Russia Pakistan Fighter Jet Engines Deals : भारताच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून रशियाकडून पाकिस्तानला अत्याधुनिक लढाऊ विमानांसाठी इंजिन पुरवली जाणार असल्याचा दावा काँग्रेसने केला. केंद्र सरकारने रशियाशी संबंध बिघडवल्याचा आरोप काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केला. भाजपाने मात्र हा आरोप खोटा आणि दिशाभूल असल्याचे सांगत तो फेटाळून लावला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा दावा खरा की खोटा? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. रशियाकडून खरंच पाकिस्तानला लढाऊ विमानांच्या इंजिनचा पुरवठा केला जाणार का? याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात? त्या संदर्भातील हा आढावा…

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवीत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. या मोहिमेत भारताच्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची ताकद सगळ्या जगाने पाहिली. ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आता आपली संरक्षण यंत्रणा मजबूत करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी पाकिस्तान आपल्या ताफ्यातील लढाऊ विमानांसाठी रशियन बनावटीच्या इंजिनची खरेदी करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे रशियानेही पाकिस्तानला हिरवा कंदील दाखवला असून इंजिनचा पुरवठा करण्यास सहमती दर्शवल्याचे सांगितले जात आहे. सध्या दोन्ही देशांमधील त्या संदर्भातील करार होत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

रशियाकडून इंजिन खरेदी करण्यास पाकिस्तान उत्सुक

पाकिस्तानच्या हवाई दलात असलेले जेएफ-१७ हे चिनी बनावटीचे अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. या विमानाला उड्डाणासाठी रशियन इंजिनवर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे पाकिस्तान हा रशियाकडून लढाऊ विमानाचे इंजिन खरेदी करण्यास उत्सुक आहे. दुसरीकडे भारताने मात्र त्यावर आक्षेप घेतला असून पाकिस्तानला इंजिनचा पुरवठा करू नये, असे आवाहन रशियाला केले आहे. मात्र, भारताची विनंती धुडकावून रशियाने पाकिस्तानला मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसने याच मुद्द्याला हाताशी धरून केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.

आणखी वाचा : Sambhal Mosque Demolition : बुलडोझर कारवाईच्या भीतीने मुस्लिमांनी स्वतःच पाडली मशीद; संभलमध्ये नेमकं काय घडलं?

काँग्रेसचा केंद्र सरकारवर नेमका आरोप काय?

काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी शनिवारी पाकिस्तान व रशिया यांच्यातील कथित करारासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली. “रशिया हा भारताचा एकेकाळचा विश्वासू भागीदार होता. आता तो पाकिस्तानला लढाऊ विमानांच्या इंजिनचा पुरवठा करणार आहे. हे मोदी सरकारचे अपयश असून केंद्र सरकारने त्याबाबत स्पष्टता द्यायला हवी”, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. “रशियाकडून पाकिस्तानला पुरवण्यात येणारे इंजिन चिनी बनावटीच्या जेएफ-१७ या लढाऊ विमानांसाठी वापरली जाणार आहेत. एकीकडे भारताची रशियाबरोबर व्यापार कराराची चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्याच रशियाकडून पाकिस्तानला मदत दिली जाणे हे केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश दर्शवते”, अशी टीका जयराम रमेश यांनी केली. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकीयदृष्ट्या एकाकी पाडण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेसच्या आरोपांना भाजपाने कसे दिले प्रत्युत्तर?

रशिया आणि पाकिस्तान यांच्यातील संरक्षण कराराबाबत काँग्रेसने केलेला आरोप भाजपाने फेटाळून लावला. “काँग्रेसकडून अपप्रचार केला जात असून रशियाने अशा सर्व दाव्यांना स्पष्टपणे नकार दिला आहे. जयराम रमेश यांनी ज्या बातमीच्या आधारावर हा दावा केला, ती बातमी एका अप्रसिद्ध वेबसाइटवरून प्रसिद्ध झाली आहे. ही वेबसाईट प्रो-पाकिस्तान प्रोपगंडा पसरवण्यासाठी ओळखली जाते. कोणताही अधिकृत स्रोत आणि कोणतीही विश्वसनीय पुष्टी नसताना विरोधकांकडून हा चुकीचा दावा केला जात आहे. काँग्रेस वारंवार अशा खोट्या बातम्यांच्या माध्यमातून राष्ट्रहिताऐवजी विरोधकांच्या बाजूने उभी राहते,” असा पलटवार भाजपाचे प्रवक्ते अमित मालवीय यांनी केला.

‘रशिया-पाकिस्तान कराराचा भारताला फायदा’

रशियाने पाकिस्तानला ‘जेएफ-१७’ या लढाऊ विमानांसाठी ‘आरडी-९३’ इंजिनांची विक्री करण्याचा भारतालाच फायदा होईल, असा दावा रशियाच्या संरक्षणतज्ज्ञांनी केला. रशिया-पाकिस्तानदरम्यान झालेल्या या व्यापार करारावरून भारतातील विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीका करणे अनाठायी असल्याचे मत या तज्ज्ञांनी व्यक्त केले. मॉस्कोस्थित ‘प्रिमकोव्ह इन्स्टिट्यूट’ या प्रतिष्ठित संस्थेतील अभ्यासक प्योत्र तोपिश्कानोव्ह म्हणाले की, या कराराचा भारताला दोन प्रकारे फायदा होईल. एक म्हणजे चीन आणि पाकिस्तान या इंजिनांची जागा घेईल. दुसरे, ही इंजिने बसवल्यावर पाकिस्तानच्या विमानांच्या हालचाली भारतासाठी अपरिचित असणार नाहीत, कारण भारताने ऑपरेशन सिंदूरदरम्यान वापरलेल्या लढाऊ विमानांमध्ये ‘आरडी-९३’ इंजिन होते.

हेही वाचा : France Government Collapse : गेल्या दोन वर्षांत पाचव्यांदा कोसळले फ्रान्समधील सरकार; कारण काय?

रशिया खरंच पाकिस्तानला मदत करणार का?

रशियातील अन्य एका अभ्यासकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, रशियाने या व्यवहारासंदर्भात भारताचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही पाकिस्तानला केवळ इंजिन देत असून तंत्रज्ञान नाही, असे रशियाने म्हटले होते. दरम्यान, पाकिस्तानला लढाऊ विमानांसाठी इंजिनचा कुठलाही पुरवठा केला जाणार नसल्याचे रशियन सूत्रांनी स्पष्ट केले आहे. रशिया पाकिस्तानला जेएफ-१७ विमानांसाठी इंजिनचा पुरवठा करणार असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे एका रशियन वृत्तवाहिनीने म्हटले आहे. डिसेंबरमध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याआधीच रशिया-पाकिस्तान यांच्यातील कथित करारावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले आहे, त्यामुळे या करारासंदर्भात आणखी काय गोष्टी समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.