Thailand Prime Minister removal थायलंडच्या संविधानिक न्यायालयाने (Constitutional Court) शुक्रवारी (२९ ऑगस्ट) नैतिकतेच्या उल्लंघनामुळे पायतोंगटार्न शिनावात्रा यांना पंतप्रधानपदावरून हटवले आहे. त्यामुळे आता पुढील पंतप्रधान कोण असेल? यावरून चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्यावर नैतिकतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप होत. माजी कंबोडियन नेते हुन सेन यांच्याशी झालेल्या जूनमधील फोन संभाषणाची एक क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिनावात्रा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. थायलंडमध्ये नक्की काय घडतंय? नवीन पंतप्रधान कोण असणार? थायलंडची संसद विसर्जित होईल का? जाणून घेऊयात…
व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये नक्की काय होते?
- काही महिन्यांपूर्वी चिघळलेल्या सीमावादाबद्दल पायतोंगटार्न यांनी माजी कंबोडियन नेते हुन सेन यांच्याशी चर्चा केली.
- एका लष्करी संघर्षात कंबोडियन सैनिकाचा मृत्यू झाल्याने सीमावाद वाढला होता.
- त्या चर्चेनंतर हुन सेन यांनी ते १७ मिनिटांचे संपूर्ण रेकॉर्डिंग स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केले. हुन सेन यांनी २०२३ मध्ये कंबोडियन नेतेपद सोडले; परंतु तरीही त्यांचा मोठा प्रभाव आहे.
- या रेकॉर्डिंगमध्ये पायतोंगटार्न उच्च पदावर असूनदेखील त्यांनी ठाम भूमिका घेतली नाही, असे आरोप झाले.
- सर्वांत वादग्रस्त बाब म्हणजे त्यांनी ईशान्येकडील थाई लष्कराच्या कमांडरला ‘विरोधक’ म्हटले. त्यामुळे थायलंडच्या लष्करी समर्थक गटांमध्ये संताप निर्माण झाला.
- थायलंडच्या सशस्त्र दलांचा राजकारणात हस्तक्षेप करण्याचा दीर्घ इतिहास राहिला आहे.
न्यायालयाने म्हटले आहे, “कंबोडियाशी असलेल्या वैयक्तिक संबंधांमुळे, शिनावात्रा सातत्याने कंबोडियाच्या बाजूने किंवा त्यांच्या इच्छेनुसार कार्य करण्यास तयार दिसत होत्या.” त्यांनी असा दावा केला होता की, हा कॉल हिंसेचा वापर न करता, शांतता परत आणण्यासाठी केलेली वैयक्तिक वाटाघाट होती; परंतु न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळला. २००८ पासून नऊ-सदस्यांच्या संविधानिक न्यायालयाने (Constitutional Court) पदावरून हटविलेल्या त्या पाचव्या पंतप्रधान आणि शिनावात्रा कुटुंबातील तिसऱ्या सदस्य आहेत.
थायलंडची संसद विसर्जित होईल का?
सध्या तरी परिस्थितीनुसार संसदेचे विसर्जन करण्याची आवश्यकता नाही. उप-पंतप्रधान फुम्थम वेचायाचाई (Phumtham Wechayachai) काळजीवाहू पंतप्रधान म्हणून त्या पदाची जबाबदारी सांभाळतील. हे पद त्यांनी शिनावात्रा यांच्या निलंबनापासून म्हणजेच जुलैपासून स्वीकारले आहे. जोपर्यंत संसदेचे अध्यक्ष (House speaker) नवीन पंतप्रधानाची निवड करण्यासाठी तारीख निश्चित करीत नाहीत तोपर्यंत विद्यमान मंत्रिमंडळ काळजीवाहू सरकार म्हणून कार्य करील. संविधानात कनिष्ठ सभागृहाची बैठक कधी घ्यावी याबद्दल कोणतीही विशिष्ट वेळमर्यादा दिलेली नाही. जूनमध्ये सत्ताधारी आघाडीतील एक प्रमुख सदस्य असलेला भूमजैथाई पक्षाच्या ६९ खासदारांनी माघार घेतल्याने सरकार कोसळणे जवळजवळ निश्चित आहे.
