Kidney Cancer Symptoms: किडनींवर कर्करोगाचा घाला पडतो, तेव्हा परिस्थिती किती भयावह होऊ शकते याची कल्पनाच अंगावर शहारे आणते. लघवीत रक्त दिसू लागतं, सततची वेदना आणि थकवा अंग झिजवत नेतात… आणि नकळत आयुष्याचा ताबा हातातून निसटतो. मधुमेह, स्थूलता, उच्च रक्तदाब, धूम्रपान आणि व्यायामाचा अभाव… या सगळ्या टाळता येण्याजोग्या सवयीच आज मूत्रपिंड कर्करोगाचं मोठं कारण ठरल्या आहेत. आपण आत्ताच सावध झालो नाही, तर येत्या दशकांमध्ये या आजाराचं प्रमाण आणि मृत्यूदर दुपटीने वाढेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. भारतात तर परिस्थिती अधिकच चिंताजनक आहे. भारतात रुग्णसंख्या वेगाने वाढतेय पण तज्ज्ञ डॉक्टर आणि उपचारांची सुविधा तुलनेने खूपच कमी उपलब्ध आहे.
किडनीचा कॅन्सर म्हणजे काय?
किडनी (मूत्रपिंड) हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव असून त्याचं मुख्य काम रक्त गाळून त्यातील कचरा, अतिरिक्त पाणी आणि खनिजे (सोडियम, पोटॅशियम इ.) वेगळी करून मूत्राद्वारे बाहेर टाकणं आहे. या प्रक्रियेमुळे शरीरातील द्रव व क्षारांचं संतुलन टिकून राहतं. किडनीचा कर्करोग (Kidney Cancer) म्हणजे मूत्रपिंडातील पेशींची अनियंत्रित वाढ होऊन गाठ (Tumor) तयार होणं. सुरुवातीला ही गाठ लहान असली तरी वेळेत निदान व उपचार न झाल्यास ती पसरत जाऊन जीवघेणी ठरू शकते.
आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेच्या (IARC) ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरीतील आकडेवारीचा युरोप, अमेरिका आणि ब्रिटनमधील संशोधकांनी अभ्यास केला आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष युरोपियन यूरोलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झाले. त्यानुसार, २०२२ साली जगभरात सुमारे ४.३४ लाख नवीन मूत्रपिंड कर्करोग रुग्ण नोंदले गेले, तर या आजारामुळे १.५५ लाखांहून अधिक मृत्यू झाले. ही संख्या गंभीर आहे आणि तज्ज्ञांचा इशारा आहे की, हाच वेग कायम राहिला, तर २०५० पर्यंत नवीन रुग्णसंख्या तब्बल ७.४५ लाखांवर जाईल, म्हणजेच ७२ टक्क्यांची वाढ होईल. मृत्यूदर देखील जवळपास ९६ टक्क्यांनी वाढून ३.०४ लाखांवर जाण्याची शक्यता आहे (संदर्भ: मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे वाढते सावट! येत्या २५ वर्षांत दुपटीने वाढणार मूत्रपिंड कर्करुग्णांची संख्या, लोकसत्ता) .
संशोधनानुसार, भौगोलिक परिस्थिती आणि लिंग यानुसार मूत्रपिंड कर्करोगाच्या रुग्णसंख्येत व मृत्युदरात लक्षणीय फरक आढळतो. विकसित आणि श्रीमंत देशांमध्ये नियमित तपासण्या, उच्च दर्जाची शस्त्रक्रिया, विकिरण उपचार (Radiotherapy) आणि आधुनिक औषधोपचार यांमुळे निदानानंतर रुग्णांचे जगण्याचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. तिथे निदान झालेल्या रुग्णांपैकी ४० ते ७५ टक्के रुग्ण निदानानंतरच्या पाच वर्षांपर्यंत जिवंत राहतात. उलटपक्षी, विकसनशील देशांमध्ये वेळेवर तपासणी व उपचारांचा अभाव असल्याने मृत्यूदर जास्त आहे आणि रुग्णांचे जीवनमान अधिकच खालावलेलं दिसून येतं.
