आजकाल अनेकांना विदेशात जाऊन शिकण्याची इच्छा असते. कॅनडा हे गेले कित्येक दशकांपासून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे लोकप्रिय ठिकाण आहे. दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी कॅनडामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात. इतर देशांच्या तुलनेत कॅनडामधील शिक्षण आणि राहण्याचा खर्च कमी आहे, त्यामुळे विदेशात शिक्षण म्हटलं तर भारतीय विद्यार्थी कॅनडाला प्राधान्य देतात.

परंतु, आता अनेक भारतीय विद्यार्थी स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसा किंवा टुरिस्ट व्हिसावर कॅनडाला जात आहेत. कॅनडाने या वर्षाच्या सुरुवातीला परदेशी विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित केली आहे, त्यामुळे व्हिजिटर व्हिसावर कॅनडामध्ये प्रवेश केल्यानंतर विद्यार्थी स्टडी परमिटसाठी अर्ज करत आहेत. यामागील नेमके कारण काय? पूर्वीच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा मिळविण्यात अडचणी येतील का? पर्याय काय? याबद्दल जाणून घेऊ या.

भारतीय विद्यार्थी स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसा किंवा टुरिस्ट व्हिसावर कॅनडाला जात आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : विश्लेषण : कॅनडाकडून दोन वर्षांसाठी विद्यार्थी व्हिसात कपात करण्याचा निर्णय; भारतीय विद्यार्थ्यांवर परिणाम होणार?

विद्यार्थ्यांना कॅनेडियन स्टडी व्हिसा मिळणे कठीण

पंजाबमधील अनेक शैक्षणिक सल्लागारांच्या असे लक्षात आले आहे की, कॅनडाने जानेवारी २०२४ मध्ये लागू केलेल्या काही नियमांमुळे या वर्षी अनेक विद्यार्थी व्हिजिटर व्हिसासाठी अर्ज करत आहेत. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने आधी वृत्त दिल्याप्रमाणे, परदेशी विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे संसाधनांवर ताण आला आहे. त्यामुळे कॅनडा सरकारने २०२३ च्या तुलनेत ३५ टक्के व्हिसाच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे २०२४ या वर्षासाठी कॅनडा सरकारकडून केवळ तीन लाख ६० हजार परदेशी विद्यार्थ्यांनाच व्हिसा मिळण्याची शक्यता आहे. हा निर्णय पुढील दोन वर्षांसाठी घेण्यात आला आहे.

विद्यार्थी व्हिसा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या विद्यार्थ्यांना आता त्यांचे महाविद्यालय किंवा विद्यापीठ जेथे स्थित आहे, त्या प्रांत/प्रदेशांद्वारे जारी केलेले अनिवार्य प्रमाणीकरण पत्र आवश्यक असणार आहे. सरकारकडून विविध प्रांतांना ठराविक संख्येने प्रमाणीकरण पत्रांचे वाटप केले जाते. परंतु, प्रमाणीकरण पत्रांची आवश्यकता पदव्युत्तर अभ्यासक्रमांना लागू होत नाही.

२०२४ या वर्षासाठी कॅनडा सरकारकडून केवळ तीन लाख ६० हजार परदेशी विद्यार्थ्यांनाच व्हिसा मिळण्याची शक्यता आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

विद्यार्थी व्हिसा मिळण्यात विलंब

प्रमाणीकरण पत्र वेळेत मिळत नसल्याने काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या विद्यार्थी व्हिसासाठी मंजुरी मिळण्यास विलंब होत असल्याची तक्रार नोंदवली आहे. नवीन नियमांमुळे कॅनडाला शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा होण्याचीही शक्यता आहे. कारण व्हिसाच्या संख्येत कपात केल्यामुळे इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टम (IELTS) आणि इंग्लिश पिअर्सन टेस्ट (PTE) सारख्या इंग्रजी प्रवीणता चाचण्यांमध्ये चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्वीकारले जाण्याची शक्यता जास्त आहे.

