Poland Belarus Border Closed How hurting China : पोलंडने आपली बेलारूसला लागून असलेली सीमा बंद केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर नवा वाद निर्माण झाला आहे. पोलंडच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका चीनला बसत असून, बीजिंगने सीमा उघडण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. बेलारूसला लागून असलेली सीमा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आल्याचे पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी स्पष्ट केले आहे. अलीकडेच पोलंडने आपल्या हवाई हद्दीत घुसलेले रशियाचे अनेक ड्रोन पाडले होते. २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण करताना रशियाने बेलारूसचा लष्करी तळ म्हणून वापर केला होता. त्यामुळे या घडामोडींकडे विशेष लक्ष आहे. दरम्यान, पोलंडने आपली सीमा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीन कसा अडचणीत आला? त्या संदर्भात घेतलेला हा आढावा…

रशिया आणि बेलारूसमध्ये लष्करी सराव

सध्या रशिया आणि बेलारूस या दोन देशांमध्ये ‘झापाद २०२५’ (पश्चिम-२०२५) नावाचा लष्करी सराव सुरू आहे. या सरावामध्ये तब्बल १३ हजार जवान सहभागी झाले आहेत. १२ ते १६ सप्टेंबर या काळात चालणाऱ्या या सरावामध्ये संरक्षण मोहिमा, शत्रूंच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देणे, युनियन स्टेटची (रशिया-बेलारूस युती) प्रादेशिक आघाडीचे एकात्म टिकवणे, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, तसेच हवाई मदतीचा वापर अशा गोष्टींचा समावेश आहे. दोन्ही देशांमधील हा सराव पोलंडच्या सीमेला लागून असलेल्या बेलारूसमधील एका मैदानावर सुरू आहे. सरावापूर्वीच पोलंडचे पंतप्रधान टस्क यांनी त्याला लष्करी धोरणाच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे म्हटले होते. पोलंड हा युरोपियन युनियन आणि नाटोचा सदस्य असून युक्रेनचा जवळचा मित्रदेश आहे. पोलंडमधील नागरिकांवरील धोका जोपर्यंत पूर्णपणे संपत नाही, तोपर्यंत ही सीमा बंद राहणार असल्याचे पोलंडच्या गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

इतिहासात पहिल्यांदाच सीमा बंद

दोन्ही देशांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी पूर्णपणे सीमा बंद करण्यात आली आहे. बेलारूसच्या पश्चिमेस पोलंड, लिथुआनिया व लात्विया हे तीन नाटो सदस्य देश असून, दक्षिणेला युक्रेन आहे. या लष्करी सरावाचे बेलारूसकडून समर्थन करण्यात आले आहे. या सरावामुळे पोलंडमधील नागरिकांच्या जीवाला कोणताही धोका नाही, असे स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आले आहे. बेलारूस आणि रशियामधील याआधीचे झापाद सराव सप्टेंबर २०२१ मध्ये झाले होते. रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्याच्या पाच महिन्याआधी हे लष्करी सराव करण्यात आले होते. बेलारूसचे हुकूमशहा अलेक्झांडर लुकाशेंको हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला पूर्णपणे पाठिंबा दर्शविला आहे.

आणखी वाचा : पाकिस्तानसह ४० हून अधिक मुस्लीम देशांची ‘इस्लामिक नाटो’वर चर्चा; भारताची चिंता वाढणार?

पोलंड-बेलारूस सीमाबंदीचा चीनला मोठा फटका

पोलंडने बेलारूसला लागून असलेली आपली सीमा पूर्णपणे बंद केल्यामुळे चीनला मोठा आर्थिक फटका बसत आहे. या सीमाबंदीमुळे चीनचा युरोपशी होणारा व्यापार रखडला आहे. पोलंडने आपल्या देशातील तीन प्रमुख मालवाहतूक रेल्वेमार्ग बंद केले आहेत. त्यामध्ये ‘तेरेस्पोल-ब्रेस्ट’ या मार्गाचा समावेश आहे, जो चीनमधून युरोपियन युनियनला होणाऱ्या निर्यातीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चीन आणि युरोपियन युनियनदरम्यानची सुमारे ९० टक्के रेल्वे मालवाहतूक बेलारूसमधून पोलंडमार्गे होते. २०२४ मध्ये चीन-युरोपदरम्यानच्या रेल्वे मालवाहतुकीत १०.६ टक्क्यांनी वाढ झाली होती. मागील वर्षी या मालाचे मूल्य २९.५४ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले, जे २०२३ च्या तुलनेत ८४.९ टक्क्यांनी जास्त होते. २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत चीनहून पोलंडमध्ये आलेल्या कंटेनरची (TEUs) संख्या ९३,३०० होती. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत या मार्गाने तब्बल २,२७,६५६ कंटेनर पोलंडमध्ये पोहोचले. सीमाबंदी कायम राहिल्यास चीनमधील कंपन्यांचे खर्च प्रचंड वाढतील. कारण- बीजिंगला आपली मालवाहतूक इतर मार्गांनी वळवावी लागेल.