एकंदरीत पाहता, किडनीचा कर्करोग हा तुलनेने दुर्मिळ असला तरी त्याचा धोका झपाट्याने वाढतो आहे.
किडनीच्या कर्करोगाचे प्रकार
किडनी कर्करोगाचे विविध प्रकार असले तरी काही प्रकार हे सर्वाधिक प्रमाणात निदान होतात. प्रत्येक प्रकाराची लक्षणं, प्रादुर्भावाचं प्रमाण आणि उपचारपद्धती वेगळी असते.
१) Renal Cell Carcinoma (RCC)
- हा किडनीच्या कर्करोगाचा सर्वाधिक आढळणारा प्रकार आहे आणि सर्व प्रकारांपैकी सुमारे ८५ ते ९० टक्के रुग्णांमध्ये हाच प्रकार आढळतो.
- RCC मध्ये मूत्रपिंडातील फिल्टर करणाऱ्या सूक्ष्मपेशी (renal tubules) अनियंत्रित वाढ होऊन ट्युमर तयार करतात.
- सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणं बहुधा दिसत नाहीत, पण पुढे मूत्रात रक्त येणं, कंबरेत वेदना, वजन घटणं आणि भूक न लागणं अशी लक्षणं दिसू शकतात.
- हा प्रकार प्रामुख्याने प्रौढांमध्ये आढळतो आणि त्याचा संबंध धूम्रपान, स्थूलता, उच्च रक्तदाब व आनुवंशिक घटकांशी जोडला जातो.
२) Transitional Cell Carcinoma (TCC)
- हा प्रकार तुलनेने दुर्मिळ असला तरी महत्त्वाचा आहे.
- तो मूत्रपिंडाच्या renal pelvis या भागात होतो, हा भाग किडनीला मूत्रवाहिन्यांशी (ureter) जोडतो.
- TCC चं स्वरूप मूत्राशयाच्या कर्करोगासारखं असतं, कारण तो transitional epithelial cells मधून सुरू होतो.
- या प्रकारातही मूत्रात रक्त दिसणं हे सुरुवातीचं लक्षण असू शकतं.
- हा प्रकार पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा अधिक प्रमाणात दिसतो आणि दीर्घकाळ काही रसायनं (उदा. industrial solvents) व धूम्रपान यामुळे त्याचा धोका वाढतो.
३) Wilms Tumor (Nephroblastoma)
- हा किडनी कर्करोगाचा प्रकार लहान मुलांमध्ये (विशेषतः ३ ते ५ वर्षे वयोगटात) दिसतो.
- Wilms Tumor ही बालकांमध्ये निदान होणारी किडनीच्या कर्करोगाची सर्वाधिक समस्या आहे.
- या ट्युमरचं नेमकं कारण पूर्णपणे स्पष्ट नाही, पण आनुवंशिक कारणं आणि जन्मजात विकृती (congenital abnormalities) यामुळे धोका वाढतो.
- लहान मुलांच्या पोटात अचानक गाठ जाणवणं, पोट फुगल्यासारखं दिसणं, भूक कमी होणं, वजन घटणं अशी लक्षणं दिसतात.
- योग्य वेळी निदान झाल्यास Wilms Tumor चा उपचार शस्त्रक्रिया, कीमोथेरपी आणि रेडिओथेरपीच्या संयोगाने केला जातो आणि यशाचं प्रमाण तुलनेने चांगलं आहे.
