Cancer Cases Rising in India दक्षिण आंध्र प्रदेश राज्यातील आयटी व्यावसायिक प्रफुल्ल रेड्डी फुप्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. दोन वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाल्यापासून ते त्याचा प्रसार थांबविण्यासाठी केमोथेरपी आणि रेडिएशनसारखे उपचार घेत आहेत. या थेरपीमुळे रेड्डी यांना उलट्या, डोकेदुखी व अल्सरसारखे त्रास उदभवले आहेत. रेड्डी यांना स्वतःला ते बरे होतील की नाही याची कल्पना नाही; परंतु डॉक्टरांना ते बरे होतील, अशी आशा आहे. “डॉक्टर कर्करोगाच्या पेशींची वाढ आणि प्रसार रोखण्यासाठी औषधे देत आहेत. मात्र, यात सुधारणा झाली नाही, तर एका फुप्फुसाचा संपूर्ण लोब काढून टाकण्यासाठी मला लोबेक्टॉमी करावी लागेल,” असे रेड्डी यांनी ‘डीडब्ल्यू’ला सांगितले.

शेजारच्या कर्नाटक राज्यातील बेंगळुरू शहरात राहणारी १२ वर्षीय दीप्ती किडनीच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. ती यावर उपचार घेत आहे. “तिच्यावर सध्या रेडिएशन थेरपी सुरू आहे. या थेरपीमुळे तिच्यावर दुष्परिणाम झाले आहेत आणि तिचे केसही गळत आहेत,” असे तिच्या डॉक्टर चारू शर्मा यांनी ‘डीडब्ल्यू’ला सांगितले. ही काही वेगळी प्रकरणे नाहीत. अशी अनेक प्रकरणे सध्या देशात आहेत. दिवसागणिक देशात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. विशेषत: लहान मुलांमधील कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. जगात कर्करोगाची सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या आघाडीच्या देशांपैकी भारत एक आहे. मात्र, देशात कर्करोगाचे प्रमाण का वाढत आहे? अहवालात याविषयी काय सांगण्यात आले आहे? याबद्दल जाणून घेऊ या.

हेही वाचा : दलाई लामांचा तो वादग्रस्त व्हिडिओ आणि चीनची ‘स्मीअर’ मोहीम; चीनला तिबेटच्या आध्यात्मिक नेत्याविषयी इतका द्वेष का?

भारत जगातील कर्करोगाची राजधानी

बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये आरोग्याशी संबंधित समस्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे देशात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. भारतीय बहुराष्ट्रीय आरोग्य सेवा समूह अपोलो हॉस्पिटल्सने गेल्या महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालात देशाला जगातील कर्करोगाची राजधानी म्हणून संबोधले आहे. या अभ्यासातून देशभरातील एकूणच आरोग्यविषयक समस्यांचे चिंताजनक चित्र समोर आले आहे.

अहवालात असे आढळून आले की, सध्या तीनपैकी एक भारतीय प्री-डायबेटिक आहे आणि तीनपैकी दोन प्री-हायपरटेन्सिव्ह आहेत. त्यात १० पैकी एक भारतीय नैराश्याचा सामना करीत असल्याची माहितीही समोर आली आहे. कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे रोग आणि मानसिक आरोग्याचे विकार असे आजारही दिवसेंदिवस वाढत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

कर्करोगामुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या वाढणार

२०२० मध्ये वार्षिक कर्करोगाच्या प्रकरणांची संख्या सुमारे १.४ दशलक्ष होती; जी २०२५ पर्यंत १.५७ दशलक्षापर्यंत वाढण्याचा अंदाज या अभ्यासात वर्तविण्यात आला आहे. स्त्रियांमध्ये स्तन, गर्भाशय व अंडाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर पुरुषांमध्ये फुप्फुस, तोंड व पुरस्थ ग्रंथी कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे.

पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष के. श्रीनाथ रेड्डी यांनी ‘डीडब्ल्यू’ला सांगितले, “कर्करोगाची प्रकरणे व मृत्यू वाढत आहेत आणि पुढील दोन दशकांत यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट केले, “याला वाढते वय, जळजळ वाढविणारे अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ, कार्सिनोजेनने भरलेले वायुप्रदूषण आणि हवामानातील बदल कारणीभूत आहे.”

