पहलगाम हल्ला आणि मग ‘ऑपरेशन सिंदूर’ यानंतर भारताने हेरगिरी करणाऱ्या अनेकांच्या मुसक्या आवळल्या. त्यापैकी काही जण यूट्यूबर, शिक्षक, तसेच विद्यार्थी असल्याची माहिती आहे. त्यामध्ये ज्योती मल्होत्राचे नाव मोठ्या प्रमाणात समोर आले. कारण- तिचा संपर्क थेट पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी असल्याचे आढळून आले. ज्योती मल्होत्राला अटक झाल्यानंतर काही दिवसांनी तिच्याच एका मैत्रिणीचे नावही समोर आले. ती म्हणजे प्रियंका सेनापती. प्रियंका हीदेखील एक यूट्यूबरच आहे. ज्योतीच्या सध्या सुरू असलेल्या चौकशीत ओडिशास्थित या ट्रॅव्हल व्लॉगरचं नाव पुढे आले आहे. अशा प्रकारे फोटो, व्हिडीओ आणि एकंदरच सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताची संवेदनशील माहिती पुरवल्याचे समोर आल्यावर भारतीय यंत्रणांनी आता कंटेंट क्रिएटर्सकडे लक्ष वळवले आहे. तर प्रियंका सेनापती कोण आहे आणि तिचा ज्योती मल्होत्राशी काय संबंध आहे याबाबत जाणून घेऊ…

कोण आहे प्रियंका सेनापती?

२१ वर्षीय पुरी येथील रहिवासी असलेली प्रियंका ही विद्यार्थिनी आहे. प्रियंकाचे ज्योतीशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यापूर्वी काही महिने प्रियंका ज्योतीसोबतच अनेक सहलींना गेली होती. या दोघीही पहलगाम येथेही सहलीसाठी गेल्या होत्या. ज्योती मल्होत्राशी संपर्कात असल्याने प्रियंकालाही ताब्यात घेण्यात आले. तीन दिवसांपासून तिची अनेकदा सखोल चौकशी करण्यात आली आहे. गुप्तचर विभाग, ओडिशा पोलीस आणि राज्याच्या फॉरेन्सिक पथकांचे अधिकारी प्रियंका आणि ज्योतीमधील संपर्क किती खोलवर होता हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागच्याच आठवड्यात पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरयाणामधून ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे.

दी न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियंका ही ज्योतीची मोठी चाहती आहे आणि ती तिच्यासारखीच लोकप्रिय होऊ पाहत होती, असे प्रियंकानेच तपासकर्त्यांना सांगितले. प्रियंकाला एक यशस्वी सोशल मीडिया व्यक्तिमत्त्व बनण्याची इच्छा होती. प्रियंका सेनापती prii_vlogs नावाचे यूट्यूब चॅनेल चालवते आणि तिचे १४ हजारांच्या आसपास सबस्क्रायबर्स होते. ज्योती मल्होत्रासोबत फिरून तिच्याप्रमाणेच सबस्क्रायबर्स वाढविण्यासाठी ती उत्सुक होती.

यूट्यूबच्याच माध्यमातून या दोघीही गेल्या वर्षी एकमेकींच्या संपर्कात आल्या. सप्टेंबरमध्ये ज्योती मल्होत्राच्या पुरी भेटीदरम्यान पहिल्यांदा त्यांचा संपर्क झाला. त्यानंतर त्या दोघीही वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र प्रवास करू लागल्या.
ज्योतीच्या अटकेची बातमी पसरल्यानंतर प्रियंकाने त्यावर स्पष्टीकरण दिले. ज्योतीच्या कथित कारवायांबद्दल काहीच माहिती नसल्याचे प्रियंकाने सांगितले. “मला तिच्यावर केल्या गेलेल्या गंभीर आरोपांबाबत पूर्णपणे माहिती नव्हती. मला जर याबाबत माहीत असतं की, ती शत्रुदेशासाठी हेरगिरी करीत आहे, तर मी तिच्याशी कधीच संपर्क ठेवला नसता”, असे प्रियंकाने म्हटले आहे. प्रियंकाने पुढे तिच्या पोस्टमध्ये, “कोणत्याही तपास संस्थेला उलटतपासणी करायची असेल, तर मी पूर्ण सहकार्य करेन. देश सगळ्यापेक्षा वर आहे. जय हिंद”, असेही म्हटले आहे.

