संदीप नलावडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय अंतराळ संस्थेच्या (इस्रो) ‘एलव्हीएम३’ या सर्वांत मोठ्या प्रक्षेपकाच्या मदतीने ब्रिटनस्थित ‘वनवेब ग्रूप कंपनी’चे ३६ इंटरनेट उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. इस्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या ‘न्यू स्पेस इंडिया प्रा. लि.’ची ही दुसरी यशस्वी मोहीम आहे.

इस्रोची ही व्यावसायिक मोहीम काय आहे?

इस्रोने इतिहास रचत २६ मार्चला सकाळी ९ वाजता ‘एलव्हीएम३’चे यशस्वी प्रक्षेपण केले. हे इस्रोचे सर्वात वजनदार प्रक्षेपण यान असून त्याच्या मदतीने ब्रिटनच्या ‘वनवेब ग्रूप कंपनी’च्या ३६ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. कमी उंचीच्या कक्षेत एकूण ७२ उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने ब्रिटनच्या नेटवर्क ॲक्सेस असोसिएट्स लिमिटेड (वनवेब ग्रूप कंपनी) यांच्याबरोबर करार केला आहे. ‘एलव्हीएम३-एम/ वनवेब इंडिया-२’ अशी ही मोहीम आहे. या मोहिमेतील पहिले ३६ उपग्रह गेल्या वर्षी २३ ऑक्टोबरला प्रक्षेपित करण्यात आले, तर उर्वरित ३६ उपग्रह दुसऱ्या टप्प्यात २६ मार्च रोजी तमिळनाडूतील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या तळावरून प्रक्षेपित करण्यात आले. उड्डाणानंतर प्रक्षेपणास्त्राने सर्व उपग्रह क्रमाक्रमाने त्यांच्या नियोजित कक्षांमध्ये प्रस्थापित केले. हे उपग्रह नियोजित कक्षांमध्ये स्थिर झाले असून त्यांच्याशी संपर्कही प्रस्थापित करण्यात आला आहे. त्यामुळे या व्यावसायिक मोहिमेची यशस्वी सांगता झाली.

‘एलव्हीएम३’ या प्रक्षेपण यानाचे वैशिष्ट्य काय?

‘एलव्हीएम३’ हे इस्रोचे महत्त्वपूर्ण प्रक्षेपण यान आहे. या प्रक्षेपण यानाची उंची ४३.४३ मीटर उंच असून त्याचे वजन ६४४ टन आहे. हे प्रक्षेपण यान आठ हजार किलोग्रॅम वजन पेलण्यासही सक्षम आहे. हे भारताचे सर्वांत वजनदार प्रक्षेपण यान आहे. त्याचे तीन स्तर आहेत. या प्रक्षेपण यानाच्या माध्यमातून इस्रोने ५ जून २०१७ रोजी सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘जीएसएलव्ही एमके३’ची पहिली कक्षीय चाचणी यशस्वी प्रक्षेपित केली होती. आता झालेले ‘एलव्हीएम३’चे हे सहावे प्रक्षेपण होते. २०१९ मध्ये चांद्रयान-२चे प्रक्षेपणही याच प्रक्षेपणास्त्राद्वारे झाले होते. आता कमी उंचीच्या कक्षेत (लो अर्थ ऑर्बिट) अनेक उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता प्रदर्शित केली आहे. या प्रक्षेपण यानात नजीकच्या काळात अनेक सुधारणा करण्यात आल्या असून मानवी मोहिमांसाठी ते अधिकाधिक उपयुक्त करण्याचा मानस इस्रोने व्यक्त केला आहे. भारताची ‘गगनयान’ ही महत्त्वाकांक्षी मानवी अंतराळ मोहिमेसाठी हे यान उपयुक्त ठरणार असल्याचे इस्रोने म्हटले आहे.

विश्लेषण : लेबनॉनमध्ये घड्याळाची वेळ बदलल्यामुळे गोंधळ, ‘डेलाइट सेव्हिंग टाईम’ म्हणजे काय? जाणून घ्या

वनवेब कंपनीने इस्रोशी करार करण्याचे कारण काय?

