भक्ती बिसुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच येऊन गेलेल्या करोना महासाथीने जगाला एक भीषण अनुभव दिला. नवीन साथरोगाचा जगामध्ये झालेला प्रवेश, त्यावर उपाय म्हणून औषध किंवा प्रतिबंध म्हणून लस उपलब्ध नसणे, त्यामुळे जगातील सर्व नागरिकांनी स्वत:ला घरात कोंडून घेण्याचा अनुभवही घेतला. आता सुमारे दोन ते अडीच वर्षांच्या मोठ्या काळानंतर जगाने करोना महासाथीच्या संकटावर मात केली आणि जग आता पूर्वपदावर येत आहे. मात्र, अद्यापही नऊ प्रकारच्या विषाणूंनी जगभरातील साथरोगतज्ज्ञांची झोप उडवली आहे, याची कल्पना किती नागरिकांना असेल? जागतिक आरोग्य संघटनेनेही या संभाव्य संकटाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. नुकताच याबाबतचा एक सविस्तर अहवाल वैद्यकीय वर्तुळाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. हे नऊ विषाणू कोणते आणि त्यांची एवढी धास्ती खुद्द साथरोगतज्ज्ञांनाच का वाटते, याबाबत आढावा घेणारे हे विश्लेषण.

जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते?

विषाणू किंवा जीवाणू यांची मानवाला संक्रमण आणि इजा करण्याची क्षमता विरुद्ध मानवाची त्या विषाणूला रोखण्याची क्षमता या दोन निकषांवर कोणत्याही आजाराचे गांभीर्य ठरते. करोना महासाथीच्या निमित्ताने सार्स कोव्ह २ हा विषाणू आणि कोविड १९ या आजाराची भीषणता हा याबाबतचा एक ताजा अनुभव ठरतो. करोना विषाणूने जगभर हातपाय पसरण्यास सुरुवात केली त्या वेळी याच दोन निकषांवर जागतिक आरोग्य संघटनेने हा विषाणू आणि त्याचा प्रसार ही ‘जागतिक आणीबाणी’ म्हणून जाहीर केली होती. करोनाच्या भीषणतेमुळे दोन-अडीच वर्षे अनेक निर्बंध सहन करून आता पुन्हा काहीसा मोकळा श्वास जग घेत असताना जागतिक आरोग्य संघटनेकडून तब्बल नऊ विषाणूंबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या विषाणूंची विनाश क्षमता विचारात घेता त्यांच्या संभाव्य उद्रेकावर मात करण्याच्या दृष्टीने आवश्यक ‘ब्लूप्रिंट्स’ तयार करण्यात संघटना कार्यरत असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट करण्यात आले आहे.

हे नऊ विषाणू, जीवाणू कोणते?

१) निपा व्हायरस – वटवाघळांमार्फत पसरणारा निपा हा विषाणू शास्त्रज्ञ आणि साथरोगतज्ज्ञांची झोप उडवणाऱ्या विषाणूंपैकी एक प्रमुख विषाणू आहे. प्राण्यांकडून माणसांना आणि माणसांकडून माणसांनाही त्याचा संसर्ग होण्याचा धोका असतो. दूषित अन्न हाही त्याचे संक्रमण पसरवण्यास कारणीभूत ठरू शकतो. या आजारात ताप आणि विषाणूजन्य आजारांच्या इतर लक्षणांसह मेंदूला सूज येते. माणसे किंवा प्राण्यांसाठीही या आजारावर लस उपलब्ध नाही, मात्र संक्रमण रोखण्याचे काही उपाय ज्ञात आहेत.

विश्लेषण : उत्तर तारा म्हणजे नेमकं काय? दोन दिग्गजांनी काय उल्लेख केला?

२) क्रिमियन काँगो फीव्हर – गोचिड आणि इतर पशुधनातून हा आजार मानवामध्ये पसरतो. आफ्रिका, बाल्कन प्रदेश, पश्चिम आशिया आणि आशियाच्या इतर काही भागात हा प्रकार नियमितपणे आढळतो. यामुळे येणारा ताप हा हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार निर्माण करतो. त्यात अंतर्गत रक्तस्रावाचा धोकाही असतो. ज्या प्राण्यांपासून हा आजार पसरतो त्यांच्या संपर्कात न येणे हा एकमेव खबरदारीचा उपाय असल्याचे जागतिक आरोग्य संघटना सांगते.

