ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. गतउपविजेत्या पाकिस्तानच्या संघाने यंदाच्या विश्वचषकात अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. तुलनेने दुबळ्या अमेरिकेनंतर त्यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताकडूनही पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पाकिस्तानच्या संघावर चहूबाजूंनी टीका होऊ लागली. त्यांच्या अपयशाची कारणे शोधण्याचा आता प्रयत्न सुरू झाला आहे. यात प्रमुख कारण पाकिस्तान संघामध्ये एकोपा नसणे हे सांगितले जाते. नक्की तथ्य काय आहे, याचा आढावा.

पाकिस्तान संघात अंतर्गत गटबाजी?

पाकिस्तान संघाला अंतर्गत गटबाजी आणि महत्त्वाच्या क्षणी आघाडीच्या खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीचा फटका बसल्याचे म्हटले जात आहे. कर्णधार म्हणून बाबर आझमसमोर संघाला एकजूट ठेवण्याचे सर्वांत मोठे आव्हान होते. मात्र, संघातील वेगवेगळ्या गटांमुळे असे होऊ शकले नाही. शाहीन शाह आफ्रिदीने कर्णधारपद गमावल्यानंतर, तसेच बाबरकडून योग्य वेळी पाठिंबा न मिळाल्याने तो नाराज असल्याची माहिती आहे. तसेच मोहम्मद रिझवान कर्णधारपदासाठी विचार न झाल्याने नाखूश आहे. त्यामुळे संघात बाबर, शाहीन आणि रिझवान यांचे तीन वेगळे गट असल्याचे म्हटले जात आहे. तसेच मोहम्मद आमीर आणि इमाद वसीम या वरिष्ठ खेळाडूंच्या अचानक झालेल्या पुनरागमनामुळे परिस्थिती आणखीच चिघळली. विशेष म्हणजे या दोघांनी अनेक लीगमध्ये सहभाग नोंदवला, पण बऱ्याच काळापासून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ते खेळले नव्हते. त्यामुळे बाबरकडून त्यांना पुरेसे समर्थन मिळाले नाही. त्यातच अनेक खेळाडू एकमेकांशी बोलतही नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करत असलेल्या पाकिस्तान संघाला एकत्रितपणे चमकदार कामगिरी करता आली नाही.

हेही वाचा – Railway Accident: देशाला हादरवणारे ९ भीषण रेल्वे अपघात

‘पीसीबी’ अध्यक्षांनाही तोडगा काढण्यात अपयश…

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना विश्वचषकाच्या आधीपासूनच संघाच्या समस्यांबाबत कल्पना होती. निवड समिती सदस्य वहाब रियाझने नक्वी यांना संघातील स्थितीबाबत महिती दिली होती. नक्वी यांनी सर्व खेळाडूंबरोबर दोन बैठका केल्या आणि वैयक्तिक हित जपण्याऐवजी विश्वचषक जिंकण्यावर लक्ष केंद्रित करा असे सांगितले होते. विश्वचषकानंतर संघातील सर्व गोष्टी सुरळीत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, तरीही गोष्टी जमून आल्या नाहीत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. जेव्हा तुमच्या प्रमुख गोलंदाजाला अमेरिकेसारख्या संघाविरुद्ध अखेरच्या षटकात १५ धावांचाही बचाव करता आला नाही, अशा वेळी बाबर आझम काय करेल? त्यातच समाजमाध्यमावर काही माजी खेळाडूंनी चालवलेल्या मोहिमेने संघातील तणाव आणखी वाढवायचे काम केले, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

पाकिस्तान क्रिकेटपटूंच्या मानधनात कपात?

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर खेळाडूंच्या केंद्रीय कराराची समीक्षाही करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनात कपातीची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या काही अधिकाऱ्यांनी आणि माजी खेळाडूंनी मंडळाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना केंद्रीय कराराबाबत पुनर्विचार करण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा – जागतिक तापमानवाढीने दूषित होतोय पिण्याच्या पाण्याचा साठा, दुष्परिणाम कोणते?

प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचा उद्वेग…

पाकिस्तान संघ अजिबातच संघटित नसल्याचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचे मत आहे. अमेरिका आणि भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानला कॅनडा व आयर्लंडविरुद्धही विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. ‘‘पाकिस्तानच्या खेळाडूंत सांघिक भावना दिसली नाही. संघातील खेळाडू एकमेकांना पाठिंबा देत नाहीत. सर्व जण वेगवेगळे असतात. मी अनेक संघांसोबत काम केले आहे, मात्र अशी स्थिती पाहिली नाही,’’ अशी कस्टर्न यांची भावना असल्याचे एका वरिष्ठ पत्रकाराने सांगितले. भारताकडून पराभूत झाल्यानंतर संघाला खराब निर्णयांचा फटका बसल्याचे कस्टर्न म्हणाले होते. विश्वचषक सुरू होण्याच्या काही काळापूर्वीच कर्स्टन यांच्याकडे संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

वसीम अक्रमकडून खडे बोल…

पाकिस्तान संघावर अनेक माजी खेळाडूंनी टीका केली. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमनेही संघाला खडे बोल सुनावले होते. सध्याच्या संघाच्या जागी नवा संघ खेळवा असा सल्लाच अक्रमने दिला. ‘‘मी त्यांचा खेळ पाहून निराश झालो. सध्याचा संघ हा हाताबाहेर गेलेला दिसत आहे. संघातील काही खेळाडू एकमेकांशी संभाषण करतानाही दिसत नाहीत. देशातील नागरिकांचा तुम्ही अपेक्षाभंग केला आहे. तुम्ही सर्व देशाच्या भावनेशी खेळत आहात. प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात. आता नवीन खेळाडूंना घेऊन तुम्ही पाकिस्तान संघ तयार करा,’’ असे वसीम अक्रम म्हणाला.