खरं तर व्हेरीएंट हा शब्द गणितातील आहे; परंतु २०२० मध्ये करोना या संसर्गजन्य रोगाने जगभरात थैमान घातल्यानंतर व्हेरीएंट हा या आजाराशी संबंधित शब्द झाला आहे. व्हेरीएंट म्हटलं की, प्रत्येकाच्या डोक्यात येतो करोना. २०२० नंतर करोनाच्या नवनव्या विषाणूंची उत्पत्ती होत गेली, तेव्हापासून करोनाचे नवनवीन प्रकार म्हणजेच व्हेरीएंट समोर आले आणि गेले आहेत; ज्यामुळे जगभरातील हजारो लोक संक्रमित झाले आहेत. आता करोनाचा आणखी एक प्रकार समोर आला आहे, जो जगभरात वेगाने पसरत असल्याची माहिती आहे. या विषाणूचे नाव आहे ‘XEC’. या विषाणूमुळे युरोप आणि अमेरिकेमध्ये पुढील काही महिन्यांत करोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. काय आहे हा नवीन प्रकार? ‘XEC’ विषाणू सर्वप्रथम कुठे आढळून आला? याविषयी तज्ज्ञ काय सांगतात? त्याची लक्षणे इतर प्रकारांपेक्षा वेगळी आहेत का? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

‘XEC’ विषाणू किती घातक?

‘XEC’ हा करोनाच्या ओमीक्रॉन या प्राणघातक प्रकाराचा उपप्रकार आहे. ‘XEC’ हा विषाणू KS.1.1 व KP.3.3 या प्रकारांनी मिळून तयार झाला असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांना आढळून आले आहे. ‘फोर्ब्स’च्या अहवालानुसार, करोनाच्या दोन प्रकारांतून या प्रकाराची उत्पत्ती झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. KS.1.1 या प्रकाराला सामान्यतः ‘FLiRT’ म्हणून ओळखले जाते. या प्रकाराने जगभरातील करोना प्रकरणांमध्ये वाढ केली आहे. दरम्यान, KP.3.3 याला FLuQE’ म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये अमिनो ॲसिड ग्लुटामाइनचे ग्लुएटमिक ॲसिडमध्ये उत्परिवर्तन होते.

‘XEC’ हा प्रकार इतर प्रकारांपेक्षा अधिक सहजतेने पसरत आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : यावर्षी देशभरात पाऊस तर समाधानकारक! पण जलसाठ्यांची स्थिती काय आहे?

‘XEC’ प्रकार कुठे आढळला?

‘XEC’चे रुग्ण सर्वांत प्रथम जूनमध्ये बर्लिन, जर्मनी येथे आढळून आले. तेव्हापासून हा विषाणू जगभरात पसरत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत ब्रिटन, अमेरिका, डेन्मार्क आणि इतर अनेक देशांमध्ये याचे रुग्ण आढळले आहेत. एका वृत्तानुसार, ऑगस्टमध्ये स्लोवेनियातील १० टक्के प्रकरणे याच प्रकारची होती. आतापर्यंत पोलंड, नॉर्वे, लक्झेंबर्ग, युक्रेन, पोर्तुगाल व चीनसह २७ देशांतील ५०० हून अधिक नमुन्यांमध्ये ‘XEC’ विषाणू आढळून आला आहे. ‘स्क्रिप्स रिसर्च’च्या ‘Outbreak.info’नुसार, ‘XEC’ हा प्रकार ३ सप्टेंबरपर्यंत १५ देश आणि अमेरिकेतील १२ राज्यांमध्ये आढळून आला आहे.

‘स्क्रिप्स रिसर्च ट्रान्स्लेशनल इन्स्टिट्यूट’चे संचालक एरिक टोपोल यांनी ‘एक्स’वर लिहिले, “या क्षणी, ‘XEC’ प्रकारात वाढ होण्याची शक्यता आहे. या विषाणूमुळे संक्रमणाची लाट येऊ शकते; ज्याला अनेक आठवडे किंवा दोन महिन्यांहून अधिकचा कालावधी लागू शकतो.” अगदी कोविड डेटा विश्लेषक माईक हनी यांनादेखील आढळले की, ‘XEC’ हा नवीन प्रभावशाली प्रकार ठरत आहे. त्यांच्या लक्षात आले की, ‘XEC’मुळे डेन्मार्क व जर्मनीमध्ये १७ टक्के प्रकरणे वाढली आहेत. तसेच, ब्रिटन व नेदरलँड्समध्येही ११ ते १३ टक्के प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.

