पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील बॉक्सिंग क्रीडा प्रकार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. इटलीची अँजेला कारिनी आणि अल्जीरियाच्या इमान खेलिफ यांच्यातील लढतीनंतर वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. खेलिफ हिच्याविरुद्ध यापूर्वी लिंगबदलावरून कारवाई झाली होती. मात्र, यानंतरही ती ऑलिम्पिक स्पर्धेत महिला गटातून लढत आहे. यामुळे वादाला सुरुवात झाली. हे नेमके प्रकरण काय आहे, यावर सध्या राजकीय स्तरावर का चर्चा केली जात आहे, याचा आढावा.

वादाला सुरुवात कशी झाली?

महिला बॉक्सिंगमधील ६६ किलो वजनी गटात इटलीची अँजेला आणि अल्जीरियाची खेलिफ यांच्यात सामना झाला. सामन्याला सुरुवात झाल्यावर खेलिफने काही आक्रमक पंचेस मारले. अँजेलाच्या नाकाला दुखापत झाली व रक्तस्राव सुरू झाला. त्यामुळे केवळ ४६ सेकंदांनंतर अँजेलाने सामना सोडण्याचा निर्णय घेतला. मग अँजेलाने आपले हेल्मेट काढत बॉक्सिंग रिंगमध्ये रडण्यास सुरुवात केली. अँजेलाने खेलिफबरोबर हस्तांदोलन करण्यासही नकार दिला. या सामन्यानंतर अँजेला आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हणाली. खेलिफवर ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी बॉक्सिंग स्पर्धेमध्ये बंदीची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये तिला खेळण्याची संधी कशी देण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा : राहुल गांधींकडून सद्य राजकारणाला चक्रव्यूहाची उपमा; काय आहे महाभारतातील चक्रव्यूह नि अभिमन्यूचा पराक्रम?

खेलिफवर यापूर्वी कशाबद्दल कारवाई?

जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत लिंग पात्रता चाचणीत अपयशी ठरलेल्या दोन बॉक्सरना या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची परवानगी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून (आयओसी) देण्यात आली. गेल्या वर्षी दिल्लीत झालेल्या महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या सुवर्णपदकाच्या सामन्याच्या काही तास आधीच खेलिफला अपात्र ठरविण्यात आले होते. टेस्टोस्टेरॉनच्या उच्च पातळीमुळे खेलिफला अपात्र ठरवण्यात आल्याचे वृत्त अल्जीरियाच्या प्रसारमाध्यमांकडून देण्यात आले होते. याच स्पर्धेत चायनीज तैपेइच्या दोन वेळच्या जागतिक विजेत्या लिन यू-टिंगने आपले कांस्यपदक गमावले. टिंगही हाच निकष पूर्ण करू शकली नव्हती. ‘‘दोन बॉक्सरच्या चाचण्यांमध्ये XY हे गुणसूत्र आढळून आले आणि त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना वगळण्यात आले,’’ असे हौशी बॉक्सिंगचे अध्यक्ष उमर क्रेमलेव्ह यांनी सांगितले. XY हे पुरुषांचे गुणसूत्र आहे आणि XX हे गुणसूत्र महिलांचे आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनद्वारे (आयबीए) जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केली गेली होती आणि आर्थिक अपारदर्शकतेमुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने या स्पर्धेला मान्यता दिली नव्हती. मग, त्यांनी या दोघींना ऑलिम्पिकमध्ये खेळण्यास कसे पात्र धरले असा प्रश्न ‘आयीबीए’ने उपस्थित केला आहे. या प्रकरणानंतर दोन्ही देशांनी आपापल्या बॉक्सर्सना पाठिंबा दिला.

ऑलिम्पिक वादावर ‘आयओसी’ची भूमिका काय?