मूत्रपिंडाचा कर्करोग : जागतिक आणि भारतीय संदर्भ
मूत्रपिंडाचा कर्करोग (Kidney Cancer) हा इतर कर्करोगांइतका व्यापक प्रमाणावर आढळत नसला तरी त्याचे परिणाम अत्यंत गंभीर मानले जातात. कारण या आजाराचे बहुतेक वेळा सुरुवातीच्या टप्प्यात निदान होत नाही आणि रुग्ण डॉक्टरांकडे पोहोचेपर्यंत रोग बराच बळावलेला असतो. त्यामुळे तो एक सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका मानला जातो.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगभरात निदान होणाऱ्या सर्व कॅन्सर प्रकारांपैकी सुमारे २ ते ३ टक्के प्रकार मूत्रपिंडाच्या कर्करोगाशी संबंधित असतात. हा टक्का जरी कमी वाटत असला, तरी संपूर्ण जगभरात वाढणाऱ्या कर्करुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हे प्रमाण चिंताजनक आहे. मूत्रपिंडाचा कर्करोग प्रामुख्याने ५० वर्षांनंतरच्या वयोगटात जास्त प्रमाणात निदान होतो. वृद्धावस्थेत पेशींच्या वाढीवर आणि पुनरुत्पादनावर नियंत्रण कमी होतं, त्यामुळे पेशींच्या अनियंत्रित वाढीचा धोका वाढतो आणि कर्करोग होण्याची शक्यता जास्त होते.
पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत या रोगाचे प्रमाण भारतात सध्या कमी आहे. तरीही गेल्या काही दशकांत भारतात मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब यांसारख्या जीवनशैलीजन्य आजारांत मोठी वाढ झाल्यामुळे मूत्रपिंड कर्करोगाचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. याशिवाय, ग्रामीण आणि निम-शहरी भागांत नियमित तपासणी व निदान सुविधा मर्यादित असल्यामुळे अनेक प्रकरणं उशिरा समोर येतात आणि उपचार जटिल होतात. तसेच निदान झाल्यानंतरही यातून निर्माण होणाऱ्या आजारांविषयी पुरेशी माहिती नसल्यामुळे बहुतेक रुग्ण उपचार घेताना दिसत नाही. सुमारे ५ ते ८ टक्के मूत्रपिंड कर्करोग रुग्ण हे आनुवंशिक कारणांमुळे असतात. भारतात दरवर्षी सुमारे १६ ते १७ हजार नवीन मूत्रपिंड कर्करोग प्रकरणे नोंदवली जातात. पुरुषांमध्ये दर एक लाख लोकसंख्येमागे सुमारे दोन आणि महिलांमध्ये एक असा प्रादुर्भाव आहे.
भारतामध्ये अवयव प्रत्यारोपणाची मागणी किती मोठी आहे, याचा अंदाज राष्ट्रीय अवयव व ऊतक प्रत्यारोपण संस्थेच्या (NOTTO) आकडेवारीतून सहज येतो. सध्या देशभरात दोन लाखांहून अधिक रुग्ण किडनी प्रत्यारोपणासाठी प्रतिक्षेत आहेत. त्याचबरोबर ५० हजारांहून जास्त रुग्ण यकृतासाठी वाट पाहत आहेत. हृदयाच्या प्रत्यारोपणासाठी सुमारे ८ ते १० हजार रुग्ण आणि फुफ्फुसांसाठी जवळपास १,५०० रुग्ण तातडीने दात्याच्या शोधात आहेत. या संकटाचं गांभीर्य मुंबईसारख्या महानगरात अधिक ठळकपणे दिसतं—इथेच सध्या ४,००० हून अधिक रुग्ण केवळ किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत आहेत.
उपचार (Treatment)
- शस्त्रक्रिया (Surgery) – गाठ काढणे किंवा किडनी काढून टाकणे (nephrectomy)
- Targeted therapy – कर्करोग पेशींवर थेट परिणाम करणारी औषधं
- Immunotherapy – शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून कॅन्सरशी लढणं
- Radiation / Chemotherapy – काही केसेसमध्ये वापरलं जातं
किडनीच्या कर्करोगाचे उपचार बहुआयामी असतात. शस्त्रक्रिया सर्वात प्रभावी ठरते, पण आजच्या घडीला targeted therapy आणि immunotherapy मुळे उपचाराच्या संधींमध्ये मोठी वाढ झाली आहे. तज्ज्ञ डॉक्टर रुग्णाची स्थिती, वय आणि रोगाचा टप्पा लक्षात घेऊन उपचारांची योग्य सांगड घालतात.