केरळमध्ये पुन्हा एकदा नोरोव्हायरसचा प्रादुर्भाव होत आहे. एर्नाकुलम जिल्ह्यातील कक्कानाड येथे एकाच शाळेतील १९ विद्यार्थी नोरोव्हायरसने संक्रमित झाले आहेत. काही विद्यार्थ्यांचे पालक देखील संक्रमित झाल्याची माहिती मिळत आहे. नोरोव्हायरसचा प्रादुर्भाव होऊ लागल्यापासून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस ऑनलाईन करण्यात आले आहे. प्रशासनाने विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शक्य त्या उपाययनोज राबविण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याचे वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, ६२ विद्यार्थी आणि काही पालकांमध्ये नोरोव्हायरसची लक्षणे आढळली आहेत. यामधील दोन जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. मागच्यावर्षी तिरुवनंतपुरममधील विझिंजम येथे दोन मुलांना नोरोव्हायरस बाधित असल्याचे समोर आले होते. दोन वर्षांपूर्वी वायनाड येथील देखील अनेक मुलांना या व्हायरसने संक्रमित केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे नोरोव्हायरस

नोरोव्हायरस एक संसर्गजन्य आजार आहे. याची बाधा झाल्यानंतर पोटाच्या तक्रारी सुरु होतात. याचसाठी याला ‘स्टमक फ्लू’ किंवा ‘स्टमक बग’ देखील म्हटले जाते. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) नुसार, नोरोव्हायरसला स्टमक फ्लू म्हटले जात असले तरी हा आजार फ्लूमुळे होत नाही. हा एक संसर्गजन्य विषाणू आहे जो संक्रमित व्यक्तीशी थेट संपर्क साधून, दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनाने पसरतो.

लक्षणे काय आहेत आणि कसा पसरतो?

या विषाणूची बाधा झाल्यानंतर अचानक उलट्या किंवा अतिसार सारखे लक्षणं दिसतात. यासोबतच ताप, अंगदुखी आणि डोकेदुखी सारखा त्रास सुरु होतो. विषाणूचे संक्रमण झाल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी याची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. नोरोव्हायरस हा अन्न किंवा सांडपाण्यातून पसरतो. यासोबतच जर आधीच संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात इतर व्यक्ती आल्यास त्यांना देखील व्हायरसची लागण होण्याचा धोका असतो. तसेच ज्या वस्तूंवर किंवा तुम्ही हात लावत असलेल्या ठिकाणांवर कोरोनाव्हायरसचा अंश आधीपासूनच असेल तर कोरोनाव्हायरसने व्यक्ती बाधित होऊ शकते.

नोरोव्हायरसमध्ये जगभरात किती मृत्यू?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, जगभरात नोरोव्हायरसमुळे जवळपास ६८.५ कोटी लोक बाधित होतात. यापैकी २० कोटी रुग्ण हे पाचवर्षांहून कमी वयाचे मुले असतात. WHO ने असेही सांगितले की, दरवर्षी नोरोव्हायरसमुळे दोन लाख लोकांचा मृत्यू होतो. ज्यामध्ये ५० हजारांहून अधिक लहान मुलांचा समावेश असतो.

यापासून बचाव कसा करायचा?

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्विस (NHS) च्या माहितीनुसार, नोरोव्हायरसने बाधित झाल्यानंतर त्यातून बरे होण्याचा मार्ग आहे. व्हायरसची बाधा झाल्यानतंर उलट्या आणि अतिसारचा त्रास होतो. त्यामुळे स्वतः हायड्रेट ठेवणे जास्त जरुरी असते. व्हायरसने संक्रमित झाल्यानंतर जास्तीत जास्त पाणी प्यायचे. यानंतर दोन ते तीन दिवसांत रुग्णाला आराम मिळायला लागतो. यासोबतच या व्हायरसचे संक्रमण होऊच नये यासाठी साबणाने हात स्वच्छ धुमे गरजेचे आहे. साबण आणि गरम पाण्याने देखील हात धुतल्यास उत्तम. कपड्यांना देखील गरम पाण्यात धुतले जावे.

सीडीसीच्या म्हणण्यानुसार एक व्यक्ती आपल्यी जीवनात अनेकदा नोरोव्हायरसने संक्रमित होतो. कारण या व्हायरसचे अनेक प्रकार आहेत. या विषाणूचे वेगवेगळे स्ट्रेन असल्यामुळे एखाद्याला या विषाणूचा अनेकदा संसर्ग होऊ शकतो. एका व्यक्तीला पुन्हा पुन्हा याची बाधा होऊ शकते. एक स्ट्रेनच्या व्हायरसमुळे इतर व्हायरसच्या विरोधातली प्रतिकारशक्ती तयार होत नाही. सीडीसीने सांगितले की, एकदा व्हायरसच्या विरोधात रोग प्रतिकारशक्ती तयार होते, पण ती किती काळ टिकून राहते, याबाबत साशंकता आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Norovirus outbreak in kerala students infected virus know symptoms and treatement kvg