पर्यायी मार्गांचा अभाव आणि चीनचा वाहतूक खर्चही वाढणार

लास्ट माइल एक्स्पर्टस या डिलिव्हरी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मारेक रोझिकी यांनी ‘Rzeczpospolita’ या वृत्तपत्राला सांगितले की, पोलंडने आपली सीमा आणखी काही दिवस बंद ठेवली, तर बीजिंगला काही पार्सल समुद्रातून आणि अंदाजे ३० टक्के माल विमानाने पाठवावा लागेल, त्यामुळे खर्च आणि कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होईल. पीकेपी कार्गो कनेक्ट या पार्सल सेवा कंपनीचे अध्यक्ष पिओटर सॅड्झा म्हणाले, “जर ही सीमाबंदी काही दिवसांसाठीच असेल, तर मोठी समस्या येणार नाही. चीनमधून येणाऱ्या मालगाड्या बेलारूसमध्ये थांबतील आणि सीमा खुली झाल्यावर पुढे जातील. फक्त रीलोडिंगवर अतिरिक्त खर्च करावा लागेल. चीन आणि युरोपियन युनियनमधील रेल्वेमार्गाला कोणताही चांगला पर्याय नाही. आम्ही अशी अपेक्षा करतो की, परिस्थिती लवकरच पूर्ववत होईल.”

पोलंड बेलारूस सीमा (छायाचित्र रॉयटर्स)

चीनच्या ‘बेल्ट अँड रोड’ प्रकल्पाला धक्का

पोलंडने आपली सीमा बंद केल्यामुळे चीनचा केवळ वाहतूक खर्चच नाही, तर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या ‘बेल्ट अँड रोड’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पालाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश सागरी वाहतुकीच्या तुलनेत जलद आणि विश्वासार्ह रेल्वे वाहतूक उपलब्ध करून देणे आहे. सध्या वाहतूक खर्च आणि प्रमाणाच्या बाबतीत रेल्वे सागरी वाहतुकीशी स्पर्धा करू शकत नाही; पण भविष्यात त्याचे महत्त्व नक्कीच वाढणार आहे. या कारणांमुळेच बीजिंगने ही सीमा पुन्हा उघडण्यासाठी पोलंडवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले की, त्यांचे वरिष्ठ अधिकारी पोलंडबरोबर आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक प्रश्नांवर चर्चा करतील. दोन्ही देशांमधील विविध क्षेत्रांतील सहकार्य आणि देवाणघेवाणीचा व्यापक आराखडा यावेळी तयार केला जाईल. पोलंडचे परराष्ट्रमंत्री राडोस्लाव सिकोर्स्की यांनी सोमवारी चीनच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना या सीमाबंदीच्या निर्णयाबद्दल माहिती दिली आहे.

हेही वाचा : ऐतिहासिक लाल किल्ला पडतोय काळा; कारणं काय? संशोधकांना काय आढळले?

रशियाबरोबरच्या भूमिकेची चीनची दुटप्पी भूमिका

सीमाबंदीचा हा निर्णय कोणत्याही देशाच्या व्यापारात अडथळा आणण्यासाठी घेतला गेलेला नाही, असे पोलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते पावेल व्रोन्स्की यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, “बेलारूसमध्ये सध्या अतिशय आक्रमक लष्करी सराव सुरू आहेत. पोलंडला आपल्या पूर्वेकडील सीमेवर धोका जाणवत आहे. त्यामुळे आम्ही व्यापारापेक्षा सुरक्षेलाच अधिक प्राधान्य दिले आहे. जर सीमा सुरक्षित नसेल, तर मुक्त व्यापार करणे कठीण होईल.” चीन नेहमीच शांततेच्या चर्चा आणि सर्व देशांच्या प्रादेशिक अखंडतेचा सन्मान करण्याचे आवाहन करीत आला आहे, ज्यामध्ये अप्रत्यक्षरीत्या युक्रेनचाही समावेश आहे. चीनने रशियावर दबाव टाकला पाहिजे, असे पाश्चिमात्य देशांना नेहमीच वाटते. मात्र, तरीही त्यांनी रशियावर कुठलाही दबाव न टाकता, त्यांच्याबरोबरचे आपले व्यापारी, राजकीय आणि लष्करी संबंध अधिक मजबूत केले आहेत. युक्रेनच्या काही मित्रराष्ट्रांनी चीनवर रशियाला पाश्चिमात्य निर्बंध टाळण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला आहे

पोलंड-बेलारूस संबंधात पुन्हा तणाव

रशियाने २०२२ मध्ये युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर पोलंड आणि बेलारूस यांच्यातील आधीच ताणलेले संबंध आणखी बिघडले आहेत. पोलंडने बेलारूसला लागून असलेल्या आपल्या बहुतांश सीमा आधीच बंद केलेल्या आहेत. गेल्या आठवड्यात बेलारूसच्या प्रसारमाध्यमांनी पोलंडच्या एका नागरिकाला ‘झापद’ लष्करी सरावाशी संबंधित कागदपत्रे बाळगल्याच्या संशयावरून हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केल्याचे वृत्त दिले. त्यानंतर पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी बेलारूसच्या आक्रमक कृतींना पाठिंबा देणाऱ्या एका राजदूताला देशातून हद्दपार करण्याचा इशारा दिला. बेलारूसच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या इशाऱ्याला ‘निरर्थक’ म्हटले. टस्क यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडू शकतात, असे बेलारूसच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.