३) लासा फीव्हर – पश्चिम आफ्रिकेच्या काही भागांमध्ये असलेला लासा ताप हा उंदरांमार्फत प्रसारित होतो. उंदीर हा विषाणू उत्सर्जित करतात आणि त्यांच्या मलमूत्राच्या संपर्कात आल्याने इतर प्राण्यांना आणि मानवाला त्याचा संसर्ग होतो. मृत्यू किंवा कायमस्वरूपी बहिरेपणा अशा दोन टोकाच्या परिणामांना या रुग्णाला सामोरे जावे लागते.

४) रिफ्ट व्हॅली फीव्हर – प्रामुख्याने डासांमार्फत पसरणारा हा संसर्ग आहे. मानवाबरोबरच गुरे, मेंढ्या, शेळ्या, म्हैस, उंट यांनाही त्याचा संसर्ग होऊ शकतो. रक्त, शरीरातील द्रव आणि संक्रमित प्राण्यांच्या उतींमार्फत हा संसर्ग पसरतो. संसर्ग झालेल्या सुमारे आठ ते १० टक्के माणसांमध्ये डोळ्यांना जखमा आणि रक्तस्राव अशी लक्षणे दिसतात. आफ्रिकेपासून सौदी अरेबिया आणि येमेनपर्यंत या विषाणूचे अस्तित्व आहे. पूर आल्यानंतर हा संसर्ग वाढतो असे संशोधनाअंती समोर आले आहे.

५) झिका – हाही डासांमार्फत पसरणारा आजार आहे. गर्भवती महिलेकडून तिच्या बाळालाही तो संसर्ग होण्याची शक्यता असते. हा विषाणू प्राणघातक नाही, मात्र काही प्रकरणांमध्ये गंभीर मेंदू विकार बळावण्याची शक्यता असते. या आजारावर अद्याप लस किंवा औषध नाही, मात्र डासांपासून प्रतिबंध केल्यास आजाराचा प्रसार रोखणे शक्य होते.

विश्लेषण : अमेरिकेवर चीनने खरोखर टेहळणी फुगा सोडला का? कशामुळे ताणले गेले दोन्ही देशांचे संबंध?

६) इबोला किंवा एबोला – वटवाघळांमार्फत हा विषाणू पसरतो. त्यांच्यामार्फत इतर प्राण्यांना आणि माणसांमार्फत माणसांना हा आजार होण्याची शक्यता असते. त्याचा किमान मृत्यूदर ५० टक्के एवढा आहे. गिनी आणि काँगो या देशांमध्ये त्यावर लशींचा वापर केला जातो.

७) मेर्स : उंटांमार्फत मध्य पूर्वेत या विषाणूचा प्रसार प्रामुख्याने होतो. उंटांपासून मानवामध्ये आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे त्याचा प्रसार होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या नोंदींनुसार त्याचा मृत्यूदर ३५ टक्के एवढा आहे. २०१२ पासून २७ देशांमध्ये या आजाराच्या संक्रमणाची नोंद झाली आहे. श्वसन संस्थेत खोलवर जाणारा हा विषाणू खोकला आणि शिंकांद्वारे प्रसारित होत असल्याने त्याचा प्रसाराचा वेग अधिक आहे.

८) सार्स – सार्सचा प्रसार हा पाम सिव्हेट्स आणि वटवाघळे तसेच इतर अनेक प्राण्यांद्वारे या विषाणूचा प्रसार होतो. शिंका आणि खोकल्याद्वारे पसरणारे विषाणू पृष्ठभागांवर अधिक काळ राहिल्याने इतरांना संसर्ग करतात. या आजाराचा मृत्युदर एक टक्क्याहून कमी आहे. २००३ मध्ये सुमारे २९ देशांमध्ये त्याचा प्रसार झाला, मात्र विलगीकरणासारख्या उपायाने त्याला नियंत्रणात आणण्यात आले.

) अज्ञात विषाणू – जागतिक आरोग्य संघटनेच्या मते या सर्व ज्ञात विषाणूंमुळे होणारे आजार हा जेवढ्या चिंतेचा विषय आहे, तेवढाच अज्ञात विषाणूमुळे उद्भवणारा एखादा संभाव्य आजारही नजीकच्या काळात महामारी सदृश परिस्थिती निर्माण करेल अशी चिंता जगभरातील साथरोगतज्ज्ञ व्यक्त करतात.

bhakti.bisure@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nine dangerous viruses in world threat for humans print exp pmw
First published on: 07-02-2023 at 08:50 IST