The Aryans Of Ladakh And Pregnancy Tourism: भारतीय संस्कृतीची भुरळ जगभरात अनेकांना आहे. याच संस्कृतीला जवळून पाहण्यासाठी जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी भारताला भेट देतात. भारतीय सिनेमा, नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा, वास्तू इत्यादी अनेक गोष्टी या पर्यटकांच्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी असतात. मुळातच भारतीय संस्कृती ही आद्य चार संस्कृतींपैकी एक असल्यामुळे या संस्कृतीचे आकर्षण असणं साहजिकच आहे. या सगळ्यात एक दुर्मिळ आणि कमी चर्चिली गेलेली गोष्ट म्हणजे ‘प्रेग्नन्सी टुरिझम’. सध्या या टुरिझमची क्रेझ वाढताना दिसत आहे.

लडाख हे केंद्रस्थान: Pregnancy tourism in Ladakh

‘प्रेग्नन्सी टुरिझम’ हे ऐकल्यानंतर कदाचित असं वाटू शकतं की गरोदर महिला विश्रांतीसाठी जे स्थळ निवडतात त्या स्थळावरील पर्यटन. परंतु वास्तविक चित्र बरंच वेगळं आणि गुंतागुंतीचं आहे. या पर्यटनाचे केंद्रस्थान लडाख आहे. लडाखच्या उंच पर्वतांमध्ये सिंधू नदी आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ वसलेली लहान आणि रांगडं सौंदर्य असणारी हिमालयीन गावं या पर्यटनात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. इतकंच नाही तर त्यांचा थेट संबंध इतिहासाशी असल्यामुळे त्यांना वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. नक्की हे प्रकरण काय आहे? याचा घेतलेला हा आढावा!

आर्यन व्हॅली (फोटो: विकिपीडिया)

शुद्ध आर्य रक्त

लडाखच्या दुर्गम वस्त्यांमध्ये एक जमात आहे, जी स्वतःला शुद्ध आर्यवंशीय मानते. यामागे कुठलाही ठोस पुरावा किंवा या दाव्याला वैज्ञानिक आधार नसतानाही जगभरातील विविध देशातील महिलांना या जमातीने आपल्याकडे आकर्षित केलं आहे. यामागे एक विवाद्य हेतू आहे. या कथित आर्य मानल्या जाणाऱ्या जमातीतील पुरुषांपासून गर्भधारणा करून घेण्यासाठी जगाच्या विविध भागातून महिला येतात. यामागे शुद्ध आर्य रक्त/ वंश ही संकल्पना आहे.

अधिक वाचा: Harappa ‘या’ उत्खननात सापडले, ४००० वर्षे प्राचीन भारतीय मल्टिग्रेन हाय प्रोटिन डाएट लाडू! संशोधन काय सांगते?

आर्य कोण होते?

आजपासून तब्बल ४००० वर्षांपूर्वी आजच्या अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत यांचा समावेश असलेल्या विस्तृत भूभागावर एका संस्कृतीने जन्म घेतला होता. या संस्कृतीतील लोक भाजलेल्या विटांच्या घरात राहात होते. त्यांच्या घरात धान्याची मोठी कोठारे होती. त्यांच्या भाषेचा शोध अद्याप लागलेला नसला तरी ते चित्र-चिन्ह लिपीचा वापर करत असल्याचे अभ्यासक मानतात. इतकेच नाही तर त्यांनी वापरलेले दागिने, वजनं ही त्यांच्या प्रगतीची साक्ष देतात. ही संस्कृती मेसोपोटेमिया, इजिप्त यांसारख्या इतर महान संस्कृतींना समकालीन होती. याच भारतीय संस्कृतीची ओळख हडप्पा, सिंधू किंवा सरस्वती अशी आहे. या संस्कृतीला उध्वस्त करून ज्या टोळीने भारतात वैदिक संस्कृतीच्या स्वरूपात पाय पसरले ती म्हणजे आर्य असे मानले जात होते. जर्मनतज्ज्ञ मॅक्सम्युलरने मध्य आशिया ही आर्यांची मूळ भूमी असल्याचे म्हटले आहे. मध्य आशियातील एका उंच टेकडीवर आर्यांचे स्थान होते असे त्याने नमूद केले होते. त्यामुळे आर्य हे भारताच्या बाहेरून आले आणि मूळ भारतीयांना दास करून त्यांनी राज्य केलं अशीच संकल्पना आजपर्यंत प्रचलित होती.