‘XEC’चे रुग्ण सर्वांत प्रथम जूनमध्ये बर्लिन, जर्मनी येथे आढळून आले. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

‘XEC’ प्रकार वेगाने पसरत आहे का?

‘XEC’ हा प्रकार इतर प्रकारांपेक्षा अधिक सहजतेने पसरत आहे; मात्र याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे तज्ज्ञांचे सांगणे आहे. काही जण या वस्तुस्थितीवर प्रकाश टाकतात की, यात KP.3.1.1 चा समावेश असल्याने हा विषाणू अधिक संसर्गजन्य असू शकतो. तो वेगाने पसरणारा असू शकतो. यापूर्वी KP.3.1.1 मुळे ८० देशांमध्ये करोनाची वाढ झाली होती. ‘केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन’मधील लोकसंख्या आणि परिमाणात्मक आरोग्य विज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक मार्क कॅमेरॉन ‘वूमन्स हेल्थ एच’ला सांगतात, “जसे गेल्या वर्षी BA.2.86 पासून JN.1 हा विषाणू उत्परिवर्तित झाला होता आणि हिवाळ्यात त्याचा संसर्ग वाढला होता, तशीच क्षमता ‘XEC’मध्ये सुद्धा असू शकते.” “परंतु आम्हाला ‘XEC’ विषाणूबद्दल अधिक जाणून घेणे आणि त्याचा अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे,” असेही ते म्हणाले. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील जेनेटिक्स इन्स्टिट्यूटचे संचालक प्रोफेसर फ्रँकोइस बॅलॉक्स यांनीही ‘XEC’ प्रकार अधिक संसर्गजन्य असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ‘बीबीसी’ला सांगितले की, ‘XEC’चा संसर्ग हिवाळ्यामध्ये आणखी वाढू शकतो.

‘XEC’ प्रकाराची लक्षणे काय आहेत?

ज्यांना ‘XEC’ प्रकाराची लागण झाली आहे, त्यांच्या ओमीक्रॉन प्रकारासारखी लक्षणे दिसून येत आहेत. ‘यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेन्शन’ (सीडीसी) नुसार, ताप आणि थंडी वाजून येणे, खोकला, धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, घसा खवखवणे, नाक वाहणे, नवीन चव किंवा वास येण्याची क्षमता कमी होणे, थकवा जाणवणे, तसेच वेदना, डोकेदुखी, मळमळ, उलट्या आणि अतिसार यांसारखी लक्षणे दिसून येतात. ब्रिटनमधील आरोग्य संस्थेनेदेखील ‘XEC’ प्रकाराने ग्रस्त असलेल्यांमध्ये हीच लक्षणे दिसून येत असल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा : तुम्हीही तासनतास बसून काम करता का? मग तुम्हाला होऊ शकतो डेड बट सिंड्रोम

‘XEC’ पासून स्वतःचा बचाव कसा कराल?

तज्ज्ञांच्या मते, ‘XEC’ प्रकारापासून स्वतःचे संरक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लसीकरण करणे. नुकत्याच आलेल्या नवीन लसी KP.3.1.1 च्या पूर्ववर्ती KP.2 विरुद्ध प्रभावी असल्याचे मानले जाते. त्यामुळे ‘XEC’ प्रकाराच्या विरोधातही या लसी प्रभावी ठरतील, असे तज्ज्ञांचे सांगणे आहे. कैसर परमानेंटे दक्षिणी कॅलिफोर्नियाच्या संसर्गजन्य रोग विभगाच्या प्रादेशिक प्रमुख डॉ. एलिझाबेथ हडसन यांनी ‘लॉस एंजेलिस टाइम्स’ला सांगितले की, नवीन लसी ‘XEC’ विरुद्ध चांगले संरक्षण प्रदान करतील. कारण- हे सर्व प्रकार ओमिक्रॉनचे उपप्रकारच आहेत. “ ‘XEC’ हा प्रकार पूर्णपणे नवीन नाही, असे त्या म्हणाल्या. ‘सीडीसी’ने लोकांना स्वच्छता राखण्याचेही आवाहन केले आहे.