‘‘महिला गटाच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी पात्रतेच्या नियमांचे पालन केले आहे. खेलिफच्या पारपत्रात तिचा महिला म्हणून उल्लेख केलेला आहे,’’ असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) प्रवक्ते मार्क ॲडम्स यांनी सांगितले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये होणाऱ्या बॉक्सिंग स्पर्धा या ‘आयओसी’च्या कार्यकारी मंडळाच्या हंगामी समिती म्हणून कार्य करणाऱ्या पॅरिस बॉक्सिंग युनिटकडून आयोजित केल्या जात आहेत. ‘‘आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग समितीने आपल्या आर्थिक व्यवहाराबाबतची स्पष्टता देण्यास तयारी दर्शवली नसल्यामुळे सध्या या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे,’’ असे ‘आयओसी’कडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : विश्लेषण : शासकीय भूखंडावरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना मालकी हक्क का हवा? काय अडचणी आहेत?

अँजेलाला कोणत्या दिग्गजांचा पाठिंबा?

अँजेलाच्या प्रकरणात इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी ही लढत समान पातळीवर झाली नसल्याचे म्हटले. ‘‘ज्या खेळाडूंमध्ये पुरुषांचे अनुवांशिक गुण आहेत, त्यांना महिला स्पर्धांमध्ये प्रवेश देऊ नये. महिला खेळाडूंसाठी जे नियम आहेत, त्यांचे पालन केले पाहिजे. एकाच व्यासपीठावर स्पर्धा ही समान खेळाडूंमध्ये झाली पाहिले. मात्र, अँजेलाची स्पर्धा ही समान पातळीवर झाली नाही,’’ असे मेलोनी यांचे म्हणणे आहे. ‘‘तुमच्या मनोरंजनासाठी एका पुरुषाने सार्वजनिक ठिकाणी महिलेला मारहाण केली आहे,’’ असे हॅरी पॉटरच्या लेखिका जे. के. रॉलिंग म्हणाल्या.

लैंगिक विकास फरक (डीएसडी) म्हणजे काय?

लैंगिक विकासातील फरक (डीएसडी) ही एक दुर्मीळ स्थिती आहे, जिथे महिला म्हणून वाढलेल्या व्यक्तीमध्ये XY गुणसूत्र आणि पुरुष श्रेणीमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी असते. ऑलिम्पिकच्या अधिकृत संकेतस्थळानुसार या महिलांमध्ये स्नायूंचे प्रमाण जास्त असते व त्याचा फायदा त्यांना होतो. यामध्ये सामान्यत: जन्माच्या वेळी लिंगाशी संबंधित असलेल्या जननेंद्रियातील फरकदेखील समाविष्ट असू शकतो. त्यामुळे बॉक्सिंगसारख्या खेळांमध्ये ही एक गंभीर सुरक्षा समस्या ठरू शकते. ‘आयओसी’च्या नियमानुसार ‘डीएसडी’ खेळाडूंच्या सुरक्षिततेबाबत समस्या निर्माण झाल्यास त्या खेळाडूंना स्पर्धेतून वगळले जाऊ शकते. अन्यथा खेळाडूची पारदर्शकता पडताळणी केल्यानंतर त्यांचा समावेश केला जाऊ शकतो.

हेही वाचा : विश्लेषण: महाराष्ट्र ठरू लागलाय नेमबाजांची खाण? स्वप्निल कुसळे, अंजली भागवत, राही, तेजस्विनी यांच्या यशाचे रहस्य काय?

यापूर्वी असे कोणते प्रकरण घडले होते?

ऑलिम्पिकमध्ये टेस्टोस्टेरॉन संप्रेरकाची पातळी वाढल्याचे आणखी एक प्रकरण घडले आहे. दक्षिण आफ्रिकेची धावपटू कॅस्टर सेमेन्याने २०१२ टोक्यो आणि २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती. यानंतर २०२० मध्ये तिला ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास नाकारण्यात आले. तिच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन संप्रेरकाची पातळी ही सामान्य महिलांपेक्षा अधिक आढळली होती.