२०१९ साली झालेल्या राखीगढीच्या उत्खननात सापडलेल्या मानवी हाडांच्या डीएनए चाचणीने इतिहासबदलाचे काम केले आहे. या चाचणीनंतर आर्य किंवा तत्सम टोळी भारताबाहेरून आलेली नव्हती त्याचप्रमाणे, त्यांनी हडप्पा संस्कृती नष्टही केली नाही असं संशोधन मांडण्यात आल. राखीगढी येथे सापडलेल्या मानवी हाडांच्या डीएनएच्या अभ्यासातून हडप्पाकालीन संस्कृतीची आनुवांशिक मुळे इसवी सन पूर्व १०,००० वर्षांपर्यंत मागे जातात. हडप्पाकालीन लोकांचे डीएनए आजतागायत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत आहेत आणि दक्षिण आशियातील बहुसंख्य लोकसंख्या ही त्यांचीच वंशज असल्याचे दिसून येते. आनुवांशिक तसेच आजपर्यंत सांस्कृतिक इतिहासात कोणताही खंड पडलेला नाही, असे सांगणारे हे संशोधन आर्य स्थलांतराच्या सिद्धांताला छेद देणारे आहे. सेल आणि सायन्स या दोन्ही संशोधनपर नियतकालिकांमध्ये या विषयावरील संशोधनाची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. डॉ. वसंत शिंदे हे या संशोधनातील एक प्रमुख होते. त्यांनी नमूद केल्याप्रमाणे आर्य स्थलांतरणाचा सिद्धांत या नवीन संशोधनामुळे खोडून टाकण्यात आला आहे. या संशोधनातून दक्षिण आशियातील स्थानिक लोकांनीच हडप्पा संस्कृती विकसित केली आणि तेच वैदिकजन असल्याचेही सिद्ध होते असे त्यांनी साप्ताहिक ‘लोकप्रभा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

ब्रोकपास: Aryans of Ladakh अलेक्झांडरचे वंशज

प्रेग्नन्सी टुरिझम या पर्यटनाचा संबध हा ब्रोकपास/ब्रोकपा या समुदायाशी आहे. हा समुदाय ज्या खोऱ्यात राहतो, ते खोरं आर्य व्हॅली म्हणून ओळखलं जात. दाह, हानो, डार्चिक आणि गारकोन सारख्या गावांचा यात समावेश होतो. या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. महिला शेतात काम करतात तर पुरुष मुख्यतः जवळच्या लष्करी छावणीत मजूर म्हणून काम करतात, ही चारही गावं सिंधू नदीच्या किनाऱ्यावर वसलेली आहेत. या गावातील रहिवासी स्वतःला ब्रॉग्पास किंवा ड्रॉग्पास म्हणतात. सांस्कृतिकदृष्ट्या आणि आनुवंशिकदृष्ट्या हा समुदाय अलिप्त राहिला आहे. काहीजण या समुदायाचा संबंध अलेक्झांडर द ग्रेटशी जोडतात. तर हा समुदाय आपला संबंध आर्य आणि त्यांच्याशी संबंधित इतिहासाशी जोडतो. या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध क्षेत्रात इस्लाम, बौद्ध धर्म आणि स्थानिक बॉन हे धर्म आढळतात.

लडाखचे आर्य (एक्स्प्रेस फोटो)

शारीरिक वैशिष्ट्ये

हा समुदाय त्यांच्या वेगळ्या शारीरिक गुणधर्मांसाठी ओळखला जातो. हे लोक उंच, निळ्या डोळ्यांचे, गोरे, लांब सरळ नाकाचे असतात. ही वैशिष्ट्ये स्थानिक लडाखच्या मंगोल वंशीय लोकांमध्ये आढळत नाहीत. ही वैशिष्ट्ये मंगोलियन वैशिष्ट्यांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. ब्रोकस्कड ही दाह गावातील रहिवाशांची भाषा आहे, जी लद्दाखी भाषेपेक्षा वेगळी आहे. या कथित आर्य गावांतील लोक बाहेरच्या लोकांशी लग्न करत नाहीत. त्यांची पहिली पसंती गावातच आपापसात लग्न करण्यातच असते. तर दुसरे प्राधान्य इतर आर्य गावातील रहिवाशांना दिले जाते. आर्य जातीची शुद्धता अबाधित ठेवण्यासाठी ते याचे काटेकोर पालन करतात. ते endogamy एंडोगामी पद्धतीचे पालन करतात. अलीकडच्या कालखंडात त्यांच्यात बहुपत्नीत्त्व आढळून आले आहे. मुख्यत्त्वे या गावांमधील हा समुदाय शाकाहारी आहेत. केवळ सण-समारंभाच्या वेळी ते मांसाहार करतात. त्यांचा आहार मुख्यतः दुग्धजन्य आहे. शेतीच्या कामात ते बैल वापरतात, पण गाय आणि बैलाचं मांस भक्षण करत नाहीत. या गावांतील रहिवाशांसाठी मेंढ्या आणि शेळ्या हे सर्वात पवित्र आणि महत्वाचे प्राणी आहेत. ते शुद्ध आर्य वंशाचे असल्याचा दावा करतात. शिवाय ते आपला संबंध अलेक्झांडरच्या सैन्याशी असल्याचेही सांगतात.