सध्या प्रियंकाची गुप्तचर विभाग, ओडिशाच्या गुप्तचर विभागाचे अधिकारी व पुरी पोलिस यांच्याकडून तपासणी सुरू आहे. ज्योतीशी असलेल्या संबंधांबाबत ही चौकशी केली जात आहे. प्रियंकाने आतापर्यंत ज्योतीसोबत जेवढ्या सहली केल्या, त्या सगळ्यांबाबत बारकाईने चौकशी केली जात आहे. देशभरात अनेक ठिकाणी एकत्र प्रवास केल्यामुळे त्यांच्यात घट्ट नाते तयार झाले होते. ज्योतीच्या सोशल मीडिया पेजवर पुरी, काश्मीर व केरळ अशा तिन्ही ठिकाणांचे अनेक फोटो आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ज्योतीने ओडिशाला भेट दिली होती. त्यादरम्यान प्रियंकाने तिच्यासोबत कोणार्क येथील जगन्नाथ मंदिर व सूर्य मंदिर या प्रमुख स्थळांना भेट दिली होती. ती तिच्या यूट्यूब व्हिडीओंमध्येही दिसली आहे.

प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या जगन्नाथ मंदिरावर ड्रोन उडविल्याबद्दल ज्योतीला काही काळासाठी ताब्यात घेण्यात आले होते. ‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियंकाच्या हस्तक्षेपामुळे तिला नंतर सोडण्यात आले. त्याशिवाय प्रियंकाने ज्योतीला संवेदनशील ठिकाणी प्रवेश मिळवून देण्यास मदत केल्याचे म्हटले जाते. पुरीमध्ये ज्योती जगन्नाथ भक्ती निवास अतिथिगृहात थांबली होती. त्या ठिकाणीही गुप्तचर अधिकारी चौकशी करीत आहेत.

ज्योतीच्या पुरीमधील कारवाया शोधण्याचा आणि ती कोणत्याही संशयास्पद व्यक्तीच्या संपर्कात आली होती का याबाबतही पोलीस सध्या तपास करीत आहेत. प्रियंकाचा संशय येण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे ती कर्तारपूर कॉरिडॉरमार्गे पाकिस्तानला गेली होती. २५ मार्च रोजी तिने या पाकिस्तान भेटीचा एक व्हिडीओही अपलोड केला होता.
प्रियंकाची ही सहल साधारण होती आणि ती सर्व कागदपत्रांसह तिथे गेली होती, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे. मात्र, अशा संवेदनशील ठिकाणी सहलीला जाण्यासंदर्भात गुप्तचर विभाग तिचा तपास करीत आहे. “आम्ही या महिलेच्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटी आणि त्या सहलींशी संबंधित आर्थिक व्यवहारांची तपासणी करीत आहोत,” असे पुरीचे पोलीस अधीक्षक विनीत अग्रवाल यांनी ‘द हिंदू’ला सांगितले.

प्रियंकाला अटक करण्यात आली नसली आणि तिच्याविरुद्ध अद्याप कोणतेही थेट पुरावे समोर आले नसले तरीही पुरी येथील तिच्या घरावर देखरेख ठेवण्यात आली आहे. तिच्या कुटुंबाने पूर्ण सहकार्य केले आहे. तिने तिचे सर्व डिजिटल डिव्हाइस आणि आर्थिक नोंदी अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी दिल्या आहेत. दरम्यान, प्रियंकाने केलेले अनेक अपलोड काढून टाकण्यात आले आहेत आणि तिने तिचे खाते खासगी केल्यामुळे सोशल मीडियावरील तिच्या हालचालींमध्ये लक्षणीय घट झाली आहे.