हिंदू संस्कृतीत स्वस्तिक चिन्हाला विशेष स्थान आहे. स्वस्तिक चिन्ह मांगल्य आणि पावित्र्याचे प्रतीक मानले जाते. संस्कृतमध्ये या चिन्हाचा अर्थ सौभाग्याशी जोडला जातो. कोणत्याही मंगल प्रसंगी, पूजा-अर्चनेदरम्यान कलशावर किंवा रांगोळी स्वरूपात हे चिन्ह रेखाटले जाते. नेपाळ, भूतानसारख्या देशांतही या चिन्हाला शुभ मानले जाते. परंतु, अनेक देश असेही आहेत; जे या चिन्हाच्या विरोधात आहेत. स्वित्झर्लंडमधील लोकप्रतिनिधींनी स्वस्तिक चिन्हावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

स्वित्झर्लंडमध्ये लवकरच या चिन्हावर बंदी घालण्यात येणार आहे. यापूर्वीदेखील जर्मनी, पोलंड आणि अगदी ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी स्वस्तिक चिन्हावर बंदी घातली आहे. कारण – या चिन्हाचा संबंध थेट नाझीवादाशी जोडला जातो. त्यामुळे वर्णद्वेषी आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणार्‍या या नाझीवादी चिन्हावर स्वित्झर्लंडसारख्या अनेक देशांना बंदी आणायची आहे. या स्वस्तिक चिन्हाचा इतिहास काय? मांगल्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे हे चिन्ह द्वेषाचे प्रतीक म्हणून कसे ओळखले जाऊ लागले? स्वस्तिक चिन्ह हुकूमशहा हिटलरशी कसे जोडले गेले? स्वित्झर्लंडला या चिन्हावर बंदी का आणायची आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

two new US-India agreements
भारत आणि अमेरिकेने संरक्षण करारावर केली स्वाक्षरी; काय आहेत दोन नवीन करार? याचा भारताला कसा फायदा होणार?
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Islamic state marathi news
विश्लेषण: जर्मनीतील चाकू हल्ल्यामागे ‘इस्लामिक स्टेट’चा हात? ही संघटना युरोपात हातपाय पसरतेय का?
Prime Minister Narendra Modis visit to Poland and Ukraine is for the future
मोदींची पोलंड, युक्रेन भेट ‘मध्यस्थी’साठी नव्हे… भवितव्यासाठी!
What are the reasons for slow internet speed in Pakistan
पाकिस्तानात इंटरनेटचा वेग मंदावल्याने हाहाकार… कारणे काय? परिणाम काय?
monkeypox india
भारतात मंकीपॉक्सची साथ कधी आली होती? यंदा या विषाणूचा सामना करण्यासाठी भारत तयार आहे का?
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles readers reaction on loksatta
लोकमानस : युक्रेनने केले ते योग्यच!
ukraine tanks kursk
युक्रेनच्या आक्रमणाला ब्रिटिश रणगाड्यांची कुमक; रशियात तणाव
स्वित्झर्लंडमधील संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील लोकप्रतिनिधींनी स्वस्तिक चिन्हावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : Adolf Hitler: नरेंद्र मोदी सरकारने मान्य केलेल्या ‘आर्यां’चे हिटलरलाही आकर्षण होते, नेमकं कारण काय?

स्वस्तिक चिन्हाचा इतिहास

स्वस्तिक हा शब्द संस्कृतमधील ‘स्वस्तिक’पासून आला आहे; ज्याचा अर्थ आशीर्वाद किंवा सौभाग्य असा होतो. आजही हिंदू, जैन व बौद्ध या धर्मांमध्ये या चिन्हाला मांगल्याचे प्रतीक मानले जाते. या चिन्हाचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे. हे चिन्ह अगदी ख्रिश्चन धर्मीयांच्या थडग्यापासून ते रोमच्या कॅटाकॉम्ब्सपर्यंत आणि लालिबेला रॉक-हेवन चर्चपासून कॉर्डोबाच्या कॅथेड्रलपर्यंत सर्वत्र आढळून आले आहे. ‘होलोकॉस्ट एनसायक्लोपीडिया’नुसार, “हे चिन्ह कदाचित सात हजार वर्षांपूर्वी युरेशियामध्ये पहिल्यांदा वापरण्यात आले. प्राचीन समाजात हे चिन्ह कल्याणाचे प्रतीक म्हणून आणि आकाशातून सूर्याची हालचाल दर्शविणारे चिन्ह म्हणून ओळखले जायचे.”

