लोकसत्ता विश्लेषण : ‘शून्य अपघाता’च्या दिशेन पुढचे पाऊल…

…याचा एक भाग म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने गेले काही महिने प्रवाशांच्या व चालकाच्या सुरक्षेसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

(प्रातिनिधिक संग्रहित छायाचित्र)

भारतात दरवर्षी चार ते साडेचार लाख वाहन अपघात होतात. त्यात एक ते दीड लाख लोकांचा मृत्यू होतो, तर चार ते पाच लाख लोक जायबंदी होतात. त्यामुळे रस्ता सुरक्षा किती महत्त्वाची आहे, हे लक्षात येईल. याचा एक भाग म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने गेले काही महिने प्रवाशांच्या व चालकाच्या सुरक्षेसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यात आठ आसनी सर्व कारमध्ये सहा एअरबॅग्जची व्यवस्था करण्याबाबतच्या एका अधिसूचनेचा मसुदा मांडला आहे. याचे स्वागत केले पाहिजे. मात्र याचा फायदा घेत कार उत्पादकांकडून वाढवण्यात येणाऱ्या वाहनांच्या किमतीवरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

‘अ‍ॅक्टिव्ह’ आणि ‘पॅसिव्ह सेफ्टी’ –

वाहनांचा अपघात व त्यामुळे होणारे मृत्यू ही एक जगासमोरची मोठी समस्या आहे. वाहनांचा अपघात होऊ नये म्हणून ज्या यंत्रणा बसवलेल्या असतात त्यांना अपघातपूर्व सुरक्षा प्रणाली (अ‍ॅक्टिव्ह सेफ्टी) असे संबोधले जाते व अपघात झालाच तर ज्या यंत्रणा त्याची तीव्रता कमी करतात त्यांना अपघात पश्चात सुरक्षा (पॅसिव्ह सेफ्टी ) म्हणून संबोधले जाते. अ‍ॅक्टिव्ह सेफ्टीमध्ये वाहनाची विविध मापे, सर्व दिवे, टायर्स, ब्रेक, स्टिअरिंगचा समावेश होतो, तर पॅसिव्ह सेफ्टीमध्ये सीटबेल्ट, एअरबॅग इ.चा समावेश होत असतो.

एअरबॅग अनिवार्यता… –

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे सातत्याने रस्ते सुरक्षेसाठी महत्त्वाची पावले टाकत आहेत. याआधी १ जुलै २०१९ पासून त्यांनी कारमध्ये चालकासाठी एअरबॅग बंधनकारक केली होती. त्यानंतर १ जानेवारी २०२२ पासून सह प्रवाशासाठीही एअरबॅग अनिवार्य केली आहे. आता त्यापुढचं पाऊल टाकून गडकरी यांनी आठ आसनीपर्यंतच्या सर्व कारमध्ये सहा एअरबॅग्जची व्यवस्था अनिवार्य केली आहे. यामुळे प्रामुख्याने समोरासमोर वाहनांची धडक होऊन जे अपघात होतात त्यात जीवितहानी कमी होणार आहे. या निर्णयामुळे निश्चितपणे कारचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात प्राणहानी टळणार आहे. त्यामुळे आशा सुरक्षा प्रणालींंबाबत घेतलेल्या निर्णयाच स्वागतच केले पाहिजे.

आठ आसनी वाहने कोणती? सहा एअरबॅग्ज कशा असतील?

हॅचबॅकपासून सेडान, एमपीव्ही, एसयूव्हीपर्यंतच्या सर्व मोटारी आठ आसनीपर्यंतच्या वाहनांच्या विभागात येतात. सध्या बहुतेक वाहनांमध्ये चालक आणि त्याच्या बाजूचा प्रवासी यांच्या सुरक्षिततेसाठी समोरून उघडणाऱ्या एअरबॅग्ज असतातच. काही मोटारींच्या सर्वोच्च व्हेरियंटमध्ये सहा एअरबॅग्ज दिल्या जातात. नवीन प्रस्तावात मागे बसलेल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुढून आणि बाजूने उघडणाऱ्या एअरबॅग्ज सरसकट असणे अपेक्षित आहे.

वाहनांच्या किमतीचे काय? –

कार उत्पादकांसाठी हा निर्णय बंधनकारक केल्यानंतर कारच्या किमती वाढणार आहेत. साधारण एक एअरबॅगसाठी २० ते ३० हजारांचा खर्च वाढणार आहे. याचा फायदा घेत कार उत्पादक कंपन्या आपल्या कारच्या किमतीत वाढ करतील. याचा फटका खरेदीदारांना बसू शकतो. यावर शासनाने काही निर्बंध घालणे गरजेचे आहे.

पादचाऱ्यांच्या सुरक्षेचे काय? –

संसदेच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्याे आकडेवारीनुसार, २०२० मध्ये १७,५३८ कार चालकांचा तर २३,४८३ पादचाऱ्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे वाहन अपघातात चालक, प्रवाशांच्या सुरक्षेसह पादचारी सुरक्षेलाही प्राधान्य दिले पाहिजे. रस्त्याचा वापर करणारी प्रत्येक व्यक्ती नियमांचे पालन करणारी, नम्र आहे असे स्वत:ला समजत असते. परंतु त्याच्याकडून अनाहूतपणे का होईना चुका होतच असतात. त्याची परिणती म्हणजे होणारे अपघात. ते टाळण्याकरिता व चुका समजावून घेण्याकरिता सुरक्षा प्रणालीची मांडणी, रचना व वापर केला पाहिजे.

‘शून्य अपघाताचे स्वप्न’ –

जगात ‘शून्य अपघाताचे स्वप्न’ ही एक आंतरराष्ट्रीय चळवळ झाली असून भारतातही त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काही देशांतील अपघात संख्या लक्षणीय कमी झाल्याचेही दिसत आहे. कल्पना करा, आजपासून २० ते ३० वर्षांनी आपल्या देशातील रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण शून्य झाले तर! होय हे शक्य आहे. पण याकरिता ही समस्या समजून घेतली पाहिजे व ती सोडवण्याकरिता सुरक्षा प्रणाली व दृष्टिकोन बदलावा लागेल. ती आपली नैतिक जबाबदारी समजून त्याचे अनुकरण करावे लागेल. सुरक्षित रस्ता वापरणारे, सुरक्षित वाहन, सुरक्षित वेग, सुरक्षित रस्ता आणि दुर्घटनेनंतरची निगा/काळजी या पाच घटकांना प्राधान्य दिले तर शन्य अपघाताच्या दिशेने आपण नक्कीच प्रवास करू शकतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The next step towards zero accidents msr 87 print exp 0122

Next Story
लोकसत्ता विश्लेषण – छोट्या पक्षांबरोबर आघाडी : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाची रणनीती
फोटो गॅलरी