अधिक वाचा: बिगबॉस सारखे शो प्रेक्षकांच्या मानसिकतेशी कसे खेळतात?

शुद्धतेच्या शोधात

ब्रोकपास यांनी विवाहाच्या माध्यमातून आपली शुद्धता जपण्याचा प्रत्यत्न केला आहे. याच गोष्टीमुळे युरोपीय आणि अमेरिकन लोक आकर्षित झाले आहेत. २००६ सालच्या, “द आर्यन सागा” या माहितीपटात ब्रोकपास गावांना भेट देणाऱ्या जर्मन महिला दाखवण्यात आल्या होत्या. या कथित आर्य समाजाच्या शुद्ध वंशाच्या वदंतेवर विश्वास ठेवून त्या ब्रोकपास पुरुषांपासून गर्भधारणा करून घेण्यासाठी आल्या होत्या. एका विशिष्ट ध्येयाने या महिलांनी लडाखला प्रवास केला होता. जर्मन स्वतःला शुद्ध वंशाचे समाजात. हिटलर स्वतःला आर्य म्हणवून घेत होता. त्यात लडाखचा हा समाज शुद्ध आर्य वंश असल्याचा दावा करतो. त्यामुळे आपले शुद्धत्त्व टिकवून ठेवण्याकरिता जर्मन महिलांनी हा मार्ग स्वीकारला होता.

लोककथांपासून ते उत्पन्नापर्यन्तचा मार्ग – लडाखमध्ये आर्य असणं हा व्यवसायाचा मार्ग

ब्रोकपास हे भारतातील आर्य असण्याचा दावा मुख्यत्वे लोककथांवर आधारित आहे. या दाव्यांमध्ये वैज्ञानिक प्रमाणिकरणाचा अभाव आहे. त्यांच्या शुद्ध आर्य वंशाच्या दाव्याची पुष्टी करण्यासाठी कोणतीही डीएनए किंवा अनुवांशिक चाचणी घेण्यात आलेली नाही, हा दावा मुख्यतः त्यांची शारीरिक वैशिष्ट्ये आणि परंपरेने चालत आलेल्या कथांवर आधारित आहेत. लडाखमध्ये गर्भधारणा पर्यटनाची सुविधा देणाऱ्या ऑनलाइन एजंट्सनी या कथांचा अधिक प्रसार केला. हे एजंट इच्छुक महिलांना पात्र पुरुषांचे प्रोफाइल देतात, पुरुषांच्या दिसण्यावर महिला पुरुषांची निवड करतात तर पुरुषांच्या दिसण्यावरून त्याचे मूल्य ठरते. या प्रक्रियेमध्ये परदेशी स्त्रिया एखाद्या पुरुषाची निवड करतात. गर्भधारणा होईपर्यंत त्याच्याबरोबर राहतात आणि नंतर गर्भधारणा झाल्यानंतर त्यांच्या देशात माघारी जातात. या समाजातील पुरुषांना मोठ्या प्रमाणात भरपाई दिली जाते, ही भरपाई त्यांच्या उत्पन्नाचे साधन ठरली आहे. स्थायिक स्त्रियांनीही आपल्या पतीचा हा व्यवसाय स्वीकारला आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापरासह ब्रोकपास पुरुषांना जागतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. लडाखमधील प्रेग्नन्सी टुरिझमच्या या वाढत्या व्यवसायात आगाऊ बुकिंगची आवश्यकता असते, यावरून असे लक्षात येते की अधिक पर्यटकांना आकर्षित करणे आणि या गावांसाठी प्रसिद्धी मिळवणे ही स्थानिक किंवा ट्रॅव्हल इंडस्ट्रीची एक धोरणात्मक खेळी असू शकते. त्यामुळे ही खेळी सत्यता, नैतिकता आणि सांस्कृतिक संदर्भ यांच्या मिश्रणातून एक ग्राहक वर्ग निर्माण करते आहे. मूलतः लडाखची ओळख आर्यांचे बीज उत्त्पन्न करणारे ठिकाण अशी मुळीच नाही. या भूमीला लाभलेले निसर्ग सौंदर्य, चित्तवेधी लँडस्केप्स, बौद्ध संस्कृती, निर्मळ-पवित्र मठांपासून ते रांगड्या पर्वतीय खिंडीपर्यंत, लडाखचा प्रत्येक पैलू या प्रदेशाच्या आगळ्यावेगळ्या अस्तित्त्वाची साक्ष देतो.

संदर्भ /references:

Manzoor Ahmad Khan, Pregnancy tourism in Aryan village in Ladakh, International Journal of Multidisciplinary Research and Development, २०१८.

हडप्पा हीच वैदिक संस्कृती- डॉ. वसंत शिंदे, २०१९.