ख्रिश्चन धर्मीयांच्या थडग्यापासून ते रोमच्या कॅटाकॉम्ब्सपर्यंत स्वस्तिक चिन्ह आढळून आले आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हिंदू धर्मात ऋग्वेदातील प्रार्थनांमध्ये स्वस्तिक चिन्हाचा वापर केला गेलाय. हिंदू तत्त्वज्ञानात असा सिद्धांत आहे की, या चिन्हाची चार भागांची रचना विविध गोष्टींचे प्रतिनिधित्व करते, जसे की, जीवनाची चार उद्दिष्टे, जीवनाचे चार टप्पे व चार वेद. बौद्ध धर्मीयांमध्ये या चिन्हाला मंजी म्हणून ओळखले जाते. हे चिन्ह भगवान गौतम बुद्धांच्या पाऊलखुणा दर्शविते. जैन धर्मीयांसाठी या चिन्हाचा अर्थ आध्यात्मिक गुरू, असा होतो. झोरास्ट्रीयन म्हणजेच पारसी धर्मात स्वस्तिक चिन्ह जल, अग्नी, वायू व पृथ्वी या चार घटकांचे प्रतिनिधित्व करते.

भारतात घराचे प्रवेशद्वार किंवा दुकानाचे दार यावर स्वस्तिक काढलेले दिसते. विवाहसोहळे, सण, दुकान किंवा घराचे वास्तुपूजन यांसारख्या सर्व शुभ प्रसंगी स्वस्तिक चिन्ह काढले जाते. असे सांगण्यात येते की, सुरुवातीच्या काळात पाश्चात्त्य देशांतील नागरिक जेव्हा भारतात आले तेव्हा ते स्वस्तिक चिन्हापासून प्रेरित झाले आणि त्यांनी आपल्या देशांतही हे चिन्ह वापरण्यास सुरुवात केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस स्वस्तिक जगभरात शुभ आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाऊ लागले.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस स्वस्तिक जगभरात शुभ आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाऊ लागले. (छायाचित्र-रॉयटर्स)

यूएस ग्राफिक डिझाइन लेखक स्टीव्हन हेलर यांनी ‘बीबीसी’ला सांगितले की, हे चिन्ह पाश्चिमात्य देशांनी उत्साहाने स्वीकारले. ते म्हणाले, “कोका-कोलाने हे चिन्ह वापरले. त्यासह कार्ल्सबर्गने त्यांच्या बीअरच्या बाटल्यांवर याचा वापर केला. बॉय स्काउट्सने हे चिन्ह वापरले आणि गर्ल्स क्लब ऑफ अमेरिकाने त्यांच्या मासिकाला स्वस्तिक हे नाव दिले. मासिकाच्या प्रती विकल्याबद्दल ते बक्षीस म्हणून त्यांच्या वाचकांना स्वस्तिक बॅजदेखील पाठवायचे.” ते पुढे म्हणाले की, पहिल्या महायुद्धादरम्यान अमेरिकन सैन्याने याचा वापर केला होता आणि १९३९ पर्यंत रॉयल एअर फोर्सच्या विमानांमध्येदेखील हे चिन्ह वापरण्यात आल्याचे आढळले.

स्वस्तिक चिन्ह हिटलरशी कसे जोडले गेले?