ब्रिटनच्या वनवेब कंपनीला सुरुवातीला रशियन अंतराळ केंद्रातून आपले उपग्रह प्रक्षेपित करायचे होते. मात्र युक्रेन-रशिया युद्धामुळे रशियन अंतराळ केंद्राने प्रक्षेपण थांबविले. हे उपग्रह ब्रिटनविरोधात वापरले जाणार नाहीत आणि ब्रिटिश सरकार आपला हिस्सा विकू शकतो, असे आश्वासन वनवेब कंपनीने रशियन अंतराळ केंद्राकडे मागितल्यानंतर त्यांनी ही योजना रद्द केली. रशियाकडून ही योजना रद्द झाल्यानंतर भारताच्या इस्रोने त्याची तयारी दर्शविली. ‘‘रशिया-युक्रेन युद्धाचा आम्हाला मोठा फटका बसला. रशियाशी सहा प्रक्षेपण करण्याचे करार झाले हाेते आणि त्यासाठी पूर्ण पैसे दिले गेले होते. मात्र आम्ही पैसे आणि ३६ उपग्रह गमावले. त्यापैकी तीन अतिशय मौल्यवान होते. त्याचबरोबर आमचे एक वर्षही वाया गेले. मात्र आम्हाला जास्त गरज असताना भारताने प्रक्षेपणाची तयारी दर्शविली,’’ असे वनवेब कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी सांगितले.

या मोहिमेचा इस्रोला पुढील काळासाठी फायदा काय?

भारताने २०२० मध्ये अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतल्यापासून भारत आंतरराष्ट्रीय व्यावसायिक अंतराळ क्षेत्रात आपला वाटा वाढविण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख राष्ट्रांपैकी एक भारत असला तरी या क्षेत्रातील व्यावसायिक बाजारात भारताचा वाटा केवळ २ टक्के आहे. वनवेब कंपनीच्या मोहिमेमुळे जागतिक दळणवळण उपग्रहांच्या प्रक्षेपणामध्ये भारताचे वाढते महत्त्व अधोरेखित झाले आहे. इस्राेद्वारे व्यावसायिक प्रक्षेपण करून २०३० पर्यंत भारताचा वाटा दोन टक्क्यांवरून १० टक्के करण्याची देशाची योजना आहे. त्यासाठी ‘स्कायरूट’ आणि ‘अग्नीकुल’ या खासगी कंपन्यांचे प्रस्तावित प्रक्षेपणही इस्रोकडून केले जाणार आहे. व्यावसायिक क्षेत्र लक्षात घेऊन इस्रोने ‘स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल’ (एसएसएलव्ही) विकसित केले आहे. ज्याचा उद्देश मागणीनुसार प्रक्षेपण सेवा व्यावसायिकरीत्या प्रदान करणे आहे. हे ‘एसएसएलव्ही’ इस्रोच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आले आहे. आतापर्यंत इस्रोने किमान ३६ देशांमधून ३८४ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यापैकी सर्वाधिक व्यावसायिक प्रक्षेपण अमेरिकी कंपन्यांचे आहे.

इस्रोच्या या मोहिमेमुळे आर्थिक लाभ किती?

या मोहिमेमुळे केवळ इस्रोचे महत्त्व वाढले नाही तर या भारतीय अंतराळ केंद्राला एक हजार कोटी रुपयांची कमाईही झाली आहे. अंतराळ क्षेत्राच्या अर्थसंकल्पावरील संसदीय स्थायी समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, २०१९मध्ये तयार करण्यात आलेल्या इस्रोची व्यावसायिक उपशाखा असलेल्या ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड’च्या कमाईत वाढ झाली आहे. अहवालानुसार २०२१-२२ मध्ये १,७३१ कोटी रुपयांची कमाई झाली असून २०२३-२४ मध्ये ती ३,५०९ कोटींपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One web campaign by isro new space pvt ltd internet satellite launch print exp pmw
Show comments