“काही एजंट दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत. कॅनडासाठी विद्यार्थी व्हिसा मिळणे खूप अवघड आहे आणि आता विद्यार्थी व्हिसा जारी केला जात नाही, असे सांगून ते विद्यार्थ्यांना व्हिजिटर व्हिसावर देशात प्रवेश करण्याचा आणि नंतर स्टडी परमीट मिळविण्याचा सल्ला देत आहेत”, असे जालंधर येथील एका सल्लागाराने सांगितले. विद्यार्थी व्हिसा मिळवण्याच्या अडचणींबद्दल अशीच चुकीची माहिती पंजाबमधील मोठ्या शहरांमध्ये सल्लागारांद्वारे पसरवली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे कायदेशीर आहे का?

अनेक सल्लागारांचे म्हणणे आहे की, व्हिजिटर व्हिसावर कॅनडामध्ये प्रवेश करणारा विद्यार्थी नंतर शिक्षणाच्या परवानगीसाठी अर्ज करू शकतो. भारतातील विद्यार्थी व्हिसा प्रक्रियेसाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागतो, मात्र त्या देशात जाऊन परवानगी मिळवायची असेल, तर अर्ज मंजूर होण्यास १२ ते १३ आठवड्यांचा कालावधी लागतो; त्यामुळे बहुतांश विद्यार्थी आता याचाच अवलंब करताना दिसत आहेत.

“माझ्या भावाने कॅनडामध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्याने मला व्हिजिटर व्हिसावर त्याच्याकडे येण्यास सांगितले आहे. मी तिथे पोहोचल्यानंतर स्टडी परमिटसाठी अर्ज करू शकेन”, असे जालंधरमधील विद्यार्थी राजदीप सिंग यांनी सांगितले. पंजाबमधील IELTS केंद्र चालवणारे सल्लागार गुरप्रीत सिंग म्हणाले की, या प्रक्रियेमुळे त्यांचा वेळ वाचत असल्याचे कारण देत, अनेक विद्यार्थी व्हिजिटर व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधत आहेत.

व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाणे किती योग्य?

काही सल्लागारांचे सांगणे आहे की, ही प्रक्रिया कायदेशीर असल्याने आणि विद्यार्थ्यांना कॅनडामध्ये प्रवेश करण्याची मुभा असल्याने विद्यार्थी या मार्गाचा विचार करू शकतील. परंतु, काही सल्लागारांनी याचा विरोध केला. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विद्यार्थी व्हिसासाठी थेट अर्ज करावा, यामुळे प्रवेश मिळण्याची शक्यता जास्त आहे. सर्व देशांनी हळूहळू नवीन नियमांच्या अनुषंगाने प्रमाणीकरण पत्रे देणे सुरू केले आहे, त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सोपी होत आहे. या प्रक्रियेने विद्यार्थी व्हिसा मिळण्याचा कालावधी लवकरच कमी होऊ शकतो.

जालंधरच्या जैन ओव्हरसीज या IELTS केंद्रातील सल्लागार सुमित जैन यांनी सांगितले की, कॅनडामध्ये व्हिजिटर व्हिसाद्वारे प्रवेश करणार्‍या आणि नंतर तेथे अभ्यासाची परवानगी मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारताप्रमाणेच अर्ज प्रक्रिया करावी लागेल. यात नियुक्त शिक्षण संस्थेकडून (DLI) स्वीकृतीचा पुरावा मिळवणे महत्त्वाचे आहे. कॅनेडियन सरकारच्या इमिग्रेशन वेबसाइटनुसार, DLI ही एक शैक्षणिक संस्था आहे. ही संस्था सरकारने परदेशी विद्यार्थ्यांसाठी तयार केली आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य दाखवून DLI मध्ये नावनोंदणी करावी लागते, त्यानंतर त्यांना अर्ज मंजूर होण्याची वाट पहावी लागते.

हेही वाचा : स्वस्तिकचा हिटलरशी संबंध कसा आला? स्वित्झर्लंडला या चिन्हावर बंदी का आणायची आहे?

जैन पुढे म्हणाले की, व्हिजिटर व्हिसासाठी अर्ज करणे हा एक खर्चिक मार्ग आहे. तसेच कॅनडातून अर्ज करणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांसाठीही व्हिसा संख्येची मर्यादा लागू होईल. विद्यार्थी व्हिसासाठी अर्ज करणे उचित असल्याचे त्यांनी सांगितले.