जेव्हा हिटलरने या चिन्हाचा स्वीकार केला, तेव्हापासून पश्चिमेकडील देशांमध्ये हे चिन्ह नाझीवादाचे प्रतीक म्हणून ओळखले जाऊ लागले. ॲडॉल्फ हिटलरने १९२० मध्ये या चिन्हाची रचना बदलून, ते नॅशनल सोशालिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी (नाझी पार्टी) या पक्षाचे प्रतीक म्हणून स्वीकारले. स्वस्तिक चिन्हातील ठिपके वगळून आणि चिन्ह उजव्या दिशेने थोडे झुकवून, त्याने या चिन्हाला जर्मनीचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारले असल्याचे इतिहासकार सांगतात.

हिटलरने आपले आत्मचरित्र ‘माइन काम्फ’ अर्थात माझा लढा या पुस्तकात, आपल्या पक्षासाठी हे चिन्ह कसे आणि का निवडले याची रूपरेषा दिली. त्याने लिहिले, “लाल रंग हे सामाजिक चळवळीचे, तर पांढरा रंग राष्ट्रवादाचे प्रतीक आहे आणि स्वस्तिक आर्य योद्ध्यांचे लक्ष्य आहे.” नाझी चळवळीच्या भवितव्याचे चिन्ह शोधत असताना स्वस्तिक हे चिन्ह त्याच्या दृष्टिपथात आले आणि त्याने या चिन्हाची निवड केली. अशा प्रकारे स्वस्तिक हे चिन्ह धार्मिक संदर्भापासून वेगळे झाले.

हिटलरने या चिन्हाचा स्वीकार केला, तेव्हापासून पश्चिमेकडील देशांमध्ये हे चिन्ह नाझीवादाचे प्रतीक म्हणून ओळखले जाऊ लागले. (छायाचित्र-रॉयटर्स)

हिटलरने या चिन्हाची निवड केल्यामुळे आणि या चिन्हाच्या इतिहासामुळे भारतीय आणि जर्मन एकाच आर्य वंशातील असल्याचा समजही जर्मनांमध्ये निर्माण झाला. अनेकांचा असा विश्वास आहे की, स्वस्तिकचा जर्मनीशी असणारा संबंध जर्मन पुरातत्त्व शास्त्रज्ञ हेनरिक श्लिएमान यांनी शोधून काढला. त्यांनी १८७१ मध्ये तुर्कीमधील प्राचीन ट्रॉय शहरात उत्खनन केले. या उत्खननात त्यांनी १८०० पेक्षा जास्त विवरणे शोधून काढली; ज्यावर स्वस्तिकसारखी रचना असलेले चिन्ह रेखाटले होते. अशाच प्रकारची रचना जर्मनीतील मातीच्या भांड्यांवरदेखील आढळून आली होती. त्यामुळे श्लिएमान यांनी असा निष्कर्ष काढला की, स्वस्तिक हे त्यांच्या पूर्वजांचे धार्मिक प्रतीक आहे, असे इतिहासकार माल्कम क्वीन यांनी त्यांच्या १९९४ च्या ‘द स्वस्तिक : कन्स्ट्रक्टिंग द सिम्बॉल’ या पुस्तकात लिहिले आहे.

१९३३ मध्ये हिटलरचा प्रचारमंत्री जोसेफ गोबेल्स याने एक कायदा केला आणि या चिन्हाचा अनधिकृत व्यावसायिक वापर प्रतिबंधित केला. त्यानंतर हे चिन्ह नाझींनी ज्यूंवर केलेल्या अत्याचारांशी जोडले गेले आणि दुष्ट प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून ओळखले जाऊ लागले. ध्वजांपासून लष्करी बॅजपर्यंत सर्वत्र हे चिन्ह दिसू लागले. होलोकॉस्ट सर्व्हायव्हर फ्रेडी नॉलर यांनी ‘बीबीसी’ला सांगितल्याप्रमाणे, “ज्यू लोकांसाठी स्वस्तिक हे भीती, दडपशाही व संहाराचे प्रतीक आहे.” हीच भावना उत्तर अमेरिकेच्या ‘ज्यू फेडरेशन ऑफ होलोकॉस्ट सर्व्हायव्हर केअर’चे व्यवस्थापकीय संचालक शेली रुड वेर्निक यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “मी स्वस्तिकला द्वेषाचे प्रतीक मानतो.”

