Syringe attack France फ्रान्समध्ये देशभरात म्युझिक फेस्टिव्हल सुरू आहे. याचदरम्यान तब्बल १४५ जणांवर सुईने वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने फ्रान्समधील नागरिक घाबरले आहेत. लाखो लोक फेटे दे ला म्युझिक फेस्टिव्हल साजरा करण्यासाठी जमले असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पॅरिसमध्ये जमलेल्या गर्दीत हल्लेखोरही होते. देशातील मंत्रालयाच्या मते, फ्रान्समधील १४५ जणांनी सांगितले की त्यांच्यावर सुईने वार करण्यात आले आहेत. पॅरिस पोलिसांनी शहरात याचसारख्या १३ घटनांची नोंद केली आहे. म्युझिक फेस्टिव्हलदरम्यान नक्की काय घडले? लोकांवर सुईने हल्ला का करण्यात आला? ‘सिरिंज अटॅक’म्हणजे नक्की काय? यापूर्वीही असे हल्ले झाले आहेत का? त्याविषयी जाणून घेऊयात?
फ्रान्समधील फेटे दे ला म्युझिक फेस्टिव्हलदरम्यान नक्की काय घडले?
- फ्रान्समधील मंत्रालयाने माहिती दिली की, देशभरात १४५ जणांवर म्युझिक फेस्टिव्हल सुरू असताना सुईने हल्ला करण्यात आला.
- पॅरिसमध्ये पोलिसांनी सांगितले की, त्यांनी अशा १३ घटनांची नोंद केली आहे.
- म्युझिक फेस्टिव्हलदरम्यान, सोशल मीडियावरील काही पोस्टमध्येदेखील या फेस्टिव्हलदरम्यान महिलांना लक्ष्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
- या सिरिंज हल्ल्यात हल्लेखोरांनी रोहिपनॉल किंवा जीएचबीसारख्या औषधांचा वापर केला की नाही, याचा पोलिस तपास करत आहेत.
- सिरिंज हल्ल्यात या औषधांचा वापर पीडितांना गोंधळात टाकण्यासाठी, बेशुद्ध करण्यासाठी किंवा सहज हानी पोहोचवता यावी यासाठी केला जातो.
- “काही पीडितांना विषाची चाचणी करण्याकरिता रुग्णालयात नेण्यात आले,” अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पॅरिसमधील सरकारी वकिलांनी सांगितले की, १५ वर्षांच्या मुलीसह आणि १८ वर्षांच्या एका पुरुषासह तीन जणांवर वेगवेगळ्या घटनांमध्ये सुयांनी वार करण्यात आले आहेत. त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर तिघांनाही अस्वस्थ वाटू लागले असेही त्यांनी सांगितले. संपूर्ण फ्रान्समध्ये सिरिंज अटॅकप्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली अशी माहिती फ्रान्समधील गृह मंत्रालयाने दिली आहे. हल्लेखोरांमध्ये अँगोलेममधील चार जणांचा समावेश आहे. त्यांच्यावर सुमारे ५० लोकांवर हल्ला केल्याचा आरोप आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मेट्झमध्येही दोन हल्लेखोरांना अटक करण्यात आली. प्रादेशिक न्यूजवाहिनी ‘फ्रान्स ३’ने सांगितले की, एक पुरुष सिरिंजसह आढळून आला आणि हल्ला झालेल्या एका महिलेने तिच्यावर वार केलेल्या एका पुरुषाला ओळखले आहे. या महोत्सवादरम्यान विविध गुन्ह्यांसाठी फ्रान्समध्ये एकूण ३७० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले. यापैकी जवळपास ९० हल्ले एकट्या पॅरिसमध्ये झाले आहेत. या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेले १४ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. यामध्ये १७ वर्षांच्या एका तरुणीचा समावेश आहे. तिच्या पोटाच्या खालच्या भागात वार करण्यात आले आहे. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्ल्यांमध्ये पोलिस अधिकारीही जखमी
मुख्य म्हणजे या हल्ल्यांमध्ये १३ पोलिस अधिकारीही जखमी झाले आहेत. पॅरिसचे पोलिसप्रमुख लॉरेंट नुनेज म्हणाले की, कोणत्याही मोठ्या घटनेची नोंद झालेली नाही. ग्लोबल ड्रग सर्व्हेचे संस्थापक आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे प्राध्यापक डॉ. अॅडम आर विन्स्टॉक यांनी ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ला सांगितले की, सुईतून काही पदार्थ बाहेर पडणे ही दुर्मीळ घटना आहे. त्यांनी असेही सांगितले की, लोक मद्यधूंद अवस्थेत किंवा ड्रग्जच्या आहारी गेल्यावर त्यांचा फायदा घेतला जाऊ शकतो.
२०२२ मध्ये काय घडले होते?
‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार, २०२२ मध्ये क्लब, बार, म्युझिक फेस्टिव्हल आणि अगदी थिएटरमध्ये सिरिंजने वार करण्यात आल्याच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली होती. त्यावेळी सरकारने रात्री बाहेर जाणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. त्यांनी असा इशारा दिला होता की, सुईने हल्ला झाल्यास लोकांनी ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधावा आणि दवाखान्यात चाचणी घ्यावी, जेणेकरून त्यांना विषबाधा झाली आहे की नाही हे कळू शकेल. यापैकी काही तक्रारी २०२२ मध्ये झालेल्या फेटे डे ला म्युझिक फेस्टिव्हलमधील होत्या. वर्षभरात नॅन्टेस, ग्रेनोबल आणि टूलूससारख्या शहरांमध्ये यांसारखी शेकडो प्रकरणे नोंदवण्यात आली होती.
‘एएफपी’ने म्हटले की, २०२२ च्या पोलिसांच्या माहितीपत्रात असे म्हटले आहे की, सिरिंजच्या खुणा सहसा हातावर, पाठीवर किंवा नितंबांवर आढळतात आणि बहुतेक पीडितांना त्यांच्यावर हल्ला कोणी केला हे लक्षात येत नाही. मुख्य म्हणजे त्याच वर्षीच्या ब्रिटीश संसदेच्या अहवालात असेही म्हटले आहे की, सप्टेंबर २०२१ ते डिसेंबर २०२२ च्या अखेरपर्यंत ब्रिटनमध्ये अशा १,००० हून अधिक प्रकरणांची नोंद करण्यात आली होती. हा अहवाल ३,००० हून अधिक पीडित आणि साक्षीदारांच्या प्रतिसादांवर आधारित होता. पोलिसांच्या आकडेवारीनुसार जवळपास ९० टक्के हल्ले रात्रीच्या वेळी पब आणि नाईटक्लबसारख्या ठिकाणी घडले. काही घटना उत्सव आणि घरातील पार्ट्यांमध्येदेखील घडल्या होत्या. आता पुन्हा एकदा अशीच प्रकरणे नोंदवण्यात येत असल्याने फ्रान्समधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.