नवीन पंतप्रधान कोण होणार?
नवीन पंतप्रधान होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना मतदानापूर्वी किमान ५० खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. कनिष्ठ सभागृहाच्या सध्याच्या सदस्यांपैकी अर्ध्याहून अधिक (४९२ पैकी २४७) मते मिळविणाऱ्या उमेदवारांचा पंतप्रधान होण्याच्या दृष्टीने विचार होऊ शकतो. जर कोणत्याही उमेदवाराला इतकी मते मिळाली नाहीत, तर पंतप्रधान निवडले जाईपर्यंत ही प्रक्रिया अनिश्चित काळासाठी पुन्हा पुन्हा सुरू राहू शकते.
२०२३ च्या निवडणुकीपूर्वी घोषित केलेल्या पात्र उमेदवारांपैकी पाच उमेदवार शिल्लक आहेत. शिनावात्रा या फेउ थाई (Pheu Thai) पक्षाशी संबंधित आहेत, त्या पक्षाचे चाईकसेम नितिसीरी (Chaikasem Nitisiri) हे माजी न्यायमंत्री व अॅटर्नी जनरल आहेत. ते पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात. भूमजैथाई पक्षाने शुक्रवारी जाहीर केले की, त्यांनी त्यांच्या नेत्या अनुतिन चर्नविराकुल (Anutin Charnvirakul) यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन करण्यासाठी इतर पक्षांकडून पुरेसा पाठिंबा मिळविला आहे.
सध्याचे ऊर्जामंत्री पिरापण सालिरथाविभागा, माजी उप-पंतप्रधान जुरिन लक्ष्मणविसित, माजी पंतप्रधान प्रयुथ चान-ओचादेखील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. माजी पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा हे एक सेवानिवृत्त लष्करी जनरल आहेत आणि त्यांनी २०१४ मध्ये मागील फेउ थाई सरकारविरुद्ध बंड केले होते. त्यानंतर त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली असून, सध्या ते राजेशाही सल्लागार आहेत.
पायतोंगटार्न शिनावात्रा कोण आहेत?
पायतोंगटार्न शिनावात्रा या थायलंडचे माजी पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा यांच्या कन्या आहेत.
पायतोंगटार्न यांच्या काकू यिंगलक शिनावात्रा यादेखील थायलंडच्या महिला पंतप्रधान राहिलेल्या आहेत. २१ ऑगस्ट १९८६ रोजी जन्मलेल्या पायतोंगटार्न यांनी ‘Chulalongkorn University’मधून राज्यशास्त्राच्या विषयात पदवी घेतलेली आहे. त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ सुरे येथून आंतरराष्ट्रीय हॉटेल व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण घेतले.
त्यांनी सुरुवातीला व्यावसायिक क्षेत्रात आणि कुटुंबाच्या रिअल इस्टेट, तसेच विमान वाहतूक व्यवसायाचे काम सांभाळले. २०२१ मध्ये पायतोंगटार्न यांची औपचारिक राजकारणात एन्ट्री झाली आणि त्यांना फ्यू थाय पक्षाच्या ‘समावेश आणि नवप्रवर्तन सल्लागार समिती’चे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले.
थायलंडमधील २०२४ मध्ये झालेल्या राजकीय गदारोळानंतर पायतोंगटार्न शिनावात्रा यांची पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. शिनावात्रा यांनी थायलंडच्या इतिहासातील सर्वांत तरुण पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळविला. पायतोंगटार्न यांच्या समर्थकांच्या मते, त्या थायलंडमधील बदलाचे प्रतीक होत्या.