पाश्चात्त्य देशांमध्ये या चिन्हाला द्वेषाचे प्रतीक मानले जाते. (छायाचित्र-रॉयटर्स)

स्वित्झर्लंडमध्ये यावर बंदी घालण्याचा निर्णय का घेण्यात आला?

बुधवारी (१७ एप्रिल), संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील लोकप्रतिनिधींनी तटस्थ देशातील हिंसाचाराला प्रोत्साहन देणार्‍या प्रतीकांवर कारवाईचा एक भाग म्हणून स्वस्तिकसह नाझी चिन्हांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मंजूर केला. न्यायमंत्री बीट जॅन्स यांनी संसदेत सांगितले की, वांशिक भेदभाव, हिंसक, अतिरेकी व विशेषत: राष्ट्रीय समाजवादी चिन्हांना आपल्या समाजात स्थान नाही आणि ती सार्वजनिक ठिकाणी वापरली जाऊ नयेत.

ऑस्ट्रेलियामधील न्यू साउथ वेल्स आणि व्हिक्टोरियाने २०२२ मध्ये स्वस्तिक चिन्हाच्या वापरावर बंदी आणली होती. (छायाचित्र-रॉयटर्स)

स्वस्तिकच्या वापरावर बंदी घालणाऱ्या जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया व लिथुआनियासारख्या देशांमध्ये स्वित्झर्लंडचाही समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलियामधील न्यू साउथ वेल्स आणि व्हिक्टोरियाने २०२२ मध्ये स्वस्तिक चिन्हाच्या वापरावर बंदी आणली. अनेकांनी या बंदीला विरोध केला. काहींनी असेही म्हटले की, स्वस्तिक हे चिन्ह हिटलरने जर्मनीमध्ये वापरलेल्या ‘हकेनक्रेज’ चिन्हापेक्षा वेगळे आहे. न्यूयॉर्क येथील बौद्ध धर्मगुरू रेव्हरंड टी.के. नाकागाकी यांचे म्हणणे आहे की, केवळ हिटलरमुळे तुम्ही या चिन्हाला वाईटाचे प्रतीक म्हणू शकत नाही किंवा शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या इतर तथ्यांना नाकारू शकत नाही.

क्वीन्सटाउनमधील रहिवासी शीतल देव यांना २०२२ मध्ये दिवाळीच्या सजावटीत वापरलेले स्वस्तिक हटविण्यास सांगितले गेले होते. त्यांनी ‘एपी’ला सांगितले की, माझ्यासारख्या इतरांना हे पवित्र चिन्ह वापरल्यास माफी मागण्याची गरज नाही. कारण – आमच्या धर्मात या चिन्हाला विशेष स्थान आहे. अँटी-डिफेमेशन लीगच्या सेंटर ऑन एक्स्ट्रिमिझमचे वरिष्ठ संशोधन सहकारी मार्क पीटकेवेज यांनी ‘एपी’ला सांगितले, “स्वस्तिक चिन्हाचा वापर हिटलरने हिंसक घटनांमध्ये केला. पाश्चिमात्य देशातील लोकांमध्ये ही गोष्ट इतकी रुजली आहे, की स्वस्तिक चिन्हाकडे नकारात्मकतेने बघितले जाते. मला वाटत नाही की, स्वस्तिक चिन्हाचा नाझींशी असणारा संबंध पूर्णपणे काढून टाकला जाऊ शकतो.”

हेही वाचा : विश्लेषण: स्वस्तिक: मांगल्य ते रक्तरंजित इतिहास व्हाया अ‍ॅडॉल्फ हिटलर

पाश्चात्त्य देशांमध्ये अजूनही स्वस्तिक चिन्ह हिटलरच्या कार्यकाळाशी जोडले जाते. हिटलरच्या पराभवानंतर युरोपियन देशांमध्ये स्वस्तिक चिन्हावर बंदी घालण्यात आली होती. आजही स्वतःला हिटलरचे आणि नाझीवादाचे समर्थक म्हणून घेणारे काही गट या चिन्हाचा वापर करताना दिसतात.