लहान मुलांमध्ये वाढला कर्करोगाचा धोका

अपोलो हॉस्पिटलच्या अहवालात अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांच्या तुलनेत भारतातील कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये कशी वाढ होत आहे, यावरदेखील प्रकाश टाकण्यात आला आहे. उदाहरणार्थ- भारतात फुप्फुसाचा कर्करोग होणार्‍या रुग्णाचे सरासरी वय ५९ आहे; परंतु अमेरिकेमध्ये ७०, ब्रिटनमध्ये ७५ व चीनमध्ये ६८ असे या आजाराच्या रुग्णाचे सरासरी वय असल्याचे आढळून येते. भारतात दरवर्षी सुमारे एक दशलक्ष नवीन कर्करोगी सापडतात आणि त्यात चार टक्के लहान मुले आहेत.

डॉक्टर आणि इतर आरोग्य व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, देशात विशेषतः सरकारी रुग्णालयांमध्ये बालरोग ऑन्कोलॉजी सुविधांची कमतरता आहे. “बहुतेक खासगी रुग्णालयांमध्ये बाल कर्करोग तज्ज्ञ प्रशिक्षित आहेत. परंतु, वैद्यकीय महाविद्यालये किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित डॉक्टर्स नाहीत,” असे बाल कर्करोग तज्ज्ञ आणि मुंबईच्या एमआरआर रुग्णालयातील वरिष्ठ सल्लागार रुचिरा मिश्रा म्हणाल्या. त्यांनी पुढे सांगितले, “केवळ ४१ टक्के सार्वजनिक रुग्णालयांमध्ये बालरोग ऑन्कोलॉजी विभाग आहेत.” मिश्रा यांनी सांगितले की, पैशांच्या कमतरतेमुळे पालकांना मुलाला खासगी रुग्णालयात नेणे परवडत नाही. अशा पालकांना औषधींचा खर्च आणि थेरेपीसारखे उपाय परवडत नसल्यामुळे ते उपचार सोडून देतात.

नियमित तपासणी आवश्यक

तज्ज्ञांनी सांगितले की, देशातील आरोग्य तपासणी दर कमी असल्यामुळे हे कर्करोगाविरुद्धच्या लढ्यासाठी मुख्य आव्हान ठरत आहे. “कर्करोग वाढत आहे यात शंका नाही. प्रत्येकाने प्राधान्याने यासाठी महत्त्वाची पावले उचलायला हवीत. उदाहरणार्थ- सरकारने प्रथम उपाय म्हणून स्क्रीनिंगला प्रोत्साहन दिले पाहिजे,” असे फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटमधील वैद्यकीय ऑन्कोलॉजीचे वरिष्ठ संचालक नितेश रोहतगी यांनी ‘डीडब्ल्यू’ला सांगितले. ते पुढे म्हणाले, “आर्थिक संरक्षण प्रदान करण्यासाठी कर्करोगाची तपासणी आणि उपचारात्मक सेवांचा विस्तार करण्यासाठी धोरणांचीदेखील आवश्यकता आहे.”

हेही वाचा : भारतीय विद्यार्थी का म्हणत आहेत ‘चलो जर्मनी’?

२०४० पर्यंत कर्करोगाच्या रुग्णांची संख्या दुप्पट

भारतामध्ये तोंड, स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगासाठी स्क्रीनिंग चाचणी उपलब्ध आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनुसार, किमान ७० टक्के महिलांनी चाचणी करणे आवश्यक आहे. मात्र, राष्ट्रीय डेटानुसार स्क्रीनिंग दर एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. “मी याला महामारी म्हणू इच्छित नाही; परंतु २०२० च्या तुलनेत २०४० पर्यंत कर्करोगाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होईल. वैयक्तिक, सामाजिक व सरकारी पातळीवर याला रोखणे शक्य आहे,” असे दिल्लीच्या मॅक्स हॉस्पिटलमधील कॅन्सर केअरचे संचालक असित अरोरा म्हणाले. वेळीच आपण याविषयी काही केले नाही, तर याचे घातक परिणाम दिसतील, असेही त्यांनी सांगितले.