अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी आपल्या एका भाषणात दावा केला की, २०२१ मध्ये अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तेथील बगराम हवाई तळ चीनने आपल्या ताब्यात घेतले आहे. ट्रम्प यांनी दावा केला की, चीन ज्या ठिकाणी आपली अण्वस्त्रे तयार करतो, त्या ठिकाणापासून अमेरिकेचे हे हवाईतळ एक तासाच्या अंतरावर आहे. त्यांनी या भाषणात जो बायडेन प्रशासनावरदेखील टीका केली. त्यांनी (जो बायडेन प्रशासनाने) बगराम सोडले आणि सध्या चीन बगरामवर कब्जा करत आहे, असे ते म्हणाले.

ट्रम्प चीनच्या कोणत्या अणुऊर्जा केंद्राचा उल्लेख करत होते हे अद्याप स्पष्ट नाही. माहितीतील सर्वात चाचणी केंद्र शिनजियांगमधील लोप नूर येथे २००० किलोमीटर अंतरावर आहे. या चाचणी केंद्रात १९६४ मध्ये चीनने पहिली अणुबॉम्ब चाचणी केली होती. सर्वात जवळचे अणुऊर्जा केंद्र म्हणजे कोको नूर कॉम्प्लेक्स आहे, जे किंघाई प्रांतात आहे. मार्चमध्येही ट्रम्प यांनी अशाच प्रकारचा दावा केला होता, मात्र तालिबानने त्यावर स्पष्ट नकार दिला होता. बगराम हे चीनचे नाही तालिबानद्वारे नियंत्रित आहे, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, या ठिकाणी कोणतेही चिनी सैन्य उपस्थित नाही आणि आमचा कोणत्याही देशाशी असा कोणताही करार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु, बगराम इतके महत्त्वाचे हवाई तळ कसे आहे? अमेरिका आणि चीन दोघांनाही का हवाय हा हवाईतळ? जाणून घेऊयात.

बगराम हवाई तळ परवान प्रांतात आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

बगराम हवाई तळाचे महत्त्व

बगराम हवाई तळ हे अफगाणिस्तानातील सर्वात मोठे हवाई तळ आहे. काबूलच्या उत्तरेस सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असणारे बगराम हवाई तळ परवान प्रांतात आहे. तज्ज्ञ सांगतात की, अफगाणिस्तानच्या बहुतेक भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी परवान महत्त्वाचे आहे. परवानमध्ये २.६ किलोमीटर लांबीचा सलांग बोगदा आहे. हा बोगदा काबूलला मजार-ए-शरीफ आणि उत्तरेकडील इतर शहरांशी जोडतो, दक्षिणेस गझनी आणि कंधारला जोडतो, तसेच पश्चिमेला बामियानला जोडतो.

१९५० च्या दशकात शीतयुद्धाच्या सुरुवातीच्या काळात सोव्हिएत सैन्याने हा हवाई तळ बांधला होता. १९५९ मध्ये तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ड्वाइट आयझेनहॉवर हे त्यांच्या ऐतिहासिक भेटीसाठी, बगराममध्ये उतरले होते. १९७९ ते ८९ च्या सोव्हिएत-अफगाण युद्धादरम्यान बगराम हा एक महत्त्वाचा सोव्हिएत हवाई तळ ठरला. बगराममधून हवाई दलातील सैन्य तैनात करण्यात आले आणि सुखोई एसयू-२५ ने या तळावरून मुजाहिदीनविरुद्ध आपल्या मोहिमा सुरू ठेवल्या. हा तळ आणखी विकसित करण्यात आला आणि लष्करी कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली.

२००१ च्या हल्ल्यानंतर, अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी बगराम हवाई तळाचा ताबा मिळवला. (छायाचित्र-रॉयटर्स)

अमेरिकेकडून बगराम हवाई तळाचा विकास

१९९० च्या दशकात सोव्हिएत सैन्याने माघार घेतली. त्यानंतर दक्षिणेला काबूल ताब्यात घेतलेल्या तालिबान आणि उत्तरेला असलेल्या नॉर्दर्न अलायन्स यांच्यात झालेल्या युद्धात बगराम हवाई तळ केंद्रबिंदू ठरला. परिणामी, या हवाई तळाचे मोठे नुकसान झाले. ११ सप्टेंबर २००१ च्या हल्ल्यानंतर, अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी बगराम हवाई तळाचा ताबा मिळवला. पुढील दोन दशकांमध्ये, दहशतवादाविरुद्धचे युद्ध वाढत असताना अफगाणिस्तानातील बगराम हवाई तळावर अमेरिकन सैन्याची उपस्थिती कायम राहिली. हा तळ आणखी वाढवण्यात आला आणि विकसित करण्यात आला. या तळाचा ७७ चौरस किलोमीटरपेक्षा जास्त विस्तार करण्यात आला, ३.५ किलोमीटर लांबीची एक नवीन धावपट्टीदेखील बांधण्यात आली आणि अमेरिकन कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधा आणि खाद्यपदार्थाचे स्टॉल्सही बांधण्यात आले.

अमेरिकेची माघार अन् चीनचा कब्जा

२०२० मध्ये ट्रम्प प्रशासनाने तालिबानशी करार केला होता. या करारात अफगाणिस्तानातील सर्व नाटो सैन्यांना माघारी बोलावण्याची तरतूद होती. करारानंतर पुढच्या वर्षी अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपली संसाधने काढण्यास सुरुवात केली आणि तालिबानने आपले स्थान बळकट करण्यास सुरुवात केली. ३० ऑगस्ट २०२१ रोजी काबूल विमानतळावरून अखेरचे अमेरिकन विमान निघाले. २ जुलै रोजी अमेरिकन सैन्याकडून संपूर्ण बगराम हवाई तळ रिकामे करण्यात आले होते आणि १५ ऑगस्ट रोजी हा तळ तालिबानच्या ताब्यात गेला.

तत्कालीन संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये हाऊस आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीला सांगितले, “बगराम हवाई तळाचे संचलन आणि संरक्षण करण्यासाठी ५,००० अमेरिकन सैन्यांचा जीव धोक्यात आणावा लागला असता.” आज हा तळ तालिबानच्या नियंत्रणाखाली आहे. मात्र, अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर चीनच्या घुसखोरीबाबत अमेरिका कायम प्रश उपस्थित करत आला आहे. अनेक देशांनी तालिबानशी पूर्णपणे संबंध स्वीकारण्यास हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे, मात्र गेल्या वर्षी चीनने बीजिंगमधील तालिबान प्रतिनिधीला राजदूत म्हणून ओळखपत्रे दिली.

चीनकरिता अफगाणिस्तानशी संबंध मजबूत ठेवणे महत्त्वाचे आहेत. सीमावर्ती शिनजियांग भागात त्यांची स्वतःची मोठी मुस्लीम लोकसंख्या आहे. अफगाणिस्तानमधील कट्टरपंथी घटक त्यांच्या प्रदेशात घुसू नयेत, हे सुनिश्चित करण्यासाठीदेखील चांगले संबंध महत्त्वाचे आहेत. त्यासाठी चीनने तालिबानच्या नियंत्रणात असलेल्या अफगाणिस्तानशी संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच अफगाणिस्तानात गुंतवणूकदेखील केली आहे.