोहोलचे जाणूनबुजून सेवन करतात का, हे समजून घेण्यासाठी अधिक अभ्यास करण्याची गरज असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. सेंट्रल फ्लोरिडा कॉलेजमधील अभ्यासाचे सहलेखक मॅथ्यू कॅरिगन यांनी सांगितल्यानुसार पर्यावरणीय दृष्टिकोनातून, रात्री झाडांवर चढत असताना किंवा भक्षकांनी वेढलेले असताना मद्यधुंद असणे चिम्पान्झींसाठी फायदेशीर नाही. दरम्यान एक्सेटर विद्यापीठातील अभ्यासाच्या प्रमुख अन्ना बोलँड यांच्या मते अल्कोहोल हे एंडोर्फिन आणि डोपामाइन प्रणालीला चालना देते असे मानले जाते. (एंडोर्फिन आणि डोपामाइन दोन्ही आनंदी हार्मोन्स आहेत. पण त्यांचे कार्य वेगळे आहे. एंडोर्फिन वेदना कमी करतात आणि तात्काळ निरोगीपणाची भावना देतात, तर डोपामाइन प्रेरणा आणि आनंदाच्या भावनेशी संबंधित आहे. एंडोर्फिन अचानक सोडले जातात, तर डोपामाइन दीर्घकाळात सोडले जाते.) ज्यामुळे आरामाची भावना निर्माण होते ज्याचे चिम्पान्झींच्या दृष्टीने फायदे असू शकतात. मात्र हे तपासण्यासाठी जंगलात अल्कोहोल चिम्पान्झींच्या शरीरावर काय परिणाम करते हे जाणून घेणे तितकेच आवश्यक आहे.

dharmesh.shinde@expressindia.com