उंच आहेत त्यांना कर्करोग (कॅन्सर) होण्याचा धोका सर्वांत जास्त असतो, असे ‘वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड’ने दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालात कर्करोगाच्या प्रकरांविषयीही सांगण्यात आले आहे. त्यात स्वादुपिंड, मोठे आतडे, गर्भाशय (एंडोमेट्रियम), अंडाशय, किडनी, मूत्रपिंड, त्वचा (मेलेनोमा) व स्तन या कर्करोगाच्या प्रकारांचा समावेश आहे. उंच लोकांना कर्करोगाचा सर्वाधिक धोका का आहे? त्यातून त्यांना स्वतःचा बचाव करता येणे शक्य आहे का? याबाबत जाणून घेऊ.

तुम्ही जितके उंच तितका धोका अधिक

‘यूके मिलियन वूमन’च्या अभ्यासात त्यांनी तपासलेल्या १७ पैकी १५ कर्करोगाच्या रुग्णांमध्ये उंची आणि कर्करोगाचा संबंध दिसून आला. तुमची उंची जितकी जास्त असेल तितका तुम्हाला कर्करोगाचा धोका आहे, अशी माहिती या अभ्यासातून समोर आली. त्यात असे आढळून आले की, प्रत्येक १० सेंटीमीटर उंचीच्या वाढीमुळे कर्करोग होण्याचा धोका सुमारे १६ टक्क्यांनी वाढतो. पुरुषांमध्येही अशीच वाढ दिसून आली आहे. आकडेवारी पाहिल्यास, दरवर्षी सरासरी उंचीच्या (सुमारे १६५ सेंटीमीटर) प्रत्येक १० हजार महिलांपैकी ४५ महिलांना कर्करोग होतो; तर १७५ सेंटीमीटर उंच असलेल्या प्रत्येक १० हजार महिलांपैकी सुमारे ५२ महिलांना कर्करोग होतो. दुसऱ्या एका अभ्यासातही उंची आणि कर्करोगाचा संबंध दिसून आला. त्यात २३ पैकी २२ कर्करोगाच्या रुग्णांच्या तपासात असे आढळून आले की, लहान लोकांपेक्षा उंच लोकांमध्ये कर्करोगाचे प्रमाण अधिक आढळून येते.

‘यूके मिलियन वूमन’च्या अभ्यासात त्यांनी तपासलेल्या १७ पैकी १५ कर्करोगाच्या रुग्णांमध्ये उंची आणि कर्करोगाचा संबंध दिसून आला. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : हवामान बदलामुळे गाड्यांची विक्री मंदावली?

नेमके कारण काय?

उंची आणि कर्करोगाच्या जोखमीमधील संबंध वांशिक आणि उंचीचा अंदाज लावणाऱ्या जनुकांच्या अभ्यासांमध्ये आढळतो. हे परिणाम कर्करोग आणि उंची यांच्यातील संबंधाचे जैविक कारण असल्याचे सूचित करतात. त्यामागील कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. त्यातील पहिली बाब म्हणजे उंच व्यक्तींमध्ये अधिक पेशी असतात. शास्त्रज्ञांचे सांगणे आहे की, कर्करोग हा नवीन पेशी तयार करण्यासाठी विभाजित झाल्यानंतर पेशीमध्ये उद्भवू शकणाऱ्या जनुकांच्या नुकसानीमुळे विकसित होतो. पेशी जितक्या जास्त वेळा विभाजित होतील तितकी आनुवंशिक नुकसान होण्याची आणि नवीन पेशींमध्ये कर्करोग उद्भवण्याची शक्यता जास्त असते.

ज्या व्यक्तीच्या शरीरात जास्त पेशी असतात, त्यांच्या पेशींचे विभाजन जास्त वेळा होते आणि त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते. काही संशोधनेदेखील याचे समर्थन करतात की, जास्त पेशी असण्यामुळे उंच लोकांमध्ये कर्करोगाची शक्यता वाढते आणि पुरुषांना स्त्रियांपेक्षा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. कारण- पुरुष सरासरी स्त्रियांपेक्षा उंच असतात. दुसरी शक्यता म्हणजे इन्सुलिनसदृश ग्रोथ फॅक्टर १ (IGF-1) नावाचा हार्मोन. हा संप्रेरक मुलांची वाढ होण्यास मदत करतो आणि नंतर प्रौढांमध्ये पेशींच्या वाढीस आणि पेशी विभाजनास चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. जेव्हा पेशी जुन्या किंवा खराब होतात तेव्हा आपल्या शरीराला नवीन पेशी तयार करण्याची आवश्यकता असते, त्यासाठी हा संप्रेरक महत्त्वाचा ठरतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, जेव्हा तुम्ही एखादे बॉडी स्क्रब वापरता तेव्हा स्क्रब केल्यावर सर्व त्वचेच्या पेशींवर परिणाम होतो, त्वचेची झीज होऊ नये म्हणून त्या पेशी बदलणे आवश्यक असते.

जास्त पेशी असण्यामुळे उंच लोकांमध्ये कर्करोगाची शक्यता वाढते. (छायाचित्र-रॉयटर्स)

परंतु, काही अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की, ज्या लोकांमध्ये IGF-1 ची पातळी सरासरीपेक्षा जास्त असते, त्यांना स्तन किंवा किडनीचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. परंतु, याबाबत अजूनही काही स्पष्ट सांगणे कठीण असते. पण, उंच लोकांना कॅन्सर का होतो? आणि या माहितीचा उपयोग कर्करोग रोखण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. परंतु, यासाठी अधिक संशोधन होणे आवश्यक आहे.

कर्करोग न होण्यासाठी काय काळजी?

सर्वप्रथम हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, कमी उंचीच्या व्यक्तींना जास्त उंची असणाऱ्यांपेक्षा कर्करोगाचा धोका फार कमी प्रमाणात असतो. दुसरे म्हणजे कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी आपण सर्व जण बऱ्याच गोष्टी करू शकतो आणि त्या गोष्टी परिणामकारकदेखील ठरतात. त्यासाठी आपल्या जीवनशैलीत काही बदल करणे अपेक्षित आहेत. ते बदल खालीलप्रमाणे :

-आरोग्यदायी आहार घ्या

-नियमित व्यायाम करा

-वजन नियंत्रणात ठेवा

-उन्हात विशेष काळजी घ्या

-मद्यपान मर्यादित प्रमाणातच करा किंवा पूर्णपणे टाळा

-सर्वांत महत्त्वाचे म्हणजे धूम्रपान करू नका

हेही वाचा : ‘या’ देशात आर्थिक संकटामुळे लठ्ठ लोकांचा आकडा होतोय गलेलठ्ठ; कारण काय?

जर आपण या सर्व गोष्टी केल्या, तर कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करता येणे शक्य आहे. त्यासाठी कॅन्सर स्क्रीनिंग प्रोग्राममध्येदेखील भाग घेता येऊ शकतो. त्यात स्तन, गर्भाशय व आतड्याच्या कर्करोगाचे लवकर निदान होते आणि वेळेत यशस्वी उपचार घेता येणे शक्य होते. संशोधनानुसार या जीवनशैलीचा अवलंब केल्यास हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यतादेखील